|| रवींद्र पाथरे
‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’
नव्वदच्या दशकात एकीकडे नवनवोन्मेषशाली प्रशिक्षित रंगकर्मी नवे विषय, नवा आशय घेऊन ताज्या जाणिवेनं रंगभूमीवर नाटकं सादर करत होती. कालानुरूप ही पिढी मालिका आणि चित्रपटांकडे वळली. या माध्यमांतून आपल्याला ‘शाश्वत’ काम (जे कालौघात टिकून राहू शकेल! ‘नाटक’ ही या दृष्टीने अशाश्वत कला आहे.) करता येईल आणि अधिक व्यापक जनसमुदायापर्यंत पोहोचता येईल, हा त्यामागे त्यांचा हेतू होता. त्यामुळे रंगभूमीवर निर्माण झालेली ही पोकळी नव्या दमाच्या नाटय़कर्मीनी भरून काढली. त्यात देवेंद्र पेम, संतोष पवार, केदार शिंदे ही मंडळी आघाडीवर होती. ‘नाटक हे मनोरंजनाचं साधन आहे’ हा स्वच्छ हेतू डोळ्यांसमोर ठेवूनच ही नवी पिढी रंगभूमीवर उतरली होती. ‘इम्प्रोव्हायझेशन’ हा परवलीचा शब्द त्यांच्या नाटकांनी मराठी रंगभूमीवर रुजविला. नाटकाची लिखित संहिता अवघ्या १५-२० पानांची.. बाकी सगळा उत्स्फूर्त प्रतिभेचा मामला! त्या, त्या वेळी जे सुचेल ते त्या संहितेत कोंबून ही नाटकं आकाराला येऊ लागली. स्वाभाविकपणेच नाटकातील साहित्यमूल्यं, विषय, आशय, जीवनजाणिवा वगैरेंनी थेट पाठचा बाक पकडला. या त्रयीच्या नाटकांचा प्रेक्षक वाढू लागला तसा मराठी नाटकांचा मूळचा सुशिक्षित, मध्यमवर्गीय, पांढरपेशा प्रेक्षक काहीसा बिथरला. त्याला आशयघन सामाजिक, कौटुंबिक नाटकांची सवय! पण म्हणतात ना- कालाय तस्मै नम:! या मंडळींच्या नाटकांना सुरुवातीला नाकं मुरडणाऱ्या बडय़ा निर्मात्यांनाही अखेरीस या त्रयीच्या यशस्वी फॉर्म्युल्यांशी जुळवून घेण्यावाचून पर्याय उरला नाही. ‘चार घटका डोकं बाजूला ठेवून केलेली करमणूक’ हाच हुकमी फॉर्म्युला झाला. या तिघांचे फॉर्म्युले अर्थात वेगवेगळे होते. एकाने शारीर व्यंगांचा चांगल्या अर्थाने वापर करून विनोदनिर्मिती केली. दुसऱ्याने लोककलांना जवळ करून आपलं बस्तान बसवलं. तर तिसऱ्याने ‘जुळं, तिळं, चौळं’चा फॉर्म्युला यशस्वी केला. तिघांनीही काही काळ मराठी रंगभूमीचं ओझं आपल्या खांद्यावर पेललं. त्यातही सर्वाधिक यशस्वी ठरले ते संतोष पवार. त्यांनी आपल्या करमणूकप्रधान नाटकांनी बराच काळ प्रेक्षकांना बांधून ठेवलं. किंबहुना, त्यांनी एक नवाच प्रेक्षक घडवला. त्याचवेळी रूप, रंग, ‘चेहरे’ नसलेल्या कलावंतांना घेऊनसुद्धा नाटकं यशस्वी करता येतात हे संतोष पवार यांनी सप्रमाण सिद्ध केलं.
‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे!’ हे संतोष पवार यांचं नवं नाटक. यात मात्र त्यांनी आपल्या लोककलांवर आधारित नाटकाच्या फॉर्म्युल्याचा वापर न करता देवेंद्र पेम यांच्या फॉर्म्युल्याला हात घातला आहे. त्यांनी स्वत:च्या ‘दिवसा तू, रात्री मी’ या यशस्वी नाटकाचा डोसही त्यात मिसळला आहे. कर्णबधीर (दादा), मूकबधीर (मुकेश) आणि केवळ दिवसाच दृष्टी असलेल्या एका भावाच्या (नयन) एकत्रित कुटुंबातील दादाची बायको (वहिनी) हीच काय ती ‘नॉर्मल’ आहे. त्यांच्या घरासमोरच्या घरात नव्याने राहायला आलेल्या कुटुंबातले कर्ते पुरुष (नारायण) यांची स्मरणशक्ती अधूनमधून दगा देते. इतकी, की ते आपल्याला बायको (लक्ष्मी) आणि एक तरुण मुलगी (सुनयना) आहे हेही कधी कधी चक्क विसरतात. त्यांच्याशी असलेलं आपलं नातंही त्यांना कधी कधी आठवत नाही. त्यामुळे एकच गोष्ट ते बऱ्याचदा पुन्हा पुन्हा करत राहतात, किंवा मग एखादी केलेली गोष्टही चक्क ते विसरून जातात. सुनयनालाही एक प्रॉब्लेम आहे. तिला दिवसा दिसत नाही. फक्त रात्रीचंच तेवढं दिसतं. त्यामुळे ती रात्रीचीच नोकरी करते. या घरातली गृहलक्ष्मी- लक्ष्मी ही मात्र ‘नॉर्मल’ आहे.
