महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी असा लौकिक असणाऱ्या ठाणे शहराच्या या श्रीमंतीत ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेने मोलाची भर घातल्याचे शनिवारी गडकरी रंगायतनमध्ये आयोजित विभागीय अंतिम फेरीस मिळालेल्या उदंड प्रतिसादाने दिसून आले.
सकाळी दहा वाजता सुरू होणाऱ्या अंतिम फेरीसाठी मोक्याची जागा मिळावी म्हणून रसिक प्रेक्षकांनी नऊ-साडेनऊपासूनच गडकरी रंगायतनच्या आवारात गर्दी केली होती. त्यात महाविद्यालयीन तरुण-तरुणींची उपस्थिती लक्षणीय होती. ठाणे परिसरातील महाविद्यालयीन विश्वात होत असलेल्या हौशी नाटय़ उपक्रमांना ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या निमित्ताने खूप चांगले व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याची भावना तरुण नाटय़कर्मी व्यक्त करीत होते. तरुणांच्या सर्जनशीलतेचा सामूहिक आविष्कार या निमित्ताने अनुभवता आला. अंतिम फेरी असूनही त्याचे कोणतेही दडपण या तरुण कलावंतांच्या मनावर दिसत नव्हते. प्रत्यक्ष सादरीकरणापूर्वी तंत्रज्ञ नेपथ्याची जुळवाजुळव करीत असताना एकांकिकेतील कलावंत मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करीत होते. मन एकचित्त करण्यासाठी एका समूहाने चक्क ग्रीनरूममध्ये सामूहिकपणे ओंकाराचे ध्यानही केले.
‘अंतिम फेरी आणि तीसुद्धा गडकरी रंगायतनसारख्या महाराष्ट्रातील एका प्रमुख रंगमंचावर, याचे अप्रूप आहे; पण त्याचे आमच्या मनावर कोणतेही टेन्शन नाही. कारण इथे आमची स्पर्धा कुणा दुसऱ्याशी नसून स्वत:शी आहे,’ अशी प्रगल्भ प्रतिक्रिया एका रंगकर्मीने व्यक्त केली. विचारांमधील या समंजसपणाचे प्रतिबिंब त्यांच्या सादरीकरणातही उमटलेले आढळले. जवळपास सर्वच एकांकिकांमधील कलावंतांच्या सादरीकरणातून सर्वोत्तम देण्याचा ध्यास दिसून आला.
जर्मनीतील नाझी भस्मासुरापासून ते गौतम बुद्धाने सांगितलेल्या शाश्वत सत्याच्या शोधापर्यंत विविध विषय तरुणांनी अतिशय आत्मविश्वासाने हाताळले. त्यांच्या सादरीकरणात व्यावसायिक सफाई होती. कल्पक नेपथ्य आणि परिणामकारक पाश्र्वसंगीताच्या साथीने विषय परिणामकारकपणे मांडण्यात अंतिम फेरीतील सर्वच एकांकिका यशस्वी ठरल्या. प्रेक्षकांनीही मनमुराद टाळ्या, शिटय़ा वाजवून कलावंतांना प्रोत्साहन दिले. लोकसंगीत, लोकनृत्य आणि पाश्चिमात्य सुरावटींच्या सिंफनीचा वापरही कल्पकतेने करण्यात आला.

Story img Loader