अमेरिकन अभिनेत्री एमा स्टोन पुन्हा एकदा ऑस्कर पुरस्कार २०२४ मुळे चर्चेत आली आहे. . एमा स्टोनला पुअर थिंग्स या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. हा तिचा दुसरा ऑस्कर पुरस्कार आहे. मात्र, इथपर्यंत पोहोचण्याचा एमाचा प्रवास सोपा नव्हता. अभिनेत्री बनण्यासाठी एमाला अनेक संघर्षांचा सामना करावा लागला.
एमा स्टोनचा जन्म स्कॉट्सडेल, अॅरिझोना येथे झाला. लहानपणी एमाला पॅनिक अटॅक आणि डिप्रेशनचा सामना करावा लागला होता. लहानपणापासून एमाला अभिनय क्षेत्रात रस होता. वयाच्या चौथ्या वर्षीच तिने मोठेपणी अभिनेत्री बनण्याचे स्वप्न बघितले होते. वयाच्या केवळ ११ व्या वर्षी तिने ‘द विंड इन द विलोज’मध्ये ऑटरची भूमिका साकारत अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
त्यानंतर एमा ‘द प्रिन्सेस अॅण्ड द पी’, ‘ॲलिस ॲडव्हेंचर्स इन वंडरलँड’ व ‘जोसेफ आणि अमेझिंग टेक्निकलर ड्रीमकोट’मध्ये झळकली. एमाने झेवियर कॉलेज प्रिपरेटरी या ऑल-गर्ल कॅथॉलिक हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला होता; पण अभिनेत्री बनण्याचे स्वप्न तिला शांत बसू देत नव्हते. अखेर एका सत्रानंतर तिने शाळा सोडली.
एका मुलाखतीत एमाने तिच्या संघर्षमय दिवसांबाबत भाष्य केले होते. अभिनेत्रीच्या रोलसाठी एमाने अनेक ऑडिशन्स दिल्या; पण प्रत्येक वेळेस तिला नाकारण्यात आले. एमा म्हणाली, “मी डिस्ने चॅनेलवरील प्रत्येक शोमध्ये भाग घेण्यासाठी गेले होते. मी अनेक ऑडिशन दिल्या; पण मला काम मिळाले नाही.” दरम्यान, एमाने ऑनलाइन हायस्कूल वर्गात प्रवेश घेतला आणि ती डॉग-ट्रीट बेकरीमध्ये अर्धवेळ काम करू लागली.
अखेर एमाला तिच्या प्रयत्नांमध्ये यश मिळाले. ‘झोम्बीलँड’, ‘इझी ए’ सारख्या चित्रपटांमधील तिच्या भूमिकेने प्रेक्षकांना प्रभावित केले. या चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा गोल्डन ग्लोब पुरस्कारही मिळाला. त्यानंतर एमाने कधी मागे वळून बघितले नाही. तिने ‘ला ला लँड’ (२०१६) आणि ‘पुअर थिंग्ज’ (२०२३) साठी २ सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे ऑस्कर जिंकले आहेत. फोर्ब्सच्या मते, २०१७ मध्ये एम्मा स्टोन ही जगातील सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री होती. एमाने ‘ला ला लँड’मधील भूमिकेसाठी २६ दशलक्ष डॉलर शुल्क आकारले. ३० दशलक्ष डॉलरच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात ४४५.३ दशलक्ष डॉलरची कमाई केली.होती.