हिंदी किंवा हिंग्लिश ऐकणाऱ्यांची संख्या आपल्याकडे भरपूर आहे. मग इंग्लिश एफएम किती ऐकलं जातं? तिथल्या आरजेंचं काम कसं चालतं?

महाराष्ट्रात सर्वसामान्यांची बोलीभाषा मराठी आहे. ती महाराष्ट्राची राज्यभाषा आहे. दुसरीकडे हिंदी ही राष्ट्रभाषा इथे बोलली- ऐकली जाते. बहुतांशी वेळेला या दोन भाषांमध्येच प्रसारमाध्यमं काम करतात. याबरोबरच तिसरी आणि महत्त्वाची भाषा, म्हणजे इंग्रजी. अनेक ऑफिसेसमध्ये म्हणजे कामाच्या ठिकाणी, शाळा-कॉलेजमध्येदेखील इंग्रजी ऐकलं आणि बोललं जातं. बऱ्याच घरांमध्ये इंग्रजी वर्तमानपत्र वाचलं जातं, टीव्हीवरचे इंग्रजी कार्यक्रम, बातमीपत्र बघितलं जातं, इंग्रजी सिनेमांचाही आस्वाद घेतला जातो. या सर्व माध्यमांमध्ये मागे राहाणारं माध्यम म्हणजे इंग्रजी रेडिओ.

बाकी सर्व गोष्टी आपण इंग्रजीमध्ये ऐकतो, बोलतो, वाचतो. तरी इंग्रजी रेडिओ आपण कमी ऐकतो. तरुणांमध्ये इंग्रजी गाणी ऐकण्याची क्रे झ आहे. पण हिंदी आणि मराठी रेडिओच्या तुलनेत इंग्रजी रेडिओ कमी ऐकला जातो. इंग्रजी रेडिओ ऐकणाऱ्यांचा वेगळा वर्ग आहे. इंग्रजी रेडिओ ऐकणारा वर्ग जास्तकरून शहरात सापडतो. जे नेहमी इंग्रजी रेडिओ ऐकत नाहीत त्यांना या रेडिओ कार्यक्रमात काय काय असतं, हिंदी आणि मराठी कार्यक्रमापेक्षा हे कार्यक्रम काही वेगळे असतात का? आणि तरुणांना इंग्रजी आर. जे म्हणून किती स्कोप आहे अशी उत्सुकता नक्कीच वाटत असणार. या संदर्भात बोलताना नावाजलेले इंग्रजी आर. जे अंकित वेंगुर्लेकर म्हणाले की, दिवस तीन भागांत विभागला जातो. सकाळ, दुपार आणि रात्र. सकाळच्या कार्यक्रमांना ड्राइव्ह टाइम शोज् म्हणतात. त्या वेळी बहुतेक लोक प्रवास करत असतात. ऑफिसला, कॉलेजला जाण्याची ती वेळ. दुपारच्या वेळेला रिक्वेस्ट शोज् असतात. आपल्या आवडीच्या गाण्याची फर्माइश करायची आणि त्यानुसार आर. जे गाणं वाजवतात. रात्रीच्या वेळी (पार्टी साँगज्) पार्टीत वाजवली जाणारी गाणी अर्थात ज्या गाण्यांवर नाच करता येईल अशी गाणी लावली जातात. सध्या आपल्याकडे निखिल चिन्नाप्पाची गाणी बहुतेककरून वाजवली जातात. रेडिओ वन या पूर्णपणे इंग्रजी एफएम स्टेशनमध्ये शनिवार-रविवार ज्याला वीकेंड म्हणतात त्या दिवशी आंतरराष्ट्रीय इंग्रजी कार्यक्रम प्रसारित केले जातात. हे कार्यक्रम सलग पाच-सहा तास चालतात. अमेरिकन टॉप फॉर्टी हा कार्यक्रम तरुणांकरिता असतो तर ब्लूज् म्युझिक या कार्यक्रमाला तरुणेतर श्रोत्यांची पसंती असते. चार-चार तासांचे कार्यक्रम असतात. त्या चार तासांत एक तास मुलाखत, कधी एक तास तांत्रिक उपकरणांवर माहिती, कधी गडय़ांबद्दल माहिती अशा विविध विषयांवर आधारित हे सर्व कार्यक्रम असतात. आर. जे. पूर्ण स्क्रििप्टग करत नाही ते उस्फूर्त (स्पॉन्टेनिअस) असतं. कधी कधी  स्क्रिप्ट म्हणून मुद्दे लिहून आणतो. कुठल्याही गोष्टीची आकडेवारी सांगायची असेल तर मात्र ती बरोबरच असायला हवी म्हणून आकडेवारी लिहून आणतो. अंकित पुढे असं म्हणाले की, रेडिओ वनच्या मुंबई स्टेशनमध्ये अनुभवी (सीनिअर) आर.जेज्ना प्राधान्य दिलं जातं. पण रेडिओ वनच्या बंगलोर, दिल्ली आणि इतर स्टेशनस्मध्ये नवीन, तरुण मुलांना प्राधान्य दिलं जातं. याचं कारण की मुंबई सोडून बाकी सर्व ठिकाणी बरेच इंग्रजी रेडिओ स्टेशन्स आहेत.

अंकित असं सांगतात की,  हिंदी रेडिओच्या तुलनेत इंग्रजी रेडिओ एक दशांश इतका कमी ऐकला जातो. तरी पण इंग्रजी रेडिओ स्टेशन्सना असणाऱ्या जाहिराती प्रीमियम असतात. ३० ते ४० टक्के जाहिराती या फक्त इंग्रजी रेडिओकरिता असतात. यात महागडय़ा गाडय़ा, हॉलीवूड चित्रपट, आंतरराष्ट्रीय पर्यटन अशा महागडय़ा वस्तूंच्या जाहिराती असतात.

आकाशवाणीच्या एफ.एम. रेनबोचे इंग्रजी आर.जे. एलरिक म्हणाले की दिवसाला तीन तासांचे तीन इंग्रजी टाइम स्लॉट असतात. म्हणजे सकाळी आठ ते ११ संथ चालींची गाणी असतात. दुपारी चार ते सात अनवाइंड आणि रात्री दहा ते एक थीमवर आधारित गाणी असतात. पुढे इंग्रजी गाण्यांच्या विविध प्रकारांबद्दल बोलताना ते म्हणाले की हिंदी, मराठी चित्रपटांत जशी गाणी असतात तशी आणि तेवढी गाणी इंग्रजी चित्रपटात नसतात. इंग्रजी चित्रपटात गीतांचं प्रमाण खूपच कमी आहे. आर्टिस्टची (कलाकारांची) गाणी असतात, जुनी गाणी असतात ज्याला रेट्रो म्हणतात. पॉप म्यूझिक, रॉक, रेगे, जॅझ, डिस्को असे इंग्रजी गाण्यांचे प्रकार आहेत. यात नेमका फरक असा की पॉपमध्ये वाद्य खूप मोठय़ांनी वाजवलेली नसतात. गाण्याचे शब्द व्यवस्थित ऐकू येतात. रॉकमध्ये याच्या उलट असतं म्हणजे हेवी म्यूझिक असतं. रॉक म्यूझिकमध्ये बऱ्याचदा गिटार या वाद्याचा वापर जास्त केलेला दिसतो. रेगे हा पण एक प्रकार आहे. यात वेगळ्या प्रकारचा कॅरेबियन ठेका असतो. डिस्को या प्रकारात डिस्को बीट्स म्हणजे पाय थिरकतील असा ठेका असतो. जॅझमध्ये विंड इन्स्ट्रमेंटचा वापर केला जातो. पूर्वी अमेरिकेत जेव्हा गुलामशाही होती त्या वेळेला ते गुलाम वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करून जो ठेका तयार करायचे तशा प्रकारच्या ठेक्यावर आधारलेलं हे जॅझ म्यूझिक  आहे. एलरिक पुढे म्हणाले की जुनी इंग्रजी गाणी दोन ते अडीच मिनिटे एवढय़ाच कालावधीची असायची. पण नवीन इंग्रजी गाणी तीन मिनिटांपासून ते आठ मिनिटांपर्यत मोठी आहेत.  काही गाणी तर अकरा मिनिटांएवढी मोठी आहेत. श्रोत्यांचा अनुभव सांगताना ते म्हणाले चांगले-वाईट दोन्ही प्रकारचे अनुभव येतात. पण चांगल्या-वाईटपेक्षा काही श्रोते काही शिकवून जातात. माझ्या अगदी सुरुवातीच्या काळी जेव्हा नुकतीच आर.जेईंगला सुरुवात केली होती त्या वेळी मी क्लासिकल गाण्यामध्येदेखील अनाउन्समेंट देत होतो नेहमीच्या पद्धतीप्रमाणे. पण मग एका सुजाण श्रोत्याने माझ्या हे लक्षात आणुन दिलं की क्लासिकल गाण्यांमध्ये अनाउन्समेंट केलेली चांगली वाटत नाही.

आपण कुठल्याही भाषेत आर.जे. म्हणून काम करत असू तरी ती भषा स्वच्छ, शुद्ध येणं महत्त्वाचं. तसंच आपल्या आवाजाकडे आपण लक्ष द्यायला हवं, त्याची काळजी घ्यायला हवी. श्रोत्यांशी चांगल्या तऱ्हेने संवाद साधता आला पाहिजे. आपण बोलत असलेल्या विषयाची व्यवस्थित माहिती आपल्याला हवी. या सर्व गोष्टी जर आपल्याकडे असतील तर आपण चांगला आर.जे. होण्याचा विचार नक्कीच करू शकतो.
ग्रीष्मा जोग बेहेरे – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader