‘एक व्हिलन’ चित्रपटातील प्रत्येक जण व्हिलनच असल्याचे चित्रपटाचा दिग्दर्शक मोहित सुरी याने म्हटले आहे. चित्रपटात खरा व्हिलन कोण? या चर्चेला सध्या उधाण आले आहे. चित्रपटाच्या ट्रेलरवरून सिद्धार्थ मल्होत्रा किंवा रितेश देशमुख यापैकी कोणीतरी एकजण चित्रपटात व्हिलन असल्याचे जाणवते. परंतु, आणखी एका ट्रेलरवरून श्रद्धा कपूर व्हिलन असल्याचे दिसते. यामुळे चित्रपटात नेमका व्हिलन कोण आहे, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. याविषयी बोलताना दिग्दर्शक मोहित सुरी म्हणतो, चित्रपटात कोण व्हिलन आहे याबाबतची उत्सुकता कमालीची ताणली गेली आहे. माझ्या मते प्रत्येक जण व्हिलनच आहे. ‘बालाजी मोशन पिक्चर्स’ चित्रपटाचे निर्माता असून, त्यांचे सीईओ तनुज गर्ग म्हणाले, चित्रपटातील व्हिलनबाबत लोक लावत असलेले तर्क-वितर्क पाहून, आम्हाला आमच्या योजनेविषयी आनंद वाटत आहे. व्हिलन कोण आहे हे जाणून घेण्यापेक्षा अन्य बरंच काही या चित्रपटात आहे. २७ जून रोजी ‘एक व्हिलन’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Story img Loader