अनेकदा एखाद्या वक्तीबद्दल सांगताना त्यांची थोडी ओळख द्यावी लागते. पण या रचनेलाही त्या व्यक्तीच्या नावानेच छेद दिला जातो. एखाद्या कलाकाराचं फक्त नाव जरी घेतलं तरी पुरेसं असतं. आज ‘कथा पडद्यामागची’मध्ये असंच एक नाव आपले रंगभूमीवरचे अनुभव सांगणार आहेत. हे नाव म्हणजे प्रख्यात संगीतकार अशोक पत्की…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रंगभूमी ही फक्त नटाची किंवा दिग्दर्शकाचीच असते असं नाही इथे काम करणाऱ्या प्रत्येक माणसाची ती असते. मग तो प्रकाशयोजनाकार असो नेपथ्यकार किंवा संगीतकार. इथे काम करणाऱ्या प्रत्येकाला प्रत्येक प्रयोगासाठी अक्षरशः जगावं तरी लागतं किंवा मरावं तरी लागतं. कारण समोर सुरू असलेलं सगळं लाइव्ह असतं. इथे रिटेकला वावच नसतो. पहिला प्रयोग दणक्यात झाला म्हणून दुसऱ्या किंवा ५०० व्या प्रयोगाला माणूस शांतपणे काम करेल असं कधीच होत नाही. कला क्षेत्रात जर जगायला समृद्ध व्हायला शिकायचं असेल तर नाटकांशिवाय पर्याय नाही.

‘मत्स्यगंधा’ या नाटकावेळी माझी पंडित जितेंद्र अभिषेकींशी ओळख झाली. त्यांच्या मदतीनेच मला माझं संगीतकार म्हणून पहिलं नाटक मिळालं. गोवा- हिंदूसाठी ‘आटपाट नगरची राजकन्या’ हे बालनाट्य केलं होतं. या नाटकाचं संगीत तेव्हा अनेकांना आवडल होतं. अनेकांनी मला भेटून, फोन करून माझ्या कामाची पोचपावतीही दिली. त्यानंतर गोवा-हिंदूसाठी मी सुमारे १८ नाटकांना संगीत दिलं. हा प्रवास सुरू असताना मोहन वाघ, सुधीर भट यांच्या नाट्यसंस्थेमध्येही काम करायला लागलो. सुधीर भटांच्या अनेक नाटकांमध्ये प्रशांत दामले आवर्जुन असायचा. भटांचे ‘मोरुची मावशी’ नाटकाला संगीत देण्यासाठी मी एकदा गेलो होतो तेव्हा त्या नाटकात फक्त एकच गाणे होते तेही विजय चव्हाण यांचे ‘टांग टिंग टिंगाक..’ निर्मात्याने मला हे गाणे बसवून द्यायला सांगितले. गाण्याचा गळा नसला तरी त्या गाण्याला एक लय होती. तिच लय अनेकांना आवडली आणि नाटकात अजून २ ते ३ गाणी वाढवली गेली.

सुधीर भट आणि प्रशांत दामले हे जसं समीकरण झालं होतं. तसंच प्रशांतच्या नाटकात एखादं तरी गाणं असावं आणि त्या गाण्याला मी संगीत द्यावं हाही एक अलिखीत नियम बनला होता. आतापर्यंत प्रशांतच्या ८० गाण्यांना मी संगीत दिलं अजून प्रेक्षकांनाही ही गाणी फार आवडली. सध्या प्रशांत दामले याच्या ‘साखर खाल्लेला माणूस’ या नाटकालाही मी संगीत दिलं आहे. कोणत्याही गाण्याला मी संगीत देताना आधी ते मला आवडणं फार आवश्यक असतं. जर ती रचना मलाच आवडली नाही तर मी ते पुढे जाऊ देत नाही. या नाटकामध्ये प्रशांतसाठी एक गाणं रेकॉर्ड करत असताना मी त्याला सहज बोलून गेलो की, या गाण्याला प्रत्येकवेळा वन्स मोअर मिळणार, तर आपण वन्स मोअर मिळाल्यानंतरच्या गाण्याचेही रेकॉर्डिंग करून ठेवू. यावेळी दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णीही तिथे होता. मला सांगायला फार आनंद होतोय की या नाटकाचे आतापर्यंत १०० प्रयोग झाले असून प्रत्येक प्रयोगाला या गाण्यावेळी प्रशांतला वन्स मोअर मिळाला आहे.

नाटकाच्यावेळी होणारी तिसरी घंटा खूप काही देऊन जाते. मी संगीतकार म्हणून जेवढं रंगभूमीवर शिकलो तीच माझ्या आयुष्याची पुंजी झाली आहे. पण सध्या तसं होत नाही. प्रत्येक कलाकार मालिका, सिनेमांमध्ये व्यग्र असतो. त्यामुळे तो नाटकाला पाहिजे तसा वेळ देऊ शकत नाही. यात त्यांची चूक आहे की नाही हे सांगता येणार नाही. आधी एक नाटक बसवण्यासाठी दोन ते तीन महिने द्यावे लागायचे. पण आता अवघ्या १० दिवसांत नाटक बसवलं जातं. हे खूप चुकीचं आहे. पाठांतरही न होता कलाकार नाटक करायला उभे राहतात. अशा नाटकांना प्रेक्षकही फार येत नाही. सगळ्याचेच नुकसान. मुक्ता बर्वेचे ‘कोडमंत्र’ नाटक नुकतेच पाहिले. जे चांगलं त्याचे कौतुक केलेच गेले पाहिजे. या नाटकाच्या तिकिटांसाठी आगाऊ तिकीटं घ्यावी लागतात. उत्तम कलाकार, समर्पित भाव यामुळेच कोणतीही कलाकृती चांगली होते असं मला नेहमी वाटतं.

मूळ ‘कट्यार काळजात घुसली’ हे नाटक बसवताना पंडित जितेंद्र अभिषेकींसोबत मी सहाय्यक म्हणून काम करत होतो. तेव्हा त्यांनी दोन ते तीन गाणी बसवली आणि अचानक गायब झाले. त्यांचा मुक्काम अधिकतर लोणावळ्याला किंवा गोव्याला असायाचा. त्यांचा शोध घेण्यासाठी तिथे काही माणसंही पाठवली. पण ते तिथेही नव्हते. १५- २० दिवसं वाट पाहूनही त्यांचा काही शोध लागला नाही. तेव्हा मोबाइल नसल्यामुळे नेमका संपर्क करावा तरी कसा, असा प्रश्न उपस्थित झाला होता. तेव्हा प्रभाकर पणशीकरांनी आमच्यापैकी काहींना जमतंय का ते पाहायला सांगितले पण अभिषेंकीसमोर आमचा कसला निभाव लागणार… सगळे चिंतेत असताना अचानक अभिषेकी नाटकाच्या तालमीच्या इथे आले आणि गाणी बसवायला सुरूवात केली. त्यावेळी त्यांचा लागलेला सुर आजही मला आठवतो. तेव्हाचे अभिषेकी काही वेगळेच होते. ते कुठे गेलेले असा प्रश्न जेव्हा आम्ही त्यांना केला तेव्हा ते संगीताच्या साधने करण्यासाठी भूमिगत झाल्याचे म्हटले. अशा लोकांसोबत काम करायला मिळालं याहून आयुष्याकडे काय मागणं असेल.

शब्दांकन- मधुरा नेरुरकर
madhura.nerurkar@indianexpress.com

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Exclusive katha padyamagchi marathi music director ashok patki shares his experience in drama