आज टीव्हीवर कोणत्याही चॅनेलवर एक तरी दाक्षिणात्य चित्रपट सुरु असतोच, दाक्षिणात्य चित्रपट हिंदीत डब करून दाखवले जातात. प्रेक्षकांनादेखील हे चित्रपट बघण्यास आवडतात. सध्या बॉक्स ऑफिसवर चलती आहे ती दाक्षिणात्य चित्रपटांची, बाहुबलीपासून ते कांतारापर्यंत, बॉलिवूड चित्रपटांमागे टाकत या दाक्षिणात्य चित्रपटांनी आपले स्थान निर्माण केले आहे. दाक्षिणात्य चित्रपटांना केवळ देशभरात नव्हे तर जगभरातून मागणी येऊ लागली आहे. ‘बाहुबली’ चित्रपट हिंदीत डब केला गेला तेव्हा प्रभासच्या व्यक्तिरेखेला अभिनेता शरद केळकर याने आवाज दिला होता.
दाक्षिणात्य चित्रपटांच्या हिंदी डबिंगमुळे, मध्यंतरी डबिंग इंडस्ट्रीला सुगीचे दिवस आले होते. मात्र आता दाक्षिणात्य स्टार्स स्वतः आपापल्या चित्रपटांचे डबिंग हिंदीत करू लागल्याने डबिंग कलाकारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण दाक्षिणात्य स्टार्सना आवाज देणारे काही ठरविक कलाकार आहेत, मात्र आता प्रभासने ‘साहो’, ‘राधे श्याम’ या चित्रपटांपासून स्वतःचा आवाज स्वतः हिंदीत देण्यास सुरवात केली आहे. केवळ प्रभासच नव्हे तर ‘RRR’ मधला अभिनेता ज्युनियर एनटीआर या अभिनेत्यानेदेखील हिंदीमध्ये स्वतःच डबिंग केले आहे.
विश्लेषण : ‘कांतारा’ चित्रपटामुळे चर्चेत आलेली ‘भूता कोला’ ही लोककला नेमकी आहे तरी काय? जाणून घ्या
दाक्षिणात्य स्टार्स स्वतः डबिंग करू लागल्याने अशा डबिंग कलाकारांचा प्रश्न निर्माण झाला आहे जे केवळ दाक्षिणात्य चित्रपटांचे हिंदीत डबिंग करायचे, सामान्यतः ३ ते ४ दिवसात एखाद्या चित्रपटाचे डबिंग पूर्ण होते. तसेच कोणत्या कलाकारांसाठी आवाज द्यायचा आहे, कोणत्या माध्यमावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे यावर कलाकारांचे मानधन अवलंबून असते. तसेच काही वेळा हे कलाकार काही किचकट कामंदेखील करतात. मुंबईमधील डबिंग कलाकारांशी समन्वय साधणारी सोफिया चौधरी याबाबत असं म्हणाली की, ‘अर्थातच याचा तोटा हिंदी डबिंग कलाकरांना होणार आहे. दक्षिणेतून अनेक चित्रपट आपल्याकडे येतातकाही डबिंग कलाकार अभिनयदेखील करतात परंतु सध्या त्यांच्यासाठी फारसे काम नाही. असे अनेक चांगले कलाकार नुसते बसून डबिंगच्या माध्यमातून कमाई करत आहेत. डबिंग कलाकारांसाठी अधिकाधिक काम शोधण्याचा आमचा प्रयत्न नेहमीच असेल.’
