भावनिक, मानसिक लिंचिंग केलं गेल्याने सुशांत सिंह राजपूत या कलाकाराने आत्महत्येचं पाऊल उचललं असा नवा आरोप आता अभिनेत्री कंगना रणौतने केला आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर नवा व्हिडीओ पोस्ट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सुशांत सिंह राजपूत या कलाकाराने १४ जून रोजी मुंबईतील त्याच्या राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केली. त्यामुळे सगळं बॉलिवूड हादरलं आहे. अशात कंगना रणौत या अभिनेत्रीने आता सुशांतचा बळी हा इमोशनल, सायकोलॉजिकल आणि मेन्टल लिंचिंगमुळे गेला असा आरोप केला आहे.
काय म्हणाली आहे कंगना ?
“सुशांतसिंग राजपूतच्या हत्येनंतर अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. काही गोष्टी मी वाचल्या तर काही मी पाहिल्या आणि ऐकल्या आहेत. बॉलिवूडमध्ये त्याच्यासोबत जे काही घडत होतं त्यामुळे तो त्रस्त झाला होता असं सुशांतच्या वडिलांनी एका मुलाखतीत सांगितलं. अभिषेक कपूर या दिग्दर्शकासोबत सुशांतने केदारनाथ नावाचा सिनेमा केला होता. त्यांनी असं म्हटलं आहे की सुशांतचं मानसिक आरोग्य हळूहळू बिघडवण्यात आलं. तर अंकिता लोखंडे जिने सुशांतसोबत दीर्घकाळ काम केलं तिने सुशांत सामाजिक स्तरावर त्याचा झालेला अपमान आणि बदनामी सहन करु शकला नाही असं म्हटलं आहे. बॉलिवूडच्या मू्व्ही माफियांनी अत्यंत पद्धतशीरपणे सुशांतची बदनामी केली. त्याचं नाव न घेता त्याला अप्रत्यक्षपणे वाळीत टाकण्याचे प्रकार सुरु केले. ज्यामुळे हळूहळू सुशांत नैराश्याच्या गर्तेत ढकलला गेला. अनेक सो कॉल्ड पत्रकारांनी त्याच्याबद्दलच्या खोट्या बातम्याही पसरवल्या.” असं म्हणत कंगनाने काही वृत्तपत्रांच्या नावांचाही उल्लेख केला आहे.
पुढे कंगना म्हणते, “ब्लाईंडली लिहिणं म्हणजे माझ्याबद्दल लिहायचं असेल तर जिचे कुरळे केस आहेत, ती मनालीची आहे, सायको आहे असं लिहितात. कारण या लोकांना खरं छापायचं नसतंच असे अगणित आरोप त्याच्यावर करण्यात आले आहेत. गिधाडं, घारी आणि कावळ्यांच्या रुपात काही मू्व्ही माफियांनी त्यांचे पत्रकार पाळले आहेत. ज्यांनी सुशांतची यथेच्छ बदनामी केली. ज्याचा त्रास त्याला होऊ लागला. हे असले पत्रकार मेन्टल, इमोशनल, सायकोलॉजिकल लिंचिंगलाच त्यांची पत्रकारिता मानतात. माझा मणिकर्णिका हा सिनेमाही ठरवून पाडण्याचा प्रयत्न झाला होता. तुम्हाला असल्या बातम्या वाचून खरंतर आनंद होतो. मात्र कधी तुम्ही हा विचार केला आहे का की घराणेशाहीतून आलेल्या बॉलिवूडच्या कलाकारांबद्दल हे का लिहिलं जात नाही? त्यांच्यापैकी कुणाच्याही गळ्यात असा आरोपांचा दोर लटकवला जात नाही. जेव्हा अशा लोकांवर किंवा उद्या तुमच्यावर ही वेळ येईल तेव्हाच तुम्ही समजू शकता की सुशांत नेमका कशातून जात होता. ”
पाहा व्हिडीओ
सुमारे अडीच मिनिटांच्या व्हिडीओत कंगना रणौतने मूव्ही माफिया, घराणेशाही, मानसिकता कशी हळूहळू बिघडवली जाते यावर भाष्य केलं आहे. स्वतःला सिनेपत्रकार म्हणवणाऱ्यांचीही तिने यथेच्छ निंदा केली आहे. तिच्या ऑफिशियल इन्स्टा पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.