नव्वदोत्तरी काळात दूरचित्रवाहिन्यांवर असलेल्या मालिकांमधून काम करणाऱ्या अनेक लोकप्रिय नायिका सध्या ओटीटी या नवमाध्यमावर वेबमालिका-वेबपटांमधून सशक्त भूमिका साकारताना दिसतायेत. ओटीटीवर लोकप्रिय ठरलेल्या आणि आश्वासक चेहरा म्हणून नावाजल्या गेलेल्या अशा अनेक कलाकारांपैकी एक असलेली अभिनेत्री कृतिका कामरा सध्या ‘झी ५’ वाहिनीवरील ‘ग्यारह ग्यारह’ या वेबमालिकेतून प्रेक्षकांसमोर आली आहे. या वेबमालिकेत दोन वेगवेगळ्या काळात घडणारी गोष्ट असल्याने नायक दोन आहेत. मात्र या दोन्ही नायकांना जोडून घेणाऱ्या एकाच महिला पोलीस अधिकाऱ्याची भूमिका कृतिकाने केली आहे. या वेबमालिकेच्या निमित्ताने ‘लोकसत्ता’शी बोलताना ओटीटी हे माध्यम दूरचित्रवाहिनी आणि सिनेमा या दोन्हींपेक्षा अनेक अर्थाने वेगळं ठरलं आहे, असं कृतिकाने सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दूरचित्रवाहिनीवर ‘कितनी मोहोब्बत है’, ‘प्यार का बंधन’, ‘कुछ तो लोग कहेंगे’ या मालिकांमधून काम करताना मी नेहमीच सशक्त नायिका साकारली आहे. आपल्याकडे मालिका मुळातच स्त्रीप्रधान व्यक्तिरेखांवरच आधारित असतात, त्यामुळे माझ्या व्यक्तिरेखा मध्यवर्ती होत्याच, पण त्याहीपलीकडे त्यांच्यात वेगवेगळी गुणवैशिष्ट्ये होती. त्यामुळे नव्वदच्या दशकातील आणि त्यानंतरच्याही मालिका या खूप चांगल्याही होत्या आणि नायिकाप्रधानही होत्या. मात्र दूरचित्रवाहिनीवर जो नायिकाप्रधान आशय होता, तसा तो त्यावेळी सिनेमांमध्ये दिसत नव्हता, असं निरीक्षण कृतिकाने नोंदवलं. हिंदी चित्रपटांमध्ये आत्ता आत्तापर्यंत स्त्रीप्रधान कथानक असलेले चित्रपट चांगली कमाई करूच शकत नाहीत, असा समज होता. ‘आलिया भट्टच्या ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘राझी’सारख्या चित्रपटांनी मिळवलेल्या यशाने तो समज खोडून काढला. त्यामुळे आत्ताच्या ज्या आघाडीच्या अभिनेत्री आहेत त्या सगळ्याच आपापल्या भूमिकांच्या बाबतीत चोखंदळ आहेत. व्यावसायिक गरज आणि सशक्त भूमिका यांचा मेळ त्यांनी घातला आहे. ओटीटी माध्यम मात्र पहिल्यापासूनच याबाबतीत भेदभाव न करणारं आहे,’ असं ती म्हणते.

सिनेमांना जे चित्रपटगृहातून होणाऱ्या व्यवसायाचं, कमाईचं भय आहे ते ओटीटी माध्यमाला नाही, असं सांगणाऱ्या कृतिकाने ओटीटीवर कथानक हे प्रेक्षकांच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचं असल्याचं मत मांडलं. वेबमालिकेत वा वेबपटात कथा काय आहे? ती कशी पुढे नेली गेली आहे? या गोष्टी प्रेक्षकांना त्यात रुची वाटेल की नाही हे ठरवतात. इथे पुरुषप्रधान किंवा स्त्रीप्रधान कथानक असं काही नसतं. ज्या काही व्यक्तिरेखा कथेत आहेत त्या तपशीलवार रंगवण्यासाठी इथे वाव मिळतो. त्यामुळे खूप कलाकार असले तरी प्रत्येकाला आपली भूमिका सविस्तर रंगवता येते, असं तिने सांगितलं. तिच्याच नव्या वेबमालिकेतील भूमिकेचा दाखलाही तिने दिला. ‘ग्यारह ग्यारह’ ही वेबमालिका ‘सिग्नल’ या कोरियन शोवर आधारित आहे. १९९० ते २०१६ या दोन काळात कथा घडते, मात्र एका क्षणी या दोन्ही काळातील व्यक्तिरेखा एकत्र जोडल्या जातात, अशी काहीशी वैज्ञानिक कथाकल्पना या वेबमालिकेत आहे. त्यामुळे इथे दोन्ही काळातील दोन पुरुष पोलीस अधिकारी आणि दोन्हीकडे त्यांच्याबरोबर असलेली सुरुवातीला साधी शिपाई ते नंतरच्या काळात पोलीस निरीक्षक झालेली वामिका अशा तिघांची ही कथा आहे. इथे मुळातच अशाप्रकारे दोन वेगवेगळ्या काळातील घटना एका क्षितिजरेषेवर येतात ही कल्पनाच अनोखी आहे, त्यामुळे प्रेक्षकांना त्या कथेबद्दल अधिक उत्सुकता वाटते, असं तिने सांगितलं.

मध्य प्रदेशमधील एका छोट्याशा गावात लहानाची मोठी झालेल्या कृतिकाने अभिनय क्षेत्रातील तिची वाटचाल ही अपघातानेच झाल्याचं सांगितलं. आमच्या गावात शिक्षणाला अधिक महत्त्व आहे. चित्रपटांबद्दलचं आकर्षण, उत्सुकता तिथेही आहे, पण अभिनय क्षेत्रात कारकीर्द करण्याचं स्वप्न बाळगावं असं वातावरण तिथे नाही. त्यामुळे सुरुवातीला एका फॅशन शोच्या निमित्ताने मला मालिकेत काम करायची संधी मिळाली आणि मग मला हेच करायचं आहे हा विश्वास वाटला. तेव्हा पूर्णवेळ अभिनेत्री म्हणून काम करण्याचा संघर्ष सुरू झाला, असं तिने सांगितलं. एका रात्रीत यश मिळवण्याची घाई मला नाही, उलट मला आयुष्यभर चोखंदळ भूमिका करत माझी वाटचाल करायची आहे. त्याच दृष्टिकोनातून सातत्याने काम केल्याने आत्ता आपल्याला हवी तशी भूमिका करण्याचं स्वातंत्र्य मिळालं आहे आणि त्याचा योग्य उपयोग करून घेत पुढची वाटचाल सुरू राहील, असा विश्वासही तिने व्यक्त केला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Entertainment news television to ott kritika kamra journey amy