रेश्मा राईकवार

मनोरंजनाचा व्यावसायिक मसाला, त्याला थोडा भावनिक नाट्याचा तडका, देशासाठी वाटेल ते करायची तयारी असलेला नायक आणि त्याच्यासारख्या काही लोकांचा समूह. मग दुसरीकडे कधीकाळी त्यांच्यासारखाच देशाभिमानी असलेला आणि आता खलनायक झालेला ननायक. त्याची वेगळी सेना. पुढे देशाबद्दलचा आपला अभिमान सिद्ध करायचा असेल तर मग आपल्या शत्रूंचा उल्लेख व्हायला हवा ते कोण हे नव्याने सांगायला नको… थोड्याफार फरकाने हाच साचा वापरून अनेक हिंदी चित्रपटांच्या गर्दीतही यशस्वी चित्रपट देणं दिग्दर्शक अली अब्बास जफरला आतापावेतो छान जमलं होतं. मात्र ‘बडे मियाँ छोटे मियाँ’मध्ये दोन ताकदीच्या अभिनेत्यांना घेऊन प्रेक्षकांना त्याच साच्यात बसवण्याचा त्याचा प्रयत्न पुरेपूर फसला आहे.

Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
prince narula yuvika chaudhary lohri celebration with daughter
सोशल मीडियावरील मतभेदानंतर ‘बिग बॉस’ फेम जोडपे प्रथमच दिसले एकत्र; लेकीसह साजरी केली लोहरी, फोटो आले समोर
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : सत्ताधाऱ्यांच्या लांगूलचालनाचे उदाहरण
magsaysay award sonam wangchuck
खरा ‘रँचो’ कोणता? महावीरचक्र विजेता, की मॅगसेसे विजेता? विकीपीडियाने…
Nagpur 3 idiot latest news in marathi,
नागपूर : ‘थ्री इडियट’ फेम सोनम वांगचुक म्हणाले, “विकास करतोय याचा अहंकार नको…”
shikaayla gelo ek marathi drama review
नाट्यरंग : शिकायला गेलो एक! व्यंकूची ‘आज’ची शिकवणी
Loksatta chaturang padsad loksatta readers response letter
पडसाद : स्वार्थ आणि परमार्थ साधायचा असेल तर…

ॲअॅक्शनपटांच्या बाबतीत अनुभवी खिलाडी कलाकार अक्षय कुमार आणि त्याच्यापेक्षा अनुभवाने कमी असला तरी ॲक्शनच्या बाबतीत स्वत:चे वेगळेपण सिद्ध केलेला टायगर श्रॉफ असे दोन चांगले कलाकार दिग्दर्शक अली अब्बास जफर याच्या हाताशी होते. त्यामुळे या दोघांचं साहसी दृश्य देण्यातील कौशल्य, हाणामारीची शैली मध्यवर्ती ठेवून ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ची कथा गुंफण्यात आली आहे. ॲक्शनपटांच्या ठाशीव आणि यशस्वी साच्यानुसार दोघंही या देशाचे कर्तव्यनिष्ठ सैनिक आहेत. पराक्रमाच्या बाबतीत इतरांपेक्षा असामान्य आहेत, थोडे विक्षिप्त आहेत. ते एकत्र कसे आले वा त्यांच्यात पडद्यावर दिसणारी घट्ट मैत्री कशामुळे हे फारसं सांगण्याच्या भानगडीत न पडता दिग्दर्शकाने त्याच्या या दोन नायकांसमोर एक मोठं आव्हान उभं केलं आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली गोष्ट गुप्तरीत्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्तात हलवली जात आहे. त्याच वेळी रणगाडा, शस्त्रास्त्राने सज्ज असलेली गाडी, वरून चॉपर अशा भलत्याच जामानिम्यासह एक मुखवटाधारी सगळी सुरक्षा भेदून ती गुप्त गोष्ट आपल्या ताब्यात घेतो. यानंतर या मुखवटाधारी खलनायकाच्या मनात नेमकं काय आहे हे शोधून ती गुप्त गोष्ट पुन्हा आपल्याकडे आणत देशाला भयंकर मोठ्या संकटापासून वाचवण्याचं आव्हान वर उल्लेख केलेल्या बडे म्हणजेच फ्रेडी (अक्षय कुमार) आणि छोटे ऊर्फ रॉकी (टायगर श्रॉफ) या दोघा महत्त्वाच्या अधिकाऱ्यांवर आहे. मग कधी भूतकाळात तर कधी वर्तमानात असं मागेपुढे करत पाठलागाच्या या सुसाट गोंधळातून चित्रपटाची कथा वळणावळणाने सुफळ संपूर्ण होते.

