नायक-नायिका हा प्रत्येक मालिकेचा गाभा असतो तरी मालिकेला पुढे ढकलण्यासाठी त्यांचं सतत संकटांमध्ये अडकणं महत्त्वाचं असतं. त्यांच्या नात्याचा डोलारा सुरळीत असेल तर मालिका पुढे ढकलणं कठीण होऊन जातं. त्यामुळे त्यांच्या नात्यातील अनिश्चितता सतत प्रेक्षकांना जाणवून देणं महत्त्वाचं असतं. यासाठी सर्वात तगडं कथानक म्हणजे ‘दोघांत तिसरा’चे नाटय़. विशेषत: नवरा-बायकोच्या नात्यामध्ये या तिसऱ्याचा प्रवेश झाल्यास किती नाटय़ रंगू शकेल याची चांगलीच कल्पना टीव्हीवाल्यांना आहे. त्यामुळेही काळ बदलला, पिढय़ा बदलल्या, समाज बदलले तरी या विषयावर येणाऱ्या मालिकांमध्ये बदल होणं नाही. सध्याही टीव्हीवरच्या कित्येक मालिकांचा प्राण याच सूत्रात अडकून राहिला आहे.
‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेची सुरुवातच मुळी मेघनाचं पहिलं प्रेम आणि वडिलांच्या दबावामुळे आदित्यशी तिचं झालेलं लग्न या कथानकाने झाली. त्यानंतर त्यांच्या नात्यामध्ये कोणी ना कोणी तिसरा बनून येण्याची पद्धत कायम राहिली. सुरुवातीला मेघनाच्या पहिल्या प्रियकरानंतर चित्रा आणि त्यानंतर कॉलेजमधील एक मुलगा चक्क तिच्या प्रेमात पडला आहे. अकरावीमध्ये शिकणाऱ्या या मुलाने तिच्यावर कविता पण केली आहे म्हणे. त्यामुळे आता या मुलाला स्वप्नातून बाहेर काढून वास्तवाची जाणीव करून देणे, हे या दोघांचे नवे मिशन आहे. त्यात अर्थात आदित्याची भूमिका महत्त्वाची असणार. ‘का रे दुरावा’ मालिकेतसुद्धा जय आदितीच्या नात्यामध्ये येणाऱ्या तिसऱ्या व्यक्तींची कमतरता अजिबात नाही. ऑफिसमध्ये त्यांचं लग्न झाल्याचे कोणालाच ठाऊक नसल्याने ऑफिसमध्ये रजनी जयच्या प्रेमात पडली आहे. चक्क कंपनीच्या मालकाला आदिती आवडू लागली आहे. त्यामुळे या दोघांनाही न दुखावता लांब कसं करायचं हा पेचप्रसंग जय-आदितीसमोर आहे. मध्यंतरी मालिकेत बांद्रय़ाला राहणाऱ्या आदितीचं विरारला वहिनीकडे जाऊन घरची कामं करणं, नंतर पुन्हा ऑफिस गाठणं, परत विरार ते बांद्रा प्रवास करणं हा अतक्र्य प्रवास प्रेक्षकांच्या पचनी पडत नव्हता. पण, सध्या मालिकेतील गोंधळाचं वातावरण आणि त्यामुळे मालिकेत वेगाने घडत जाणाऱ्या घटनांमुळे मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. दोन बायकांमध्ये अडकलेल्या नवऱ्याबद्दल बोलताना ‘जय मल्हार’चा विषय न निघणं शक्यच नाही. बानू, म्हाळसाच्या कात्रीमध्ये सापडलेला खंडोबा सध्या गोंधळून गेलाय. मालिकेतील कथानकही तितकंच गोंधळून टाकणारं झालं आहे. मध्यंतरी, म्हाळसाने खंडोबांच्या दुसऱ्या लग्नाला केलेला विरोध आणि तो व्यक्त करण्याचं धाडस प्रेक्षकांना आवडू लागलं होतं. पण, आता म्हाळसाने पुन्हा नरमाईची भूमिका घेतली आहे ते मात्र त्यांना खटकतंय.
