प्रसिद्ध मराठी अभिनेते शरद पोंक्षे हे त्यांच्या अभिनयाबरोबरच त्यांच्या परखड राजकीय भूमिका मांडण्यासाठीही ओळखले जातात. शरद पोंक्षे हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. देशातील राजकीय घडामोडी, देशाचा इतिहास यावर ते परखडपणे आपली मतं मांडत असतात. बऱ्याचदा त्यांच्या या मतांवर टीकादेखील होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी राहुल गांधींच्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दलच्या वक्तव्यावर खरमरीत शैलीत एक पोस्ट शेअर केली होती.
शरद पोंक्षे हे कट्टर सावरकरवादी विचारसरणीचे आहेत हे सर्वश्रुत आहे शिवाय ते त्यांच्या प्रत्येक भाषणातून हिंदू धर्म, तसेच सावरकरांचे विचार स्पष्टपणे मांडत असतात. नुकतंच त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांच्याच भाषणातील एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. या व्हिडिओमध्ये शरद पोंक्षे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या एका शिकवणीची आठवण लोकांना करून दिली आहे. हा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.
आणखी वाचा : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मधील ‘चंपक चाचां’नी घेतला ब्रेक; मालिका सोडल्याच्या चर्चांना उधाण
या व्हिडिओमध्ये शरद पोंक्षे यांनी हिंदू धर्म आणि याविषयी स्वामी विवेकानंद यांचा एक विचार मांडला आहे. भाषणात शरद पोंक्षे म्हणाले, “स्वामी विवेकानंद एका भाषणात म्हणाले आहेत की, इथे जन्माला येणारं प्रत्येक मूल हे हिंदू असतं. त्यानंतर त्याचे आई वडील त्या त्या धर्मसंस्थेचे संस्कार त्या मुलावर करून त्याला त्या त्या धर्मसंस्थेचं सभासदत्व बहाल करतात, मग तो मुसलमान होतो, तो ख्रिश्चन होतो. तो जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो हिंदूच असतो, कारण निसर्गाने त्याला जन्माला घालताना त्याला जो धर्म दिला, जो गुणधर्म दिला तो होता हिंदू धर्म. हिंदू ही कोणतीही धर्मसंस्था नाही, बाकी सगळ्या धर्मसंस्था आहेत.”
शरद पोंक्षे यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतही भरपूर काम केलं आहे. याबरोबरच त्यांच्या मालिकांमधल्या भूमिका आजही लोकांच्या स्मरणात आहेत. ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या वादग्रस्त नाटकाने शरद पोंक्षे यांना एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. हे नाटक आज सुरू नसलं तरी या अशा वेगवेगळ्या भाषणांच्या माध्यमातून शरद पोंक्षे हिंदू धर्माविषयी त्यांचे विचार मांडत असतात.