लोकसत्ता प्रतिनिधी

गेली सात वर्षे दुरुस्तीच्या कामामुळे बंद असलेल्या दक्षिण मुंबईतील ‘इरॉस’ या लोकप्रिय चित्रपटगृहाने शुक्रवारी पुन्हा प्रेक्षकांसाठी आपले दरवाजे खुले केले. चर्चगेट येथील ब्रिटिशकालीन स्थापत्यशैली मिरवणाऱ्या इरॉस चित्रपटगृहाचा पीव्हीआर आयनॉक्स समूहाने कायापालट केला आहे. शुक्रवारी, ९ फेब्रुवारीला नवे आयनॉक्स इरॉस चित्रपटगृह पुन्हा प्रेक्षकांच्या सेवेत दाखल झाले. ह्रतिक रोशन आणि दीपिका पदुकोण अभिनीत ‘फायटर’ आणि शाहीद कपूर – क्रिती सनन जोडीचा ‘तेरी बातों मे ऐसा उलझा जिया’ या चित्रपटांचे शो पहिल्या दिवशी दाखवण्यात आले.

८६ वर्षे जुने असलेले इरॉस चित्रपटगृह लेझर तंत्रज्ञानासह आयमॅक्स चित्रपटगृह म्हणून विकसित करण्यात आले असून आयनॉक्स इरॉस या नव्या नावाने ते ओळखले जाणार आहे. १९३८ साली बांधण्यात आलेले इरॉस हे मुंबईतील पहिल्या एकपडदा चित्रपटगृहांमधील एक लोकप्रिय चित्रपटगृह म्हणून नावाजले गेले. मात्र बहुपडदा चित्रपटगृहांच्या लोकप्रियतेच्या लाटेत अनेक नामांकित एकपडदा चित्रपटगृहे इतिहासजमा झाली. सात वर्षांपूर्वी चित्रपटगृहाचा चांगला व्यवसाय होत नसल्याने इरॉसही कायमचे बंद होणार की काय अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र मूळ चित्रपटगृहातील अंतर्गत ब्रॉडवे थिएटरला साजेशी रचना कायम ठेवून लेझर तंत्रज्ञानासह अद्ययावत अशा आयमॅक्स चित्रपटगृहाची नवी झळाळी इरॉसला देण्यात आली आहे.

हेही वाचा >>>‘आई कुठे काय करते’ मालिकेतील आरोहीचा खऱ्या आयुष्यातील होणारा नवरा काय करतो काम? वाचा…

‘दक्षिण मुंबईत मध्यवर्ती ठिकाणी असलेले इरॉस चित्रपटगृह पिढय़ानपिढय़ा चित्रपटप्रेमींसाठी मनोरंजनाचे प्रतीक म्हणून लोकप्रिय राहिले आहे. समृद्ध ऐतिहासिक वारसास्थळ म्हणून नावाजलेल्या या चित्रपटगृहाला तंत्रज्ञानाचा नवा साज देत त्याचे पुनरुज्जीवन यशस्वी करणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. आयनॉक्स इरॉस चित्रपटगृहाच्या रूपाने पुन्हा एकदा सिनेमाची जादू मुंबईकरांना अनुभवता येणार आहे याचा आम्हाला आनंद वाटतो’, अशी भावना पीव्हीआर आयनॉक्स लिमिटेडचे कार्यकारी संचालक संजीव कुमार बिजली यांनी व्यक्त केली. ३०५ आसन क्षमता असलेले आयनॉक्स इरॉस हे पीव्हीआर आयनॉक्स समूहाचे मुंबईतील ५ वे आयमॅक्स चित्रपटगृह ठरले आहे.

Story img Loader