काल्पनिक कथाविश्वातही विलक्षण वाटतील अशा व्यक्तिरेखा, कथानक वा एखादी कलाकृती यशस्वी होते, तेव्हा त्याच्याच आधारे अशा इतर व्यक्तिरेखा निर्माण करत त्यांचे एक वेगळे जग निर्माण करण्याची पद्धत सध्या सिक्वेलपटांच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये रुजू पाहते आहे. अशापद्धतीच्या विशिष्ट संकल्पनांवर आधारित कथाविश्वात चपखल बसणारी, अन्य उपकथांना जन्माला घालणारी वा त्यांच्या वाटा मोकळी करून देणारी आणि स्वत: मूळ कथेपासून प्रेरणा घेत पुढे निघालेली कलाकृती म्हणून अमर कौशिक दिग्दर्शित ‘स्त्री २’ या चित्रपटाचा उल्लेख करता येईल. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेला ‘स्त्री’ हा पहिला विनोदी भयपट नेमका कशामुळे लोकप्रिय ठरला होता, याचे व्यवस्थित भान राखत पुढच्या अनेक कथा-उपकथा सोबत घेऊन मनोरंजनाची गोधडी विणण्याचा दिग्दर्शक अमर कौशिक यांचा प्रयत्न जमून आला आहे.
‘स्त्री’ प्रदर्शित झाला तेव्हा साहजिकच तो स्वतंत्र कथा असलेला चित्रपट म्हणून प्रदर्शित झाला होता. तो कुठल्याही अन्य संकल्पनेचा भाग नव्हता. भयकथा आणि अचूक टायमिंग साधत उभे केलेले प्रासंगिक विनोद याचे अफलातून मिश्रण असलेला हा चित्रपट लोकांना भलताच पसंत पडला. त्यामुळे नंतर या चित्रपटाच्या सिक्वेलची चर्चा सुरू झाली. दोन वर्षांपूर्वी जेव्हा ‘स्त्री २’ या सिक्वेलपटाचे प्रत्यक्ष काम सुरू झाले तोवर निर्माते दिनेश विजन यांच्या मॅडॉक फिल्म्सने याच विनोदी भयपटांच्या शैलीतील ‘भेडिया’ हा चित्रपट प्रदर्शित केला. तोही चांगला चालल्याने साहजिकच अंगावर रोमांच आणतील अशा भयकारी व्यक्तिरेखांची निर्मिती करून त्याला विनोदाचा तडका देत चित्रपटांचं एक वेगळंच जग उभं करण्याचा निर्मात्यांचा मानस कसा तडीला जाणार आहे याची पक्की झलक ‘स्त्री २’ या चित्रपटातून दाखवून देण्यात आली आहे. त्यामुळे सहा वर्षांपूर्वी आलेल्या ‘स्त्री’चा सिक्वेलपट म्हणून ‘स्त्री २’चा उल्लेख होत असला तरी यात एक वेगळी स्वतंत्र कथा पाहायला मिळते.
‘स्त्री’च्या शापातून मुक्त होऊन तिच्या रक्षणाखाली बिनधास्त वावरणारं चंदेरी गाव नव्याने हादरलं आहे ते स्त्रीमुळे नव्हे… सरकटा नामक एका वेगळ्याच दानवी शक्तीमुळे गाव पुन्हा बिथरलं आहे. यावेळी हा सरकटा नामक दानव गावातील स्वतंत्र विचाराच्या, बाण्याच्या (थोडक्यात कपड्याने आणि विचारांनीही आधुनिकपणे वावरणाऱ्या) स्त्रियांना उचलून नेतो आहे. सरकटा अचानक का येतो? वगैरे प्रश्न विचारण्यात तसं हशील नाही. कारण त्याचा संबंध पुन्हा स्त्रीच्या कथेशीच जोडला आहे आणि सध्या स्त्री गावात येत नसल्याने सरकट्याला मोकळं रान मिळालं आहे, अशी काहीशी चित्रपटाच्या कथेची सुरुवात होते. अर्थात, आत्ताही सरकटा नामक या सैतानी शक्तीला गावच्या पार करायची जबाबदारी गावचा रक्षक म्हणून विकीवर (राजकुमार) येते. विकी, बिट्टू आणि रुद्र भय्या या त्रिकुटाची चौथी कडी असलेला जना एका वेगळ्या गोष्टीतून बाहेर पडून पुन्हा चंदेरीत येतो. आता ही चौकडी कितीही हुशार असली तरी त्यांच्याकडे कुठलीही शक्ती नाही, त्यामुळे स्त्रीबरोबरच्या युद्धात त्यांच्या मदतीला धावून आलेली विकीची प्रेयसी (श्रद्धा कपूर) इथेही मदतीला येते. हे पाच जण मिळून सरकट्याला नष्ट करतात का? इथे ‘स्त्री’चा संबंध काय? सरकटा खरोखरच संपतो की आणखी काही नव्या संकटाला आमंत्रण देऊन जातो? या सगळ्या प्रश्नांची रंजक उकल ‘स्त्री २’ या चित्रपटातून करण्यात आली आहे.
