वैविध्यपूर्ण विषय आणि नावीन्यपूर्ण मांडणी यांची मराठी चित्रपटांमध्ये रेलचेल आहे. बहुचर्चित ‘बायोस्कोप’ या मराठी चित्रपटाद्वारे चार कवितांवर आधारित चार दिग्दर्शकांचे चार लघुपट हा नावीन्यपूर्ण प्रयोग करण्यात आला आहे. रुपेरी पडद्यावर काव्यात्म भावनांचा ‘कोलाज’ असे वर्णन या चित्रपटाचे करावे लागेल. प्रत्येक लघुपट निरनिराळ्या विश्वातील विशिष्ट काळातील माणसांचे जगणे दाखवितो. त्यावर भाष्य करणारा आहे. कवितांवर आधारित चित्रपट हा निश्चितच आव्हानात्मक प्रकार चारही दिग्दर्शकांनी उत्तमरीत्या पेलला आहे. उत्कृष्ट लेखन-दिग्दर्शन, उत्कृष्ट अभिनय, उत्कृष्ट सादरीकरण आणि कवितेतील भावनांची तरल मांडणी प्रत्येक लघुपटातून करण्यात आली आहे. म्हणूनही या नव्या प्रयोगाचे स्वागत करायला हवे. या नावीन्यपूर्ण प्रयोगाला गुलजार यांच्यासारख्या सर्जनशील व्यक्तिमत्त्वाच्या निवेदनाचा स्पर्श लाभल्यामुळेही चित्रपटाला उंची प्राप्त झाली आहे.
कवितांमधून कवीने व्यक्त केलेल्या भावना आणि त्यावर आधारित चित्रपटांद्वारे लेखक-दिग्दर्शकांनी आपल्या दृष्टिकोनातून लावलेला त्या कवितांचा अर्थ आणि त्यानुसार केलेली मांडणी हा अनोखा प्रकार प्रेक्षकांसमोर आला आहे. मूळ कविता आणि त्यांचा रुपेरी पडद्यावर सादर केलेला अवतार हा त्या त्या लेखक-दिग्दर्शक-कलावंतांची स्वतंत्र अभिव्यक्ती असू शकते इतकेच म्हणता येते. प्रत्येक लघुपटांतील व्यक्तिरेखांशी प्रेक्षकाला तादात्म्य पावता येईल अशा पद्धतीने कविता उलगडल्या आहेत.
ओघवत्या, प्रसन्न निवेदनानंतर चार लघुपटांपैकी पहिला कोणता असेल याचा अंदाज बांधत प्रेक्षकाची उत्सुकता वाढते. ‘दिल ए नादान’ हा लघुपट मिर्झा गालिब यांच्या ‘दिल ए नादान तुझे हुआ क्या है’ या शेरवर आधारित आहे. निर्मलादेवी इंदोरी ही प्रख्यात ज्येष्ठ गायिका आणि सारंगीवादक मियाँजी यांच्या आयुष्यातील एका दिवसाचे चित्रण यात केले आहे. शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील दोन दिग्गजांच्या आयुष्यातील ऐन उमेदीचा काळ ओसरल्यानंतर येणारी उदासी, संगीत मैफलीची आमंत्रणे येत नसल्यामुळे उदरनिर्वाहासाठी बदाम विकण्याची वेळ त्यांच्यावर येते. संगीत मैफलींच्या रम्य आठवणी, संगीत क्षेत्रातील दिग्गजांकडून शिकलेले, अनुभवास आलेले संगीताचे दैवी सूर आणि आता काळ बदलल्याने संगीत मैफलींच्या आमंत्रणाची वाट पाहणे, जगणे विकल होणे हे सारे इंदोरीबाई आणि मियाँजी यांच्यातील अल्प संवादातून उलगडत जाणे. केवळ एकाच खोलीत चित्रित करण्यात आलेल्या या लघुपटात नीना कुळकर्णी यांनी इंदोरीबाई आणि सुहास पळशीकर यांनी मियाँजी या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर नजाकतीने केलेला अभिनय हे या लघुपटाचे सौंदर्यसामथ्र्य ठरते. अल्प पण मार्मिक संवादातून दिग्दर्शकाने इंदोरीबाई आणि मियाँजी यांच्या आठवणीतील संगीत मैफली आणि त्यांचे एकेकाळचे समृद्ध आयुष्य उलगडून दाखविण्याचे आव्हान समर्थपणे पेलले आहे.
