Arushi Nishank: उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या मुलीने मुंबईस्थित चित्रपट निर्माती कंपनीवर फसवणुकीचा आरोप केला आहे. चित्रपटात भूमिका देण्याच्या नावाखाली चार कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली, असा दावा निशंक यांची मुलगी आरुषी निशंक यांनी केला आहे. याबद्दल देहरादूनच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरुषी निशंक या अभिनेत्री, चित्रपट निर्मात्या आहेत. मुंबईतील मिनी फिल्म्स प्रा. लि.च्या मानसी आणि वरुण बागला या दाम्पत्याविरोधात आरुषी यांनी देहरादूनमधील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. आरुषी यांनी म्हटले की, बागला दाम्पत्याने देहरादूनमध्ये येऊन भेट घेतली होती. यावेळी त्यांनी चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली. बागला यांच्या कंपनीने पूर्वी विक्रांत मॅसी आणि राधिका आपटे अभिनित फॉरेन्सिक या चित्रपटाची निर्मिती केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चित्रपटात भूमिका दिली जाईल, या आश्वासनानंतर आरुषी यांनी गुंतवणूक केली, मात्र नंतर त्यांना चित्रपटात भूमिका दिली गेली नाही, असा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. आरुषी गढवाली असल्याबद्दल त्यांना हिणवण्यात आले, असाही दावा करण्यात आला आहे.

आरुषी निशंक म्हणाल्या की, बागला दाम्पत्याने ते मिनी फिल्म प्रा. लि.चे दिग्दर्शक असल्याचे सांगितले. अभिनेत्री शनाया कपूर आणि विक्रांत मॅसीला घेऊन ते चित्रपट निर्माण करणार असल्याचे सांगितले. त्यांनी मला चित्रपटात भूमिका देण्याचे वचन दिले, मात्र नंतर मला पाच कोटी रुपये गुंतवणूक करण्यास सांगितले. ही गुंतवणूक केल्यास माझ्या कंपनीला २० टक्के नफा दिला जाईल, जो की १५ कोटींच्या आसपास असेल, असेही त्यांनी सांगितले.

आरुषी निशंक यांच्या तक्रारीनंतर बागला दाम्पत्यावर खंडणी, फसवणूक, बोगसगिरी आणि गुन्हेगारी धमकी दिल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरुषी निशंक यांनी पुढे सांगितले की, चर मला भूमिका पसंत पडली नाही तर माझ्या गुंतवणुकीवर वार्षिक १५ टक्क्याचे व्याज देऊन ती परत दिली जाईल. बागला दाम्पत्याने आरुषी यांच्या हिमश्री फिल्म्सबरोबर एक करारही केला होता. तसेच चार कोटी रुपये आगाऊ घेतले होते.

मिनी फिल्म्सने काय म्हटले?

गुन्हा दाखल झाल्यानंतर द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना वरुण बागला यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच हे प्रकरण दिवाणी स्वरुपाचे असून आमच्यावर केलेले आरोप चुकीचे असल्याचे म्हटले आहे. याबद्दल मिनी फिल्म्सने अधिकृत निवेदनही प्रसिद्ध केले आहे. आरुषी या स्वतःहून आमच्याकडे आल्या होत्या. त्यांनी चित्रपटात भूमिका मागितली आणि त्याबदल्यात या प्रकल्पात पैसा गुंतवण्याबद्दल सहमती दर्शविली होती. मात्र नंतर त्यांनी आम्हालाच धमकाविण्यास सुरुवात केल्याचे या निवेदनात म्हटले आहे.