‘स्त्री २’ हा चित्रपट पहिल्या चित्रपटापेक्षा मांडणीच्या दृष्टीनेही वेगळा आहे, असं म्हणायला हवं. पहिल्या चित्रपटात स्त्री ही व्यक्तिरेखा भयावह प्रकारची असली तरी ती मानवी कल्पनांच्या अधिक जवळ जाणारी होती. इथे सरकटा ही व्यक्तिरेखा संपूर्णपणे वेगळ्या पद्धतीने रचण्यात आली आहे. बरं हा सरकटा कसा दिसतो? तो नेमका कोण? याची काहीच माहिती या गावच्या रक्षक चौकडीला नाही. गेल्या वेळी तरी चंदेरी पुराण त्यांच्या हाताशी होतं, मात्र त्या चंदेरी पुराणातली हरवलेली पानं अचानक रुद्र भय्यांकडे पोहोचती होतात. ती पानं कोण पोहोचवतं हे चित्रपटात सांगितलं असलं तरी ते का केलं जातं? या प्रश्नाला सोयीस्कर बगल देऊन दिग्दर्शकाने कथा पुढे चांगली खेचली आहे.
चित्रपटाचा पूर्वार्ध हा बऱ्यापैकी विकी, बिट्टू, जना, रुद्र भय्या यांच्या एकत्रित येण्यावर आणि मग विकीची अधुरी प्रेमकथा पुन्हा सुरू करून सरकट्याचा नाश करण्याच्या संकल्पापर्यंतच्या कथानकात रेंगाळतो. उत्तरार्धात कथाही वेग घेते आणि मग या हळूहळू मॅडॉक फिल्म्सच्या या भूतिया चित्रपट श्रुंखलेतील अन्य व्यक्तिरेखा, नव्या कथा यांची पोतडी खुलत जाते. अशा प्रकारे ‘युनिव्हर्स’ संकल्पनेच्या प्रेमात असलेल्या आणि विशेषत: मॅडॉकच्या ‘स्त्री’, ‘भेडिया’ आणि आता ‘मुंज्या’ या चित्रपटांचे चाहते असलेल्या प्रेक्षकांसाठी ‘स्त्री २’ हा मनोरंजनाची अनोखी पर्वणी ठरला आहे. यावेळी ‘स्त्री २’च्या पटकथेचा डोलारा ‘भेडिया’ लिहिणाऱ्या निरेन भट्ट यांनी सांभाळला आहे. ‘स्त्री’च्या यशस्वी चांडाळचौकडीला केंद्रस्थानी ठेवून नवी व्यक्तिरेखा उभं करण्याचं आणि अन्य उपकथांना एकाच कथेत सांभाळून घेण्याचं काम पटकथेने चोख पार पाडलं आहे. त्यामुळे दिग्दर्शकाचं काम अधिक सोपं झालं आहे. अर्थात, दोन्ही चित्रपटांची तुलना केली तर ‘स्त्री’ हा चित्रपट स्वतंत्र कथा आणि त्याचा आशय दोन्ही बाबतीत अधिक सकस, अर्थपूर्ण होता. सिक्वेलपटाची रचनाच अन्य गृहीतकांवर असल्याने इथे कथा त्याच्या उद्दिष्टाला साहाय्यभूत ठरणारी आहे.
चित्रपटाचा बराचसा भार हा राजकुमार राव, अपारशक्ती खुराणा, अभिषेक बॅनर्जी आणि पंकज त्रिपाठी या चार मुख्य कलाकारांच्या सहज अभिनयावर आणि त्यांच्या विनोदाचं टायमिंग, एकमेकांमधली देवाणघेवाण यावर आहे. सहा वर्षांनंतर आलेल्या सिक्वेलपटातही या चौघांनी आपापल्या व्यक्तिरेखांचा सूर त्याच सहजतेने पकडला आहे. श्रद्धा कपूरच्या व्यक्तिरेखेला दोन्हींकडे मर्यादित वाव आहे, पण तिच्या प्रसन्न-लाघवी व्यक्तिमत्त्वामुळे तिचा पुरेसा प्रभाव पडतो. विनोदी अभिनय आणि त्याअनुषंगाने केलेली मनोरंजनाची मांडणी यात चित्रपट कुठेही कमी पडत नाही. शेवटाला चित्रपट विनाकारण रेंगाळतो. एक नव्हे तर दोन-दोन गाणी प्रेक्षकांच्या माथी मारण्याचं प्रयोजन कळत नाही. पण विशिष्ट संकल्पनेवर आधारित चित्रपट श्रुंखलेतील एक महत्त्वाचा चित्रपट म्हणून ‘स्त्री २’ हा वेगळा प्रयोग पाहायलाच हवा.
स्त्री २
दिग्दर्शक – अमर कौशिक
कलाकार – राजकुमार राव, अपारशक्ती खुराणा, अभिषेक बॅनर्जी, पंकज त्रिपाठी, श्रद्धा कपूर, तमन्ना भाटिया.