‘हेरा फेरी’ आणि ‘फिर हेरा फेरी’ या दोन्ही गाजलेल्या चित्रपटांनंतर आता पुन्हा एकदा दिग्दर्शक नीरज वोरा ‘हेरा फेरी ३’ घेऊन येताहेत. या चित्रपटात अभिनेता अभिषेक बच्चन आणि जॉन अब्राहम यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणार असल्यामुळे अभिनेत्री ईशा गुप्ता भलतीच आनंदित झाली आहे. या निमित्ताने या दोघांकडून मला विनोदी अभिनय शिकता येईल, असे तिने म्हटले आहे.
अभिषेक बच्चन आणि जॉन अब्राहम या दोघांचीही अभिनयाची शैली वेगळी आहे. अभिनयातून विनोद साधण्याची त्यांची पद्धतीही वेगळी आहे. ‘दोस्ताना’मध्ये या दोघांचा अभिनय चांगला झाला होता. आता या दोघांसोबत काम करण्याची संधी मिळणार असल्यामुळे मला त्यांच्याकडून खूप काही शिकता येईल. त्यामुळे मी खूप आनंदित आणि उत्साहितही आहे, असे तिने वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
‘हेरा फेरी ३’ हा ‘फिर हेरा फेरी’चा सिक्वल असून, नीरज वोरा तो दिग्दर्शित करत आहेत. फिरोज नाडियादवाला या चित्रपटाचे निर्माते आहेत. ‘हमशकल्स’नंतर दुसऱ्यांदा एखाद्या विनोदी चित्रपटात ईशा काम करताना दिसणार आहे.

Story img Loader