वृत्त आणि मनोरंजन अशा स्वरुपात असलेल्या ‘ई टीव्ही मराठी’चे काही महिन्यांपूर्वी पूर्णपणे मनोरंजन वाहिनीत रुपांतर झाले. आता पुन्हा एकदा लवकरच ‘ई टीव्ही’ मराठीचे नव्याने बारसे होणार असून ही वाहिनी नव्या स्वरुपात ‘कलर्स’ किंवा ‘कलर्स-मराठी’ या नावाने ओळखली जाणार आहे.
ई टीव्ही मराठी ही वाहिनी ‘व्हायकॉम १८’ या समुहाकडे गेल्यानंतर लगेचच त्याचा परिणाम ‘ई टीव्ही’वर झालेला दिसून आला होता. ई टीव्ही मराठीवरील ‘आपला महाराष्ट्र’, ‘आपली मुंबई’ ही लोकप्रिय बातमीपत्रे तसेच दर एक तासाने प्रसारित होणारे बातमीपत्र टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आले होते. ‘स्टार प्रवाह’ आणि विशेषत: ‘झी मराठी’ या मनोरंजन वाहिनीच्या स्पर्धेत येण्यासाठी ‘व्हायकॉम १८’ समुहाने हे पाऊल उचलले होते. ‘ई टीव्ही मराठी’वरुन वृत्तविषयक कार्यक्रम आणि बातम्या पूर्णपणे बंद करुन ‘ई टीव्ही मराठी’ला पूर्णपणे मनोरंजनात्म वाहिनी बनविण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले.
‘व्हायकॉम १८’तर्फे ‘कलर्स’ ही हिंदीतील मनोरंजन वाहिनी चालविली जाते. ‘ई टीव्ही मराठी’चा चेहरा आता पूर्णपणे पालटण्यासाठी ‘व्हायकॉम १८’ समुह सज्ज झाला आहे. येत्या गुढीपाडव्यापासून म्हणजे २१ मार्च पासून ‘ई टीव्ही मराठी’ वाहिनीचे नामकरण होणार असून नव्या स्वरुपात ही वाहिनी ‘कलर्स मराठी’ किंवा ‘कलर्स’ या नावाने प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचे ‘ई टीव्ही मराठी’च्या उच्चपदस्थ सुत्रांकडून सांगण्यात आले.
आम्ही हे पाऊल विचारपूर्वक उचलले आहे. प्रेक्षकांना हा बदल नक्कीच जाणवेल. मराठी भाषा व संस्कृतीचे प्रतिबिंब उमटतील असेकार्यक्रम, मालिका आणि प्रेक्षकांचा सहभाग असलेले कार्यक्रम असे याचे स्वरुप राहणार असल्याची माहितीही या सुत्रांनी दिली.
मराठी नाटक आणि चित्रपटांसाठीचे पुरस्कार असलेला ‘मिक्ता’ सोहळा नुकताच दुबईत पार पडला. या सोहळ्याचे यंदा नामकरण ‘कलर्स मिक्ता’ पुरस्कार सोहळा असे करण्यात आले होते. ‘ई टीव्ही मराठी’चे ‘कलर्स’ नामकरण होण्याच्या दिशेने टाकलेले ते पहिले पाऊल होते. ‘कलर्स मिक्ता’ सोहळा २२ मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजता प्रसारित होणार आहे.
त्याची जाहिरात सध्या ‘ई टीव्ही मराठी’वर केली जात आहे. मात्र त्यात ‘ई टीव्ही मराठी’ असा उल्लेख जाणीवपूर्वक टाळला जात आहे. केवळ ‘आपल्या लाडक्या वाहिनी’वर असा उल्लेख जाहिरातीत पाहायला मिळतो आहे. त्यात ‘कलर्स’ वाहिनीचे बोधचिन्ह दिसते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा