मराठी चित्रपटांमधून विविधांगी भूमिकांनी आपला स्वतंत्र ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर पुन्हा एकदा एका वेगळ्या भूमिकेतून आपल्यासमोर येणार आहेत. गणेश कदम दिग्दर्शित, विकास कदम लिखित ‘विटी दांडू’ या चित्रपटात दिलीप प्रभावळकर आजोबांच्या भूमिकेत दिसणार आहेत. स्वातंत्र्यलढय़ाच्या काळातील आजोबा, एकीकडे ब्रिटिशांच्या जुलमापासून आपल्या लहानग्या नातवाचे निरागस आयुष्य करपू नये म्हणून ‘साहेबा’च्या संस्कृतीची, त्याच्या शिष्टाचारांची नातवाला ओळख करून देत ते त्याला आपलेसे करायला लावणारे ‘दाजी’ दुसरीकडे नातवाने आपल्या संस्कृतीची, आचारविचारांची नाळ सोडू नये म्हणूनही झटतात. अतिशय संयत आणि समंजस अशी ‘दाजीं’ची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या दिलीप प्रभावळकर यांच्याशी गप्पा मारण्याचा योग ‘विटी दांडू’च्या निमित्ताने आला. ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात भेटीसाठी आलेल्या दिलीप प्रभावळकर यांनी आपली चित्रपट कारकीर्द, लेखन प्रवास, तरुण निर्माते-दिग्दर्शकांबरोबरचा अनुभव अशा अनेक विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. या चित्रपटाचे दिग्दर्शक गणेश कदम आणि बालकलाकार निशांत भावसार हेही या वेळी उपस्थित होते.
अभिनेता म्हणून ते जसे प्रसिद्ध आहेत, तसेच एक प्रतिभावंत लेखक म्हणूनही दिलीप प्रभावळकर प्रसिद्ध आहेत. मात्र, या दोघांपैकी नेमकी कोणती भूमिका त्यांना जास्त आवडते असे विचारल्यावर अभिनयापेक्षा आपल्याला लेखनातच जास्त रस असल्याचे त्यांनी सांगितले.
‘मी जसा दिग्दर्शकांचा ‘नट’ आहे तसा मी प्रकाशक आणि संपादकांचा लेखक आहे. मला प्रासंगिक आणि विनोदी लेखन करायला जास्त आवडते. अभिनय आणि लेखन यापैकी मला लेखनाचे समाधान सगळ्यात जास्त आहे. लेखनासाठी मिळालेला पुरस्कार मला अधिक आनंद देतो. लेखन करायला मला आवडत असले तरी त्यासाठी कोणीतरी माझ्या मागे लागावे लागते. असे ‘लिहा’ म्हणून मागे लागले की मग मी लेखणी उचलतो’.
‘लोकसत्ता’चे माजी संपादक डॉ. अरुण टिकेकर हे ‘लोकसत्ता’च्या रविवार पुरवणीत काहीतरी लिहा म्हणून मागे लागले. माझा पिच्छा काही त्यांनी सोडला नाही. त्या वेळी मी ‘अनुदिनी’ शीर्षकाखाली लेखन केले. ते सदर खूप लोकप्रिय झाले. याच ‘अनुदिनी’वर आधारित ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ ही मालिका तयार झाली आणि तीही गाजली. ‘आकाशवाणी’साठीही माधव कुलकर्णी यांच्या आग्रहावरून ‘बोक्या सातबंडे’ ही काही भागांची श्रुतिका लिहिली. आकाशवाणीवरून याचे अनेक भाग प्रसारित झाले. पुढे याच ‘बोक्या सातबंडे’वर मालिका, चित्रपट निघाला. राजहंस प्रकाशनाचे दिलीप माजगावकर यांच्या सांगण्यावरून ‘बोक्या सातबंडे’च्या श्रुतिकांवरून कथेच्या स्वरूपात लेखन केले. त्याची पुस्तके राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केली. त्याचे दहा भाग प्रकाशित झाले असून तीन भागांची अठरावी आवृत्ती प्रकाशित झाली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यापेक्षा मला चित्रपट लिहायला अधिक आवडेल.
तरुण दिग्दर्शकांबरोबर काम
मराठीत गेल्या काही वर्षांत तरुण निर्माते आणि दिग्दर्शकांकडून वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट सादर केले जात आहेत. प्रेक्षकांकडून या चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मराठी चित्रपटसृष्टीत केले जाणारे हे प्रयोग निश्चितच कौतुकास्पद आहेत. या प्रयोगात एक अभिनेता म्हणून मला साक्षीदार होता आले आणि चित्रपटातून वैविध्यपूर्ण भूमिका करता आल्या, याचा मला आनंद आणि समाधान आहे. गेल्या एक-दोन वर्षांतील काही वैविध्यपूर्ण चित्रपट घेतले तर त्यात मला या सर्व तरुण निर्माते आणि दिग्दर्शकांबरोबर काम करता आले. ही मंडळी त्यांच्या स्वत:च्या कल्पना आणि ऊर्जा घेऊन चांगले काम करत आहेत. त्यांच्या कामाची झलक या चित्रपटातून प्रेक्षकांनाही पाहायला मिळाली आहे. या चित्रपटांमधून मला अक्षरश: वैविध्यपूर्ण आणि मी आजवर कधी केल्या नव्हत्या, अशा भूमिका करायला मिळाल्या. एक कलाकार म्हणून माझ्यासाठीही ते आव्हान होते. अशा चित्रपटांमध्ये एक अभिनेता म्हणून सहभागी होण्याचे व त्या चित्रपटांचा साक्षीदार होण्याचे भाग्य मला मिळाले.
