इमरान हाश्मीचा ‘चीट इंडिया’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर आता सिनेमामधील गाणी टप्प्याटप्प्याने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ३ जानेवारी रोजी ‘फिर मुलाकात होगी कभी’ नावाचे गाणे युट्यूबवर प्रदर्शित करण्यात आले. हे गाणे अनेकांना आवडले असून अवघ्या चार दिवसांमध्ये गाण्याला ५० लाख हिट्स मिळाले आहेत. या गाण्यामध्ये इमरान पेटी वाजवताना दाखवण्यात आला आहे. एकीकडे हे गाणे आवडत असतानाच दुसरीकडे इमरानचे हे असे पेटी वाजवणे अनेकांना खटकलं आहे. त्यामुळे ‘भाईसाहब, ये किस लाइन मै आ गए आप’, असं म्हणत इमरानला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.
आपल्या चुंबन दृष्यांमुळे सिनेचाहत्यांमध्ये लोकप्रिय असणारा इमरान हाश्मी आता वेगवेगळ्या पठडीतील सिनेमांमधून प्रेक्षकांच्या समोर येत आहे. तरीही अनेकांच्या मनात आजही त्याची तीच ओळख प्रसिद्ध आहे. त्यामुळेच ‘चीट इंडिया’चे ‘फिर मुलाकात होगी कभी’ गाण्याचा व्हिडिओ प्रदर्शित झाल्यानंतर नेटकऱ्यांना असा पेटी वाजवणारा, कुर्ता घातलेला इमरान थोडा खटकलाच. त्यामुळेच त्यांनी त्याच्या या लूकला ट्रोल केले आहे. ‘वेलकम’ सिनेमामधील अक्षय कुमारचा ‘भाईसाहब, ये किस लाइन मै आ गए आप’ हा संवाद वापरत इमरानला तू तुझी ओळख सोडून इकडे कोणत्या क्षेत्रात आला आहेस असा खोचक चिमटा काढण्यात आला आहे. तर ‘मराठी मीम’ नावाच्या एका मराठी पेजने ‘मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं’ या गाण्यांच्या ओळी या फोटोवर टाकून या फोटोला मराठमोळा टच दिला आहे. प्रशांत दामले हे नुकताच प्रदर्शित झालेल्या मुंबई-पुणे-मुंबई ३ या सिनेमात पेटी वाजवत हे गाणे म्हणतानाची अनेक दृष्ये होती त्याच पार्श्वभूमीवर हे मीम बनवण्यात आले आहे. पाहुयात असेच काही व्हायरल मिम्स:
When emraan hashmi gets high . pic.twitter.com/DxYYRsPgP2
— ᴠɪᴠᴇᴋ (@unseeenguy) January 7, 2019
इंजीनिअर किंवा मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचा थप्पा मिळवण्यासाठी जो काही गैरकारभार चालतो, कशाप्रकारे डमी विद्यार्थांना परीक्षेसाठी बसवलं जातं, हे सगळं आगामी ‘चीट इंडिया’ या चित्रपटातून समोर येणार आहे. देशाच्या शिक्षणव्यवस्थेतील भ्रष्टाचारावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटात इमरान हाश्मी मुख्य भूमिका साकारत आहे.
‘उपरवाला दुआ कबूल करता है, मै सिर्फ कॅश लेता हूँ’,’ असं म्हणणारा इमरान परीक्षांमध्ये डमी विद्यार्थ्यांना बसवून श्रीमंत मुलांकडून पैसे उकळत असतो. श्रीमंत मुलांकडून पैसे घेऊन काही गरीब गरजू विद्यार्थ्यांचे खिसे भरले तर मी काय चुकीचं केलं, असाही प्रश्न तो विचारतो.
इमरान या चित्रपटाचा सहनिर्माता असून ‘गुलाब गँग’चे दिग्दर्शक सौमिक सेन यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. ठाकरे सिनेमाबरोबर सिनेमाचे प्रदर्शन टाळत निर्मात्यांनी एक आठवडा आधीच म्हणजे १८ जानेवारी रोजी हा सिनेमा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.