कवी सौमित्र यांच्या कवितेवर आधारित ‘एक होता काऊ’ या लघुपटात काळ्या रंगाच्या लोकांची मानसिकता नेमकेपणाने टिपण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. काळा असल्यामुळे लहानपणापासूनच कावळ्या असे टोपणनाव मिळालेल्या तरुणाचे त्याच्याच परिसरात राहणाऱ्या पाकळी हिच्यावर प्रेम आहे. पाकळीलाही हे माहीत आहे. तिलाही कावळ्या खूप आवडत असतो. पण काळ्या वर्णामुळे कावळ्याला असलेला न्यूनगंड त्याला आपले प्रेम व्यक्त करू देत नाही. वरवर अतिशय साधी सोपी वाटणारी परंतु मनात खोलवर रुजलेली मानसिकता कावळ्याच्या भूमिकेतून कुशल बद्रिके याने तर कावळ्याच्या मनातील घालमेलीचे कारण उमगलेल्या पाकळी या भूमिकेत स्पृहा जोशी यांनी आपल्या अभिनयाने हा चित्रपट गहिरा केला आहे. या चित्रपटातील गोष्ट प्रेक्षकांना नक्कीच आपलीशी वाटेल यात शंका नाही.
कवी लोकनाथ यशवंत यांच्या ‘बैल’ या कवितेवर आधारित त्याच नावाच्या लघुपटातून कापूस उत्पादक शेतकऱ्याची व्यथा, त्याची उद्विग्नता, त्याचे नैराश्य हे मांडताना विदारक सत्य प्रेक्षकांसमोर मांडले आहे. विसंगतीवर नेमके बोट ठेवले आहे. शेतकरी आत्महत्येचा विषय चित्रपटांतून अनेकदा आला आहे. परंतु, बैल या कवितेनुसार शेतकऱ्याला प्रिय असलेला बैल विकूनदेखील शेतकरी आत्महत्या करतात तेव्हा तो बैल काय म्हणतो हे प्रभावीपणे या लघुपटातून मांडले आहे. बैल विकावा लागू नये म्हणून कर्ज फेडण्यासाठी तसेच कुटुंबाला पोसता यावे म्हणून पंजाबराव हा कापूस उत्पादक शेतकरी शहरात जाऊन मोलमजुरी करतो. परंतु, अंतिमत: कर्जाचा विळखा आणि प्रचंड विसंगती, पैशाचा अभाव यामुळे तो आत्महत्येचा मार्ग पत्करतो. पंजाबराव या भूमिकेतून मंगेश देसाईने आपल्या अभिनयातून गहिरेपण दाखविले आहे. त्याच्या बायकोच्या भूमिकेतील स्मिता तांबेनेही उत्तम साथ दिग्दर्शकाला दिली आहे. उदय सबनीस यांनी यात पोलीस इन्स्पेक्टर उत्तम उभा केला आहे. शहरी-ग्रामीण परिस्थितीमधील तफावत चित्रपटात संयत पण मार्मिक पद्धतीने दिग्दर्शकाने दाखवली आहे.