हिंदीमध्ये सध्या ‘लाइफ ओके’ वाहिनी पूर्णपणे या सूत्रावरच टिकून आहे. या वाहिनीवरील प्रत्येक मालिकेमध्ये तिसऱ्याच्या प्रवेशाने झालेले गोंधळच दिसताहेत. ‘ड्रीमगर्ल’ मालिका सुरू झालेली, एका छोटय़ा खेडय़ातून आलेल्या मुलीचा अभिनेत्री बनण्याच्या प्रवासापासून. पण सध्या लक्ष्मी करण आणि समरमध्ये अडकली आहे. मुंबईमध्ये रोज कित्येक मुली अभिनेत्री बनण्याचे स्वप्न घेऊन येतात, पण इथे आल्यावर त्यांना काम मिळविण्यासाठी प्रचंड धडपड करावी लागते. या मालिकेला हे एक ताकदीचे कथानक मिळाले होते. पण त्याचा उपयोग करून घेण्याऐवजी त्यांनी जुन्या पद्धतीने कुरघोडय़ा, काल्पनिक चुरस याकडे जास्त लक्ष दिलं. त्यामुळे मालिकेतील नावीन्य संपलं आहे. खूप दिवसांमध्ये भरपूर ड्रामा असलेल्या काल्पनिक गोष्टी, चमत्कार, टोकाच्या स्वभावाची माणसं असं कथानक घेऊन एकता कपूरने मालिका केली नव्हती. तिच्या सध्या सुरू असलेल्या बऱ्याच मालिका हलक्याफुलक्या कथानकावर होत्या. पण, त्याची सर्व उणीव तिने ‘कलश’ मालिकेत भरून काढली आहे. एका देवावर पूर्ण विश्वास असलेल्या नायिकेचं नास्तिक नायकाशी लग्न झाल्यास काय होऊ शकते? यावर ही मालिका आहे. अर्थात, यात देवाचा थेट संबंध आल्याने मालिकेत चमत्कारांना पूर्ण वाव आहे. पण, त्या दोघांना एकत्र येण्यासाठी सध्या मालिकेत एका ‘दुष्ट असुरा’चा प्रवेश झाला आहे आणि त्याची पूर्वसूचना म्हणे देवीने नायिकेला आधीच दिली आहे. पण, आजीला तो खलनायक पसंत आहे. त्यामुळे नायिकेचा पूर्णपणे नाइलाज झाला आहे. काही वर्षांपूर्वी या थीमच्या एकताच्या मालिका प्रचंड गाजल्या होत्या. पण, आता प्रेक्षकही सुज्ञ झाला आहे. पुन:पुन्हा त्याच क्लृप्त्यांना तो बळी पडणार नाही, हे या मालिकेच्या डगमगणाऱ्या टीआरपीवरून दिसून येतंय. एकता एकच फॉम्र्युला अनेक वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकते, हे तिचं खरं कौशल्य आहे. याच फॉम्र्युलावर आधारित ‘कुमकुमभाग्य’ मात्र या मालिकेच्या पूर्णपणे वेगळी आहे. मालिकेला सुरुवातीपासून हलक्याफुलक्या कथानकाच्या जोरावर पुढे न्यायचं हे एकताने ठरविलं होतं. त्यामुळे एकाच वेळी कौटुंबिक आणि विनोदी दोन्ही प्रकारच्या मालिका एकत्र पाहिल्याचे समाधान या मालिकेतून मिळते. सतत त्याच त्याच सूत्रावर किती मालिकांचे रहाटगाडगे खेचले जाणार, हाही एक प्रश्न आहे. केवळ केविलवाणे विनोद, अतक्र्य गोष्टींच्या आधारावर मालिका पुढे ढकलली जाऊ शकत नाही, याची टीव्हीला जाणीव होण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

Story img Loader