जागतिक ‘मानसिक आरोग्य दिन’ नुकताच होऊन गेला आहे. आज देशभरातच नव्हे तर संपूर्ण जगभरात लोक कोणत्या ना कोणत्या तणावाखाली आहेत. एखाद्या गंभीर रोगापेक्षा लोकांना आज मानसिक आजार जडले आहेत. यासाठी वयाची मर्यादा नाही अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील व्यक्ती मानसिक तणावातून जात आहेत. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने मानसिक तणावाच्याबाबतीत आपली प्रतिक्रिया दिली आहे, ती असं म्हणाली की ‘मला माझ्या आईने आणि कुटुंबाने या मानसिक तणावातून बाहेर काढले आहे’. बॉलिवूड हे असं जग आहे जिथे रोज नवी स्पर्धा असते, नवा अभिनेता स्टार बनतो तसेच तोच स्टार काही दिवसानंतर पडद्यावर दिसतदेखील नाही.

सध्या एकूणच मनोरंजन विश्वात तणावाचे वातावरण आहे. दोन वर्षांपूर्वी आलेल्या करोनासारख्या साथीच्या आजराने अनेकांचे आयुष्य उध्वस्त झाले. काम मिळणे, मानसिक तणाव, कर्ज यामुळे अनेक कलाकार बेजार होते. हळूहळू परिस्थिती रुळावर येत आहे. एकूणच मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांच्या समस्येवर मानसोपचारतज्ञ (psychologist) शिवानी आंबेकर यांनी असं सांगितले की “कलाकार मानसिक तणावाखाली येण्यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे अपेक्षा, जेव्हा त्या पूर्ण होत नाहीत तेव्हा ते मानसिक तणावाखाली जातात. कलाकार मंडळी जेव्हा मनोरंजन क्षेत्रात काम करण्यासाठी येतात तेव्हा ते चांगली आपल्याला साजेशी भूमिका मिळेल ही अपेक्षा ठेवून असतात, तसेच मुंबई बाहेरचे कलाकार जेव्हा मुंबईत काम करण्यासाठी येतात तेव्हा त्यांना पहिली अडचण असते ती ‘पैश्यांची’, काम लवकर मिळत नाही, तेव्हा कलाकारांना नैराश्य येण्याची शक्यता जास्त असते. या क्षेत्रात प्रचंड स्पर्धा असते, कामाची शाश्वती नसते. या गोष्टी प्रामुख्याने तणावाचे कारण बनतात. बॉलिवूडच नव्हे तर हा प्रकार हॉलिवूडमध्येही मोठ्या प्रमाणावर आहे. अगदी मराठी चित्रपटसृष्टीतदेखील ही समस्या पाहायला मिळते. यश, फेम या गोष्टी अपेक्षेपेक्षा कमी मिळाल्या की कलाकारांना नैराश्य येते”

तणावाचे परिणाम :

तणावाची कारणे सांगितल्यावर त्यांनी परिणामदेखील सांगितले आहेत. त्यांच्या मते “मानसिक तणावात असताना काही लोकांना भूक लागतच नाही, तर काहींना सतत काहीतरी खावंसं वाटतं, झोपेच्या बाबतीतही तसंच काहींची झोप कायमची उडते तर काहींना झोपेशिवाय काहीच सुचत नाही. शिवाय चिडचिड होणे हे सर्वात मोठे मानसिक तणावाखाली असण्याचे लक्षण मानले जातात. सुरवातीला लोकं या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे व्यक्तीला स्वतःबद्दलचा आत्मविश्वास कमी होतो, लोकांशी संवाद साधायची इच्छा होत नाही, दैनंदिन काम करण्यात अडथळे येतात. स्वतःच्या क्षमतेवर संशय येऊ लागतो, सततची कोणत्या ना कोणत्या गोष्टीची चिंता, नकारात्मक विचार, वजन, लैंगिक समस्या, मूड बदलत राहणे. या सगळ्या गोष्टींमुळे मेंदूतील रसायनांमध्ये बदल होतात”.

विश्लेषण: रात्री उशिरा जेवल्याने वजन वाढतं? प्री- डिनरने वजन नियंत्रणात मदत होते का? जाणून घ्या

उपचार :

उपचारांच्या बाबतीत शिवानी असं म्हणाल्या की, “मानसिक ताणतणाव, आजारांवर वेळच्यावेळी उपायोजना करायला हव्यात. मानसिक आजारांमधून तुम्ही जात असाल तर मानसोपचारतज्ञाकडे जाणे तसेच त्यांनी दिलेली औषधे वेळच्या वेळी घेणे. अनेकदा या गोळ्यांवर टीका होत असते की या गोळ्यांची सवय करून घेऊ नये मात्र या गोळ्यांमुळे तुमच्या मेंदूतील रसायनांमध्ये जो असमतोल झालेला असतो तो या गोळ्यांमुळे सुधारण्यास मदत होते. डॉक्टर्सनी दिलेल्या गोळ्यांमुळे व्यक्तीचा काही दिवसानंतर आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. आपले कुटुंबदेखील यात महत्त्वाचे आहे. कुटुंबाने त्या व्यक्तीला समजून घेतले पाहिजे. कुटुंबाने त्या व्यक्तीच्या पाठीशी उभं राहणं महत्त्वाचं आहे. मानसोपचारतज्ञाकडे जाऊन समुपदेशन घेतले पाहिजे.”

विश्लेषण : ‘आदिपुरुष’वर खरंच बंदी घातली जाऊ शकते का? सेन्सॉर बोर्डचे नियम जाणून घ्या

नैराश्यात गेलेले कलाकार :

दीपिका पदुकोणच्या बरोबरीने चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार मानसिक तणावात होते. करण जोहर, अनुष्का शर्मा, शाहरुख खान, एलियाना डिक्रुझ आदी कलाकार मानसिक आजारांची शिकार बनले होते. शाहरुख खान खांदयावर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे नैराश्यात गेला होता. मात्र योग्य ती उपाययोजना करून आज ते आपल्या करियरमध्ये जोमाने काम करत आहेत. बॉलिवूडच नव्हे अगदी कॉर्पोरेट क्षेत्रात मानसिक ताणतणाव वाढत चालला आहे. कामाचे वाढते तास, पुरेशी झोप न मिळणे, कुटुंबाला वेळ न देणे, यामुळे कर्मचार्‍यांमध्ये मानसिक ताणतणाव निर्माण होतो. अशावेळी मानसोपचारतज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक असते.

Story img Loader