हिंदी डबिंग कलाकारांमध्ये चर्चेतलं नाव म्हणजे संकेत म्हात्रे, अल्लू अर्जुनचे अनेक चित्रपट त्याने हिंदीत डब केले आहेत. तो असं म्हणाला की, ‘कोणाला कोणते पात्र डब करायचे आहे हे नेहमी स्टुडिओ ठरवते. काही वेळा मार्केटिंगसाठी प्रसिद्ध कलाकारांना डबिंग करण्यासाठी बोलावले जाते जेणेकरून आणखीन पैसे कमवता येतील. व्हॉईस ओव्हर इंडस्ट्री, विशेषत: हिंदी डबिंग इंडस्ट्री भारतात अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर आहे. अनेक ज्येष्ठ कलाकार, दिग्दर्शक आणि लेखक आहेत ज्यांनी हा पाया तयार करण्यासाठी वर्षानुवर्षे काम केले आहे. मला खंत एवढीच आहे की इतके वर्ष अनेक लोकांनी या इंडस्ट्रीसाठी मेहनत घेतली आहे आणि त्याची जागा आता एखादा सेलिब्रेटी घेत आहे. यासाठी आवाजत बदलत राहा, फक्त चेहऱ्यासाठी आवाज बदलू नका.
संकेत पुढे म्हणाला ‘दाक्षिणात्य चित्रपट हिंदीत डब केले जातात तेव्हा त्यांना उत्तम प्रतिसाद मिळतो. यामुळे चित्रपटातील अभिनेता हिंदी भाषिक राज्यांमध्ये ओळखला जातो मात्र त्यामागे डबिंग कलाकारांची मेहनत असते. फक्त हे मोठे चित्रपट हे कलाकार स्वत: करण्याचा प्रयत्न करतात, कारण डबिंग इंडस्ट्रीमुळे हे कलाकार लोकप्रिय होत आहेत, अनेक कलाकारांचे काम आणि अभिनेते हे लोक ऑनलाइन, यूट्यूबवर पाहतात.डबिंग कलाकारांच्या या मेहनतीमुळे अल्लू अर्जुनसारखे कलाकार आज उत्तर भारतात प्रसिद्ध झाले आहेत. हे मी सर्व कलाकारांच्या बाजूने बोलत आहे’.
तेलुगू स्टार राणा दग्गुबती शेवटचा अरण्य’ मध्ये दिसला होता, ज्या चित्रपटाचेनंतर हिंदीत तामिळमध्ये डबिंग करण्यात आले. या दोन्ही भाषेतील चित्रपटांना त्याने स्वतः आवाज दिला होता. प्रभासच्या हिंदी चित्रपटांना आवाज देण्यासाठी प्रसिद्ध असलेला अभिषेक सिंग याने सांगितले की ‘जर दाक्षिणात्य कलाकारांनी हिंदीत डबिंग केले तर त्यांचा सूर नक्कीच येईल. तुम्ही ते बदलू शकत नाही. जेव्हा हिंदी प्रेक्षक ते पाहतात त्यांच्या लगेचच लक्षात येते. आणि ते स्वीकारत नाहीत. जेव्हा आम्ही कोणतेही संवाद सादर करतो, तेव्हा आम्हाला त्याची अनुभूती येते. दाक्षिणात्य स्टार्सनी जरी डबिंग केले तरी ते लोकांशी जोडले जात नाही. ‘साहो’ हा चित्रपट इतका मोठा होता मात्र तो चालला नाही, त्याउलट पुष्पा’, ‘केजीएफ’ किंवा ‘जय भीम’ डब केले गेले जे प्रेक्षकांना खूप आवडले होते.’
मयूर व्यास ज्याने रजनीकांत, विजय देवरकोंडा या स्टार्सना हिंदीत आपला आवाज दिला आहे तो असं म्हणाला की ‘सध्या कामाचे प्रमाण वाढले आहे. नवीन चित्रपट जे प्रदर्शित होतात साहजिकच त्यांचे बजेट चांगले असते मात्र जुने चित्रपट डब केले जातात त्यातून मानधन कमी मिळते. जर नवीन चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला तर नक्कीच आम्ही मानधनवाढीची मागणी करू शकतो’.
अभिनेता शरद केळकर त्याच्या भारदस्त आवाजसाठी ओळखला जातो. त्याने पुन्हा एकदा आदिपुरुष चित्रपटासाठी प्रभासला आपला आवाज दिला आहे. बाहुबली चित्रपटाप्रमाणे हा चित्रपटदेखील यशस्वी ठरेल का? हे कळलेच. चेतन सशीतलसारखे दिग्गज डबिंग कलाकार गेली अनेक वर्ष या क्षेत्रात काम करत आहेत.