मराठी रंगभूमी… या दोन शब्दांमध्येच एक मोठा इतिहास दडलेला आहे. इतिहास कितीही मोठा आणि प्रगल्भ असला तरी तो वर्तमानातूनच घडत असतो. आजची मराठी रंगभूमीही आधीसारखीच प्रगल्भ आहे. नवनवीन विषयांवर येणारी नाटकं, वेगवेगळे प्रयोग करण्याचं धाडस या सगळ्यामध्ये मराठी रंगभूमी नेहमीच अग्रेसर राहिली आहे. कितीही कठीण काळ आला तरी ती कधीच कोलमडून पडली नाही. अशाच या रंगभूमीवर नितांत प्रेम करणारा एक अवलिया म्हणजे अजित भुरे. कथा पडद्यामागची या सदरासाठी त्यांनी रंगभूमीचे काही किस्से ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी शेअर केले.

माझ्यासाठी नाटक म्हणजे, स्वतःला व्यक्त करण्याचं माध्यम आहे. प्रत्येक कलाकार हे अनेक मार्गाने सांगत असेल, पण त्यात तथ्यही तेवढच आहे. आपल्याला अनेक गोष्टी सांगायच्या असतात पण त्या व्यक्त करायला योग्य असं माध्यम मिळत नाही. आमच्यासारख्या कलाकारांना रंगभूमी हे माध्यम आहे. इथे आम्ही व्यक्तही होतो आणि मोकळा श्वासही घेतो.

लवकरच आम्ही ‘सेल्फी’ या नाटकाचा १५० वा प्रयोग करणार आहोत. हे नाटक माझी जवळची मैत्रीण शिल्पा नवलकरने लिहिलंय. १९८४ मध्ये राज्य नाट्य स्पर्धेवेळी आमची ओळख झालेली. तेव्हापासूनची आमची मैत्री आजतागायत आहे. रंगभूमी तुम्हाला आजन्म पुरेल अशी मैत्रीही देते. शिल्पाला हे नाटक मी दिग्दर्शित करावं असं वाटतं होतं. त्याप्रमाणे आम्ही या नाटकाची बांधणीही केली आणि आज हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

मी स्वतःला रंगभूमीचाच माणूस मानतो. जर मला सिनेमा आणि नाटक यांपैकी काही निवडायला सांगितलं तर मी नक्कीच नाटकाची निवड करेन. कारण दोन्हीकडचं अर्थकारण खूप वेगळं आहे. कमी पैशांत जास्तीत जास्त परिणामकारक गोष्ट जर सांगायची असेल तर नाटक हे एक उत्तम मार्ग आहे.

राज्य नाट्य स्पर्धेंपासून मी या रंगभूमीशी जोडलो गेलो आहे. या इतक्या वर्षांमध्ये असे अनेक प्रसंग आले जे कायम लक्षात राहिले. पण अमेरिकेत ‘सेल्फी’ नाटकाचा दौरा असताना एका प्रयोगाला एका महिलेने तिच्यासोबत घडलेली एक खळबळजनक घटना ३५० ते ४०० लोकांसमोर सांगितली. तीच घटना त्या महिलेला आपल्या जवळच्या व्यक्तिलाही सांगता येत नव्हती. पण ‘सेल्फी’ नाटक पाहिल्यावर तिच्यात तो आत्मविश्वास आला आणि तिने ती घटना सर्वांसमोर सांगितली. तो क्षण मी कधीही विसरू शकत नाही. एखादी छोटीशी गोष्टही तुम्हाला किती आत्मविश्वास देऊ शकते याचच हे उदाहरण होतं आणि आमच्या कामाची ती पोचपावती होती.

शब्दांकन- मधुरा नेरुरकर
madhura.nerurkar@indianexpress.com