एक उत्तम अभिनेत्री म्हणून यशाच्या शिखरावर असतानाच प्रियांका चोप्राने संगीत क्षेत्राकडे वळून तेथेही स्वत:ला सिद्ध करून दाखवले. आता यानंतर चित्रपट निर्मितीकडे प्रियांका लक्ष केंद्रीत करत आहे. यावर प्रत्येकवेळी काहीतरी वेगळे देण्याचा प्रयत्न असतो असे प्रियांका सांगते. तसेच मी केलेल्या प्रत्येक गोष्टी माझ्यासाठी खास असून त्यात वेगळेपण असते, असेही ती म्हणाली.
‘मिस इंडिया’चा किताब पटाविल्यानंतर चर्चेत आलेली प्रियांका वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेत सहभागी झाली होती. त्यानंतर २००३ साली बॉलीवूडमध्ये पदार्पण करत प्रियांकाने आजवर मागे वळून पाहिलेले नाही. अभिनयानंतर संगीताचेही शिवधनुष्य प्रियांकाने उत्तमरित्या पेलले. प्रियांकाचे ‘इन माय सिटी’सारखे जागतिक अल्बम भरपूर लोकप्रिय आहेत. प्रियांका म्हणते की, “माझ्या व्यक्तिमत्त्वातच वेगळेपण आहे. मला ज्या गोष्टी कराव्या वाटतात त्याच मी करते. मग, त्यांना चांगला प्रतिसाद मिळेल की नाही याचा मनात विचार नसतो. पण, आजवर ज्या गोष्टी केल्यात त्या माझ्यासाठी खास ठरल्या. एखाद्याचे अनुकरण करत मार्ग निवडणे पसंत नसून मार्ग स्वत: तयार करण्यावर माझा विश्वास आहे.” असेही ती पुढे म्हणाली. भविष्यात कोणते वेगळेपण देण्याचा मानस असल्याचे प्रियांकाला विचारले असता, अभिनेत्री किंवा गायक अथवा निर्माती होईन असेही मला कधी वाटले नव्हते. आयुष्याला नवे वळण देणारी वळणे येत गेली आणि मी साऱया भूमिका साकारत गेले, असे सहजपणे प्रियांका म्हणाली.