काही नाटकातल्या भूमिका या एखाद्या व्यक्तीसाठीच बनलेल्या असतात, असं म्हणतात किंवा एखाद्या कलाकाराने अजरामर केलेली रंगभूमीवरची व्यक्तिरेखाच त्यांची ओळख बनते. पण अशी एक व्यक्ती आहे जिच्याकडे पाहून अमुक एखाद्या नाटकातली व्यक्तिरेखा आठवायची म्हटली तर त्याच्या अजून एका नाटकातली व्यक्तिरेखा डोकं वर काढते आणि अरे तेही चांगलं होतं की असा विचार मनात येतो. मग एक दोन तीन.. असंख्य नाटकांची नावं, त्याच्या नुसत्या एण्ट्रीने होणारा टाळ्यांचा कडकडाट… टाळ्यांचा स्वीकार करण्यासाठी घेतलेला खास पॉज आणि सतत होणाऱ्या टाळ्यांच्या आवाजात पुढचे २.३० ते ३ तास कोणालाही हसण्याशिवाय पर्याय नसतो असा रंगभूमीचा लाडका अभिनेता म्हणजे प्रशांत दामले. आज प्रशांत दामले यांचा ५६ वा वाढदिवस.
रंगभूमी आणि प्रशांत दामले ही दोन नावं एकमेकांपासून वेगळी करताच येणार नाही. दरवर्षी प्रशांत वाढदिवसाला हमखास घरी असतात. दिवसभर एकमेकांना वेळ देणं, घरच्यांबरोबर बाहेर फिरायला जाणं आणि रात्रीचं जेवण बाहेर करण्याच्या त्यांच्या या परंपरेला यावर्षी मात्र तडा गेला. प्रशांत यंदाचा वाढदिवस घरच्यांसोबत नाही तर ‘टी-स्कूल’मधल्या मुलांसोबत साजरा करणार आहेत. त्यांच्या’ टी- स्कूल’ या इन्स्टिट्यूटच्या मुलांचा येत्या दिवसांत अंतिम परफॉर्मन्स असल्यामुळे त्यांची रिहर्सल घेण्याकडेच त्यांचे अधिक लक्ष आहे. त्यातही स्वतःचा वाढदिवस साजरा करण्यासाठी प्रशांतने मुलांना १५ मिनिटं मोकळा वेळ देण्याची तयारीही दाखवली आहे.
१९८३ मध्ये ‘टुरटुर’ नाटकाद्वारे प्रशांत यांच्या व्यावसायिक नाटय कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यात प्रशांतने एका मद्रासी माणसाची भूमिका साकारली होती. मुळात ते गोरे असल्यामुळे आणि मद्रासी माणसाची व्यक्तिरेखा साकारायची असल्यामुळे मुद्दाम त्यांच्या चेहऱ्याला काळा रंग लावला जायचा. १९८६ मध्ये आलेले ‘ब्रह्मचारी’ हे नाटक प्रशांतसाठी मैलाचा दगड होते. या नाटकातून प्रशांतना मुख्य भूमिका मिळायला सुरुवात झाली होती. त्यानंतर प्रशांतने मागे वळून पाहिलंच नाही. ‘मोरुची मावशी’, ‘गेला माधव कुणीकडे’, ‘पाहुणा’, ‘चल काहीतरीच काय’, ‘प्रितीसंगम’, ‘लग्नाची बेडी’, ‘ब्रह्मचारी’, ‘एका लग्नाची गोष्ट’, ‘सुंदर मी होणार’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘लेकुरे उदंड झाली’, ‘बे दुणे पाच’, ‘जादू तेरी नजर’, ‘आम्ही दोघं राजा राणी’, ‘ओळख ना पाळख’, ‘बहुरूपी’, ‘श्री तशी सौ’, ‘सासू माझी ढासू’, ‘माझिया भाऊजींना रीत कळेना’ आणि सध्या तुफान गाजत असलेली ‘संशयकल्लोळ’, ‘साखर खाल्लेला माणूस’ आणि ‘कार्टी काळजात घुसली’ या नाटकांमधून प्रशांतने लोकांना खळखळून हसवण्याचा आणि प्रसंगी विचार करायला लावण्याचा विडाच उचलला.
३४ वर्षांहून अधिक काळ मराठी रंगभूमीची सेवा केलेल्या प्रशांतना त्या रंगभूमीने आणि प्रेक्षकांनी भरभरुन दिले. आतापर्यंत ११,३०० हून अधिक नाटकांचे प्रयोग त्यांनी केले. त्यातही ‘साखर खाल्लेला माणूस’, ‘संशय कल्लोळ’ आणि ‘कार्टी काळजात घुसली’ या नाटकांचे प्रयोग अजूनही सुरुच आहेत. ‘प्रशांत फॅन फाऊंडेशन’द्वारे ते अनेक समाज कार्यही करत असतातच. याशिवाय अभिनय क्षेत्रात धडपड करणाऱ्या तरुण- तरुणींसाठी या क्षेत्रातील वाढती स्पर्धा लक्षात घेऊन मुलांना शास्त्रशुद्ध ज्ञान मिळावं, यासाठी पुण्यात २०१२ मध्ये ‘टी-स्कूल’ इन्स्टिट्युटची स्थापना केली. अशा या रंगभूमीवरच्या हुकमी एक्क्याला लोकसत्ता ऑनलाईनकडून वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
-मधुरा नेरुरकर
madhura.nerurkar@indianexpress.com