जीवनात मला खरी ओळख कशामुळे मिळाली असं जर मला कोणी विचारलं तर त्याचं उत्तर नक्कीच रंगभूमी असं असेल, या शब्दांत मराठी अभिनेते जयवंत वाडकर यांनी रंगभूमीसोबतचं त्यांचं नातं सर्वासमोर मांडलं. त्यामुळे रंगभूमीनेच मला घडवलं असं म्हटलं तर त्यात काही वावगं ठरणार नाही. आजही जे होतकरु कलाकार माझ्याशी बोलायला येतात त्यांना मी रंगभूमीकडे वळायला सांगतो. कारण तिथे तुम्ही जे शिकता ते कोणताही सिनेमा किंवा मालिका तुम्हाला शिकवू शकत नाही असं माझं ठाम मत आहे. माझ्या सुरुवातीच्या काळात आम्हाला एकाहून एक सरस असे गुरू, मित्र आणि सहकलाकार लाभले. त्यामुळे एक कलाकार म्हणून आमच्यात अनेक सुधारणा झाल्या. आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा म्हणा किंवा सतीश पुळेकर यांच्यासारखे गुरू म्हणा यांच्यामुळेच आम्ही खऱ्या अर्थाने समृद्ध झालो.

आता जुन्या आठवणींमध्ये आम्ही जेव्हा रमतो तेव्हा अनेकदा नाटकांचेच विषय अधिक निघतात. एकदा का एक आठवण सुरू झाली की त्यामागे आठवणींचे डोंगर उभे राहतात. आताही तसंच झालं आहे. मी प्रदीप पटवर्धन, प्रशांत दामले, विजय पाटकर आम्ही सगळे एकत्र स्पर्धा गाजवत होतो. या गोष्टी करत असताना आम्हाला व्यावसायिक नाटक आणि सिनेमे मिळायला सुरूवात झाली होती. १९८३ मध्ये मी माझं पहिलं ‘बेबंदशाही’ हे नाटक केलं. या नाटकाचे दिग्दर्शन मामा पेंडसे यांनी केले होते. आताच्या पिढीला पेंडसे कोण हे कदाचित माहित नसेल पण तेव्हाच्या कलाकारांना पेंडसे व्यक्तिमत्त्व काय होतं हे चांगलंच माहित आहे. त्यांच्या हाताखाली काम करणं हे माझ्यासाठी भाग्याचं होतं. साहित्य संघासाठी आम्ही हे नाटक केलं होतं. या नाटकात मी खलनायिकाची भूमिका केली होती.

यानंतर विश्राम बेडेकर यांचं ‘टिळक आणि आगरकर’ हे नाटक केलं. हे माझं दुसरं नाटक होतं. भक्ती बर्वे यांच्यासोबत मी पहिल्यांदा काम केलं होतं. त्या नाटकामध्ये माझं काम तसं लहान असलं तरी तो प्रवास मी फारच एन्जॉय केला. नाटकामुळे तुम्हाला एक शिस्त लागते जी पुढच्या वाटचालीसाठी फार आवश्यक असते. आमची पिढी ती शिस्त नाटकातूनच शिकली. स्वतःचे कपडे स्वतः घालता आले पाहिजेत, मेकअपही आपला आपल्याला करता आला पाहिजे अशा छोट्या गोष्टीही आम्ही तेव्हा शिकलो ज्याचं महत्त्व तुम्हाला नंतर नकळत कळून येतं. बेडेकरांची शिस्त म्हणजे आम्हाला खुर्चीत बसायची परवानगी नव्हती. आम्ही लाकडी बाकड्यांवर बसायचो. त्यातही पाठ न टेकता ताठ बसायचं. अशा छोट्या गोष्टींचं महत्त्व तेव्हा वाटत नसलं तरी ते आज कळतंय.

नाटकांच्या तालमीच्या वेळीही एखाद्या कलाकाराची तालीम त्या दिवशी असो अथवा नसो सर्व कलाकारांना दिलेल्या तारखेला आणि दिलेल्या वेळेत हजर राहावेच लागायचे. नाटक काय आहे आणि आपल्या सहकलाकाराची व्यक्तिरेखा काय आहे हे त्यात काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराला कळलं पाहिजे यासाठी बेडेकरांची ही शिस्त होती. पण आता प्रत्येकजण स्वतःच्या वेळेनुसार वेगवेगळी तालीम करतो आणि शेवटच्या तीन दिवसांमध्ये सगळे कलाकार एकत्र येऊन रंगीत तालीम करतात. त्यामुळे अनेकदा प्रयोग सुरू झाले तरी कित्येक नाटकांच्या १० प्रयोगांपर्यंत रंगीत तालमीच होत राहतात.

या दोन नाटकांनंतर पुढेही अनेक नाटकात काम केले. पुरूषोत्तम नार्वेकर, दिलीप कोल्हटकर, पुरूषोत्तम बेर्डे, दामू केंकरे यांसारख्या व्यक्ती भेटत गेल्या. ‘बायको असून शेजारीण’ हे माझं शेवटचं नाटक. हे नाटक करताना मी सिनेमांमध्येही काम करत होतो. या नाटकाचे मी ७०० हून अधिक प्रयोग केले. या नाटकासाठी मला शासनाचा पुरस्कारही मिळाला. पण त्यानंतर सिनेमांमध्ये अधिक भूमिका मिळायला लागल्यामुळे रंगभूमीकडे थोडं दुर्लक्ष झालं. पण आता पुन्हा एकदा रंगभूमीकडे वळत आहे. महेश मांजरेकर यांची निर्मिती असलेले ‘तुझं आहे तुजपाशी!’ हे जुनं नाटक नव्या रुपात करत आहोत. भविष्यात अजून एक दोन नाटकांमध्ये काम करण्याची माझी सध्या इच्छा आहे.

शब्दांकन- मधुरा नेरुरकर

madhura.nerurkar@loksatta.com