ही सगळी मंडळी आपलं शारीर व्यंग किंवा आपल्यातल्या त्रुटी इतरांपासून लपविण्याचा सदैव आटोकाट प्रयत्न करीत असतात. किंबहुना, आपल्याला असा काही प्रॉब्लेम आहे हेच मुळी नाकारण्याकडे त्यांचा कल असतो. त्यातून मग अनेक गडबडी, घोटाळे घडत राहतात. तरीही आपलं काही चुकलंय हे कुणीच कबूल करायला तयार नसतं. अगदीच अंगाशी आलं तर आणि तरच ते झाली चूक मान्य करतात. आणि हे सगळे गडबडघोटाळे म्हणजेच ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे! ’
अशा या तीन प्रकारच्या तिघा वल्लींना सांभाळणाऱ्या वहिनीला नयनसाठी समोरची सुनयना आवडते. ती तसं नयनला सांगते. तो मग तिला पाहण्यासाठी आतुर होतो. पण संध्याकाळी ऑफिसवरून घरी परतल्यानंतर त्याला दिसायचं बंद होत असल्याने सुनयनाला त्याला बघता येत नाही. तीच गोष्ट सुनयनाचीही. तिला नयनला बघायचं तर रात्रीच बघावं लागणार.. कारण तिला दिवसा दिसत नाही. या सगळ्या झमेल्यात एकमेकांना ‘पाहण्या’पासून ते नयन-सुनयना लग्नाच्या बोहल्यावर चढेपर्यंतचा या दोन कुटुंबांचा प्रवास ही एक धम्माल रोलकोस्टर राईड आहे. सगळ्याच कलावंतांनी ती प्रेक्षणीय केली आहे.
लेखक-दिग्दर्शक संतोष पवार यांनी आंधळा-मुका-बहिरा यांच्या शारीर कमतरतेतून, त्याबद्दलच्या न्यूनगंडातून आणि ते झाकण्याच्या खटपटींतून जे जे काही होऊ शकतं, ते ते या नाटकात अत्यंत बारकाव्यांनिशी टिपलं आहे. खेरीज दिवसा किंवा रात्री दृष्टीहीन होणाऱ्या नयन आणि सुनयनाच्या गमतीजमती त्यांनी यात ‘अॅड’ केल्याने विनोदाचा हा बुस्टर डोस ‘न भुतो न भविष्यती’ असा धमाल उडवून देणारा झाला आहे. तशात विसरभोळ्या नारायणरावांची आणखीन यात भर पडली आहे. म्हणजे मग तर काही विचारूच नका. संतोष पवार यांच्या विनोदाची जातकुळी माहीत असलेल्यांना तर हे नाटक हास्यात बुडवून टाकतंच; शिवाय त्याला त्यांनी ‘पेम फॉर्म्युला’ची फोडणीही झक्कास दिली आहे. या सगळ्या धूमधमालीत योगायोगाने घडणारे गोंधळ आणखीनच धुमशान आणतात. नाटकाची काही वेळा केलेली अतिशयोक्तीपूर्ण हाताळणी काही ठिकाणी अतिरेकी वाटत असली तरी तेही क्षणिकच. बाकी अखंड धूमशान!
संदेश बेंद्रे यांनी समोरासमोरील दोन घरांच्या प्रसन्न नेपथ्यातून नाटकाला व त्यातील घटना-प्रसंगांना आवश्यक ती पार्श्वभूमी पुरवली आहे. किशोर इंगळे यांनी प्रकाशयोजनेतून यातला ‘ह्य़ुमर’ यथार्थपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला आहे. मंगल केंकरेकृत वेशभूषा आणि अशोक पत्कींचं संगीत नाटकाची मागणी पुरवणारं आहे.
यातले कलाकार हे तर एकापेक्षा एक आहेत. सागर कारंडे यांनी कर्णबधीर दादाच्या भूमिकेत अपेक्षित/ अनपेक्षित अशा अनेक जागा लीलया काढल्या आहेत. त्यांचं संवादफेकीचं टाइमिंग तर भन्नाटच. मूकबधीर मुकेशची गोची अजिंक्य दाते यांनी क्षणिक चरफडण्यातून, तर कधी असहाय हताशेतून छान व्यक्त केलीय. चिकण्या नयनच्या भूमिकेत अमोघ चंदन शोभले आहेत. सुनयनाला ‘बघण्या’पासून ते तिच्याशी लग्न होईस्तोवर निरनिराळ्या प्रसंगांत होणाऱ्या गडबडगुंडय़ापायी होणारा गोड त्रागाही त्यांनी मस्त दाखवलाय. शलाका पवार या विनोदाची उत्तम जाण असणाऱ्या कलावतींपैकी अत्यंत बोलक्या चेहऱ्याच्या गुणी कलावती आहेत. त्यांनी वहिनीची भूमिका अक्षरश: सर्वस्व झोकून केली आहे. हशा आणि टाळ्यांच्या यच्चयावत जागा त्यांनी अचूक हेरल्या आहेत. रमेश वाणी हेही विनोदाची सूक्ष्म जाण असणारे कलावंत. त्यांनी नारायणाच्या विसरभोळेपणाचा अर्कच सादर केला आहे. सिद्धिरूपा करमरकर यांनी लक्ष्मीची फरफट आणि त्रेधातिरपिट फर्मास दाखवली आहे. सायली देशमुखची सुनयनाही लोभस. एकुणात, लेखक, दिग्दर्शक आणि कलावंत यांचा ‘समसमा संयोग की जाहला’ असं म्हणायला लावणारं हे नाटक आहे. आणि हीच तर फॅमिलीची एन्टरटेन्मेंट आहे!