बॉलिवूडमध्ये #MeToo मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर ज्येष्ठ अभिनेते आलोक नाथ यांच्यावर एकानंतर एक धक्कादायक आरोप झाले. दिग्दर्शिका, निर्मात्या विनंता नंदा यांनी सर्वात आधी त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला. त्यानंतर ‘हम साथ साथ है’ चित्रपटाची क्रू मेंबर, अभिनेत्री संध्या मृदुल, नवनीत निशान यांनीसुद्धा लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप आलोक नाथ यांच्यावर केले. आता आणखी एका अभिनेत्रीने आलोक नाथ यांच्यावर आरोप केले आहेत.

‘सोनू के टिटू की स्वीटी’ या चित्रपटातील अभिनेत्री दीपिक अमिन यांनी लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले आहेत. ‘इंडस्ट्रीमध्ये अनेकांनाच हे माहित आहे की आलोक नाथ हा एक दारूड्या असून तो महिलांचं शोषण करतो. काही वर्षांपूर्वी एका टेलिफिल्मसाठी आम्ही आऊटडोअर शूटिंगला गेलो होतो. तेव्हा त्यांनी जबरदस्ती माझ्या रुममध्ये शिरण्याचा प्रयत्न केला होता. ते अत्यंत स्त्रीलंपट स्वभावाचे असून दारू पिऊन तमाशा करतात. मी सुरक्षित राहावी यासाठी पूर्ण टीम मला घेराव करून राहायची,’ असं दीपिका यांनी ट्विटमध्ये लिहिले.

‘सोनू के टिटू की स्वीटी’ या चित्रपटात दीपिका अमिन आणि आलोक नाथ यांनी एकत्र काम केले. विनता नंदा यांची पोस्ट शेअर करत दीपिका यांनी फेसबुकवर लिहिलं की, ‘आलोक नाथ हे सोनू के टिटू की स्वीटी या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान फार शांत होते. कदाचित त्यांच्या स्वभावात बदल झाला असेल किंवा दिग्दर्शक लव रंजन यांनी आधीच काही गोष्टी स्पष्ट केल्याने ते शांत राहिले असतील. पण विनता यांची पोस्ट वाचल्यानंतर मला धक्काच बसला आणि त्यांना पाठिंबा द्यावा असं मला वाटतं.’

Story img Loader