‘बायोस्कोप’मधील शेवटचा लघुपट समलैंगिकता विषयावरचा आहे. स्वातंत्र्य मिळाले त्याच्या थोडय़ा आधी घडणाऱ्या कथेचा आधार ‘मित्रा’ या लघुपटाला आहे. विजय तेंडुलकरांच्या कथेवरचा हा चित्रपट आहेच. परंतु, त्यातील मुख्य भूमिकेतील सुमित्रा या तरुणीची स्थिती, भावना संदीप खरे यांनी लिहिलेल्या ‘उदासीनतेस या कोणता रंग आहे’ या कवितेद्वारे मांडली आहे. त्याचा आधार लघुपटात घेतला आहे. सुमित्रा, विन्या आणि सुमित्राची कॉलेजमधील रूममेट असलेली उर्मी या तिघांचा प्रेमत्रिकोण दाखविला आहे. आपण पहिल्यापासून इतर मुलींपेक्षा निराळे आहोत, लैंगिकतेविषयक भावना आपल्या निराळ्या आहेत याची जाणीव झालेली सुमित्रा आपले मन विन्याजवळ व्यक्त करते. पण आपण जसे आहोत तसे आपण जगायचे आहे याचीही खूणगाठ मनाशी पक्की बांधणारी सुमित्राला मात्र उर्मी नाकारते. सुमित्राची घुसमट विन्याला जाणवते, पण तो गोंधळतो. एकीकडे सुमित्राने विन्याकडे आपल्या मनातली गोष्ट बोलते त्या दरम्यान देशाला स्वातंत्र्य मिळते. सगळीकडे आनंदोत्सव साजरा केला जात असताना सुमित्राची भावना, तिचे विचार याला मात्र समाजाच्या पारंपरिक पारतंत्र्य जखडून गेलेले आहेत. समलैंगिक व्यक्तींबाबत समाजात असलेली भावना, त्यामुळे समलैंगिक व्यक्तींची होणारी घुसमट, उदासीनता दिग्दर्शकाने पडद्यावर मांडली आहे. सुमित्रा या व्यक्तिरेखेद्वारे उत्तम अभिनयाचे प्रकटीकरण वीणा जामकर यांनी केले असून विन्याच्या भूमिकेतील संदीप खरे आणि उर्मीच्या भूमिकेतील मृण्मयी देशपांडे यांनीही दिग्दर्शकाला उत्तम साथ दिली आहे. आजच्या रंगीत आणि उत्तमोत्तम तंत्रज्ञानयुक्त चित्रपटांच्या काळात दिग्दर्शक रवी जाधव यांनी या लघुपटासाठी कृष्णधवल माध्यम निवडले असून ही बाब प्रेक्षकाला अनोखी वाटली तरी समर्पक वाटते. ‘बायोस्कोप’ या चित्रपटाच्या सुरुवातीला करण्यात आलेली कॅलिग्राफी आणि गुलजार यांचे निवेदन आणि त्यामागून येणारे त्यांचे चित्र या गोष्टी अतिशय कलात्मक आणि सुंदररीत्या पडद्यावर झळकतात. त्यामुळे सुरुवात चुकवू नये हे नमूद करायला हवे. अशा पद्धतीचा चार लघुपट, चार विषय, चार गोष्टी, चार दिग्दर्शक असा हा नावीन्यपूर्ण प्रयोग रुजण्याच्या दृष्टीने ‘बायोस्कोप’ हा पथदर्शक चित्रपट ठरायला हरकत नाही.
बायोस्कोप
निर्माता – अभय शेवडे
प्रस्तुती – शेखर ज्योती (पीएसजे एंटरटेनमेंट)
लघुपट – दिल ए नादान
दिग्दर्शक, कथा, पटकथा संवाद – गजेंद्र अहिरे
संगीत – नरेंद्र भिडे
गायिका – शुभा जोशी, राजेश दातार, शिल्पा पुणतांबेकर
लघुपट – एक होता काऊ
कथा-दिग्दर्शक – विजू माने
पटकथा – विजू माने, सतीश लाटकर
संवाद – सतीश लाटकर
संगीत – सोहम पाठक
लघुपट – बल
दिग्दर्शक – गिरीश मोहिते
कथा-संवाद – अभय दाखणे
पटकथा – गिरीश मोहिते
संगीत – अविनाश विश्वजित
लघुपट – मित्रा
दिग्दर्शक, पटकथा, संवाद – रवी जाधव
कथा – विजय तेंडुलकर
संगीत – सलील कुलकर्णी
चार चित्रपटांतील अन्य कलावंत – उदय सबनीस, अंगद म्हसकर, सागर कारंडे, विद्याधर जोशी, संपदा जोगळेकर व अन्य.