हेही वाचा >>>‘देवमाणूस’ किरण गायकवाडच्या चित्रपटाची पहिली झलक प्रकाशित

चित्रपटाची कथा ओढूनताणून गुंतागुंतीची करण्यात आली आहे. खरंतर, या चित्रपटात कथेपेक्षा अक्षय आणि टायगर दोघांचं एकत्रित रसायन महत्त्वाचं ठरलं असतं. दोघं ॲक्शनदृश्यात पारंगत आहेत, शिवाय दोघांचे परस्पर विरोधी स्वभाव आणि वैशिष्ट्य यांचा उपयोग करून घेत वातावरण विनोदी वा हलकंफुलकं करण्याचं कौशल्य मुळात त्या दोघांकडेही आहे. केवळ अॅक्शन किंवा हाणामारी ही त्यांची खासियत नाही. या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी म्हणून का होईना दोघांनी ज्या एकत्रित छोट्या छोट्या गमतीशीर दृश्यफिती समाजमाध्यमांवर प्रसारित केल्या त्यावरून त्यांच्यात असलेली मैत्री आणि दोघांनाही असलेली विनोदाची जाण लक्षात येते. मात्र चित्रपटात अगदी नावाला हे दोघं विनोद करताना दिसतात. बाकी त्यांचा पावणेतीन तासांचा सारा वेळ मोठमोठ्या बंदुका घेऊन गोळीबार करण्यात वा शत्रूला लोळवण्यात गेला आहे. जोडीला मानुषी छिल्लर, सोनाक्षी सिन्हा आणि अलाया एफ अशा तीन तीन नायिका आहेत. मात्र त्यांचाही काही फारसा उपयोग करून घेतलेला नाही. त्यातल्या त्यात मानुषीच्या वाट्याला काही ॲक्शनदृश्ये आहेत, तर अलायाने खूप हुशार पण काहीशी तर्कट संशोधकाची भूमिका चांगली रंगवली आहे. खलनायक म्हणून पृथ्वीराज सुकुमारन या ताकदीच्या दाक्षिणात्य नायकाला मुखवट्यामागे उभं केलं आहे. पृथ्वीराजनेही आपल्या भूमिकेला न्याय दिला असला तरी त्याची व्यक्तिरेखा खलनायक म्हणून मर्यादित करून टाकली आहे.

दिग्दर्शक अली अब्बास जफरने याआधीही ॲक्शनपट केलेले आहेत. त्यामुळे ॲक्शनपटाला साजेसा वेग, त्यानुसार गुंतागुंतीची कथा वगैरे सगळ्या गोष्टी चोख जमवून आणल्या आहेत. मात्र तंत्राच्या खेळापलीकडे गोष्टीशी जोडून घेणारा काहीएक भावनिक धागा असावा लागतो. तो या चित्रपटात कुठेच नाही. कुठल्याही एका प्रसंगाने आपल्या मनाची पकड घेतली आहे असंही काही होत नाही. गाण्यांच्या बाबतीतही फारसं काही चांगलं ऐकायला मिळत नाही. त्यामुळे उत्तम व्हीएफएक्सचा वापर करून रंगवलेली तीन तासांची हाणामारीची गोष्ट चित्रपटात पाहायला मिळते. ज्या दिग्दर्शकांच्या नावावर चित्रपटांना प्रेक्षक गर्दी करतात त्या काही मोजक्या दिग्दर्शकांमध्ये अली अब्बास जफरची गणना होते. त्यामुळे त्याच्याकडून हा देशभक्तीचा मुलामा देत केलेला भावशून्य हाणामारीपटाचा अनुभव प्रेक्षकांची साफ निराशा करतो.

बडे मियाँ छोटे मियाँ

दिग्दर्शक – अली अब्बास जफर

कलाकार – अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, मानुषी छिल्लर, सोनाक्षी सिन्हा, पृथ्वीराज सुकुमारन, रोनित रॉय, अलाया एफ.

Story img Loader