नये-पुराने, अच्छे-भले सब दोस्तों के लिए ‘वुई चॅट’ असू देत नाही तर गुगलची रियुनियनची जाहिरात असू दे.. या वर्षी सोशल साइट्स आणि गुगल, मायक्रोसॉफ्टच्या जाहिरातींनी आजवर त्यांच्या कह्यात न आलेल्या वर्गाला जाहिरातींच्या माध्यमातून थेट आपल्याकडे वळवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. अवघ्या काही सेकंदांत मोठा विषय मांडू पाहणाऱ्या जाहिरातींनी यावर्षी तंत्र आणि स्टाइल यांच्या पुढे जात मानवी भावभावनांचे मार्केट करण्यावर जास्त भर दिला असल्याचे लक्षात येते.
‘वुई चॅट’, फाळणीमुळे वेगळ्या झालेल्या दोन मित्रांना एकत्र आणणारे  ‘गुगल रियुनियन’, नोकरी असू दे नाही तर मुलांच्या अभ्यासातील शंका असू दे.. मायक्रोसॉफ्ट आणि गुगलच्या विविध तंत्रांचा कुशल वापर करून आपली छाप पाडणाऱ्या आजच्या अत्याधुनिक जमान्यातील आई अशा जाहिरातींनी या वेळी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. बिस्किटपासून ते लॅपटॉपपर्यंत आणि दागिन्यांच्या जाहिरातींपासून ते मॅट्रिमोनिअल, बँकोंच्या जाहिरातींपर्यंत प्रत्येक विषयात प्रेक्षकांना भावनिकदृष्टय़ा त्यात अडकवण्याची किमया जाहिरातकर्त्यांनी साधली आहे. किंबहुना, मंदी आणि महागाईच्या गर्तेत सापडलेल्या लोकांना आपल्या उत्पादनांपर्यंत आणण्यासाठी एक भावनिक दुवाच जोडला गेला पाहिजे, यावर जाहिरात एजन्सींनी भर दिला आहे, अशी माहिती ‘बीबीडीओ’ या जाहिरात संस्थेचे अध्यक्ष जोसी पॉल यांनी दिली आहे.
‘ओल्ड स्पाइस’च्या जाहिरातीत तर दोन पिढय़ांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ऐंशीच्या दशकात मिलिंद सोमणने ‘ओल्ड स्पाईस’ची जाहिरात केली होती. आता पुन्हा एकदा मिलिंदबरोबर नव्या मॉडेल्सना जाहिरातीत एकत्र आणत केलेल्या ‘ओल्ड स्पाईस’च्या जाहिरातीला या वर्षीच्या उत्कृष्ट जाहिरातींमध्ये स्थान मिळाले आहे. ‘तनिष्क’ने केलेली पुनर्विवाहाची जाहिरात असू दे नाही तर पत्नी आवड म्हणून नोकरी करते आहे, असे आपल्या आई-वडिलांना पटवून देणाऱ्या नवऱ्याची ‘मॅट्रिमोनिअल’ साइटची जाहिरात असू दे बदलत्या काळातील बदललेल्या आधुनिक विचाराच्या स्त्रियांचे प्रतिबिंबही या जाहिरातींमधून चपखलपणे उमटले आहे. तर बँकांच्या जाहिरातींसाठीही आता ठेवी आणि व्याजदर यापलीकडे जात ग्राहक आणि बँकांमध्ये मैत्रीचे नाते कसे महत्त्वाचे आहे हे सांगणारी ‘आयडीबीआय’ची जाहिरातही लोकांच्या ‘भावनिक’तेला आव्हान करणारी ठरली आहे. यापुढे, उत्पादनांची गरज किती आहे यापेक्षाही त्याचे तुमच्या आयुष्यात काय स्थान आहे हे पटवून देत जाहिरात करण्यावर जाहिरात एजन्सीचा भर राहणार आहे.

Story img Loader