वैविध्यपूर्ण भूमिका
‘जयजयकार’ या चित्रपटात तृतीय पंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम करणाऱ्या ‘निवृत्त मेजर’ची भूमिका मला मिळाली. ‘नारबाची वाडी’मध्ये कोकणातील इरसाल आणि वल्ली ‘वृद्ध कोकणी शेतकरी’ मी रंगविला. ‘देऊळ’मध्येही मी वेगळ्या भूमिकेत होतो. ‘पोष्टकार्ड’मध्ये वखारीत काम करणारा ‘जख्ख म्हातारा’ आणि ‘लाकूडतोडय़ा’ मला करायला मिळाला. ‘पोश्टर बॉइज’मध्ये पुन्हा मला वेगळ्या प्रकारची भूमिका करायला मिळाली. तर ‘आजोबा’ चित्रपटातही वेगळी भूमिका होती. काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘चौकट राजा’ या चित्रपटात मी मतिमंद असलेल्या ‘नंदू’ची भूमिका केली होती. या सर्वच चित्रपटांच्या माध्यमातून आदित्य सरपोतदार, शंतनू रोडे, गिरीश कुलकर्णी, गजेंद्र अहिरे, समीर पाटील, सुजय डहाके या तरुण दिग्दर्शकांबरोबर काम करायला मिळाले. ‘मर्डर मेस्त्री’ आणि ‘हजार वेळा शोले पाहिलेला माणूस’ या आगामी चित्रपटातही मी वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. ज्या चित्रपटांतून मी काम केले नव्हते, असे काही चांगले चित्रपटही गेल्या दोन-चार वर्षांत प्रदर्शित झाले आहेत. एकूणच मराठी चित्रपट बदलतोय, वेगळे विषय हाताळले जात आहेत.
आजोबा-नातवाची गोष्ट
‘विटी दांडू’ ही आजोबा आणि नातवाची गोष्ट आहे. चित्रपटाची पाश्र्वभूमी स्वातंत्र्यलढय़ाची असून लेखक आणि दिग्दर्शकाने ‘विटी दांडू’चा उपयोग यात खुबीने करून घेतला आहे. हा चित्रपट म्हणजे ‘चित्रभाषा’ आहे. थोडाफार हेकट, एककल्ली आणि नातवावर ओरडणारा आणि त्याला जपणारा असा ‘आजोबा’ मी यात रंगविला आहे. पाश्चात्त्य संस्कृतीच्या आक्रमणापासून नातवाला वाचविण्याचा प्रयत्न करणारी आणि त्याला आपली संस्कृती व परंपरा याची ओळख करून देणारी ही ‘दाजी’ ही व्यक्तिेरखा आहे. एका वेगळ्या भूमिकेत काम करण्याचे समाधान मला या चित्रपटाने मिळाले.
हरवत चाललेल्या संस्कृतीचे जतन
आजची तरुण पिढी आणि विद्यार्थी मोबाइल आणि संगणकाच्या आक्रमणात गुरफटले आहेत. नात्यांमध्ये दुरावा येत चाललाय. आपापसातील प्रत्यक्ष असून संवाद कमी झाला आहे. लोप पावत चाललेले हे नातेसंबंध पुन्हा जोडण्यासाठी आणि विसरत चाललेल्या संस्कृतीचे जतन व संवर्धनाचा प्रयत्न या चित्रपटाद्वारे केला आहे. आजोबा आणि नातू यांच्या नातेसंबंधांचा वेध यात घेण्यात आला आहे. चित्रपटात भारूड, पोवाडाही पाहायला मिळेल.
गणेश कदम, दिग्दर्शक
मजा आली
काम करताना खूप मजा आली. सेटवर चित्रीकरणाच्या वेळेसही आम्ही खूप मस्ती केली. चित्रपटातील एक दृश्य साकारताना मी खूप घाबरलो होतो. झाडावरून खाली उडी टाकण्याचा प्रसंग होता. मला केबल लावली होती. ती केबल डोळ्याला लागली आणि डोळा सुजला. तेव्हा मी घाबरलो होतो.
निशांत भालेराव
चित्रपटातील बाल कलाकार
*या कार्यक्रमाचा व्हिडीओ पाहाण्यासाठी भेट द्या http://www.YouTube.com/LoksattaLive