हिंदी चित्रपटसृष्टीत याआधी मधुर भावगीते, कॅब्रेचे संगीत, उडत्या चालीची गाणी असे ढोबळमानाने वर्गवारी केली जायची आणि त्या प्रत्येक संगीतकाराचा आपला एक चाहता वर्ग असायचा. आता तशी परिस्थिती नाही. हल्ली लोकांना सगळ्या प्रकारची गाणी आवडतात. त्यामुळे बॉलिवूडमध्ये संगीतकारांची एकच गर्दी झाली असली तरीही प्रत्येकाला आपले स्थान निर्माण करणे शक्य झाले आहे, असे मत गायक-संगीतकार शंकर महादेवन यांनी ‘वृत्तान्त’शी बोलताना व्यक्त केले.
‘बिग एफएम’ वाहिनीच्या ‘बिग गोल्डन व्हॉईस’ या टॅलेंट सर्च कार्यक्रमाच्या तिसऱ्या पर्वाचा चेहरा म्हणून शंकर महादेवन यांची निवड झाली आहे. त्यानिमित्ताने बोलत असताना आजची पिढी खूप हुशार आहे आणि ध्येयकेंद्रित अशी आहे. संगीतक्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांसाठी आज अनेक प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत, याची जाणीव असलेली ही पिढी कुठल्या संधीचा कसा वापर करून घ्यावा, याचाही काटेकोरपणे विचार करते. या पिढीतून गुणवान गायक-गायिका शोधण्यासाठी खरे तर, असे वेगवेगळ्या प्रकारचे टॅलेंट शोज नियमित व्हायला हवेत, असे शंकर महादेवन यांनी सांगितले. ‘बिग एफएम’च्या ‘बिग गोल्डन व्हॉईस’चे हे तिसरे पर्व आहे आणि आधीच्या पर्वात विजेत्या ठरलेल्या सयानी पलित हिला आगामी ‘कट्टी बट्टी’ या चित्रपटात कंगनासाठी गाण्याची संधी मिळाली आहे. तरुण गायक-गायिकांसाठी एका शोच्या माध्यमातून थेट बॉलिवूडमध्ये गाण्याची संधी मिळणे ही खूप मोठी गोष्ट आहे. एका गाण्यातून तुमचा आवाज इंडस्ट्रीपर्यंत पोहोचतो, लोकांना तो आवडतो आहे की नाही हेही लगेच कळते. त्यामुळे नव्या गायक-गायिकांसाठी असे शोज पर्वणी ठरू लागले असल्याचे महादेवन यांनी सांगितले.
या शोचा चेहरा म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर समोर येणाऱ्या स्पर्धकांच्या गायकीतील वैशिष्टय़ काय आहे हे जाणून घेऊन त्याला त्या पद्धतीने मार्गदर्शन करण्यावर आपला भर असतो, असे शंकर महादेवन यांनी सांगितले. दिग्गज गायकांची गाणी गाणे ही एक वेगळी गोष्ट आहे. स्पर्धक जेव्हा किशोर कुमारचे गाणे गात असतो तेव्हा त्यातही त्याच्या सुरांचे वेगळेपण लोकांच्या कानांना जाणवले पाहिजे. गाण्यात कारकीर्द घडवू इच्छिणाऱ्यांनी आपल्या सुरातले वेगळेपण स्वत:च शोधून आपला आवाज विकसित करण्यावर भर द्यायला हवा, असा मंत्रही महादेवन यांनी दिला. टीव्हीवर संगीतावरील रिअ‍ॅलिटी शोजची संख्या खूप असली तरी रेडिओ हे माध्यम टीव्हीपेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहोचते. त्यामुळे रेडिओच्या वाहिन्यांनी अशा प्रकारचे जास्तीत जास्त शोज सुरू केले तर खेडोपाडय़ातील तरुण गायक-गायिकांना यात सहभागी होता येईल, अशी अपेक्षा शंकर महादेवन यांनी व्यक्त केली.

Story img Loader