मूकपट गाजविणारा अवलिया विनोदश्रेष्ठ चार्ली चॅप्लिन यांचे गारूड जगावर सारखेच आहे. भारतासह जगभरातील विविध चित्रकारांनी आपल्या कुंचल्यातून चार्ली चॅप्लिनचे ‘भाव’विश्व मुंबईत एका चित्रप्रदर्शनातून उलगडले आहे.
चॅप्लिन इंडिया फोरम आणि स्पाईसेस् बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने नरिमन पॉइंट येथील ‘एनसीपीए’च्या पिरामल गॅलरीत चार्ली चॅप्लिनवरील एका चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतासह जगभरातील विविध भाषक २०० चित्रकारांनी त्यांच्या नजरेतून रेखाटलेले चार्ली चॅप्लिन या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत. अभिनेत्री विद्या बालन हिच्या हस्ते गुरुवारी या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. प्रदर्शनातील सर्व चित्रे अर्कचित्र, रेखाचित्रे स्वरूपातील आहेत.
अभिनयशताब्दीनिमित्त चॅप्लिन यांना आदरांजली म्हणून चॅप्लिन इंडिया फोरमतर्फे वेगवेगळे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. हे चित्रप्रदर्शन त्याचाच एक भाग असल्याची माहिती फोरमचे अध्यक्ष आर. सरथ यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. या प्रदर्शनात विख्यात व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण, बाळ ठाकरे यांच्यासह व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी, प्रभाकर वाईरकर, उदय शंकर, चंद्रशेखर, अब्दुल सलिम, अजो कार्तिकेयन, उन्नीकृष्णन आणि अन्य चित्रकारांची तसेच काही लहान मुलांनी काढलेली चित्रे आहेत. चॅप्लिन यांची प्रसिद्ध टोपी, मिशा आणि काठीच्या या प्रतिकातून काही चित्रकारांनी चॅप्लिन उभा केला आहे. हे प्रदर्शन २७ जूनपर्यंत दुपारी १२ ते रात्री ८ या वेळेत पिरामल गॅलरी, ‘एनसीपीए’, नरिमन पॉइंट येथे पाहता येईल.
शंभर वर्षे झाली तरीही चॅप्लिन यांची लोकप्रियता कमी झालेली नाही. मलाही संधी मिळाली तर श्रीदेवीसारखा चॅप्लिन साकारायची इच्छा आहे. – विद्या बालन</p>