बॉलीवूड सेलिब्रिटींच्या बायका नेमकं काय करतात? त्यांच्या चकाचांद दुनियेत काय काय घडतं? हे दाखवणारा रंजक शो म्हणजे नेटफ्लिक्सवरचा ‘फॅब्युलस लाइफ ऑफ बॉलीवूड वाईव्ज’. या शोचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. पहिल्या सीझनमध्ये असलेल्या भावना पांडे, नीलम कोठारी, सीमा खान आणि महीप कपूर या चार सेलिब्रिटी बायकांचीच कथा या दुसऱ्या सीझनमध्येही पाहायला मिळणार आहे. करण जोहर, अपूर्व मेहता आणि अनीशा बेग यांची निर्मिती असलेला हा शो अनेकांना आवडला होता. काल्पनिकता आणि वास्तवाचा ताळमेळ साधत केलेला हा शो धड रिॲलिटी शो प्रकारातही मोडत नसला तरी अनेकांना तो पाहायला आवडतो. नव्या सीझनमध्ये या चौघीजणी मिळून काही रोमांचक सफरीवर निघालेल्या पाहायला मिळणार आहेत. गेल्या सीझनमध्ये शाहरुख खान, गौरी खान, जान्हवी कपूर, अर्जून कपूर आणि मलायका अरोरा अशी काही मोजकी पाहुणे मंडळीही या शोमध्ये डोकावून गेली होती. नव्या शोमध्ये आणखी नवं काय हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.
कधी- २ सप्टेंबर
कुठे – नेटफ्लिक्स
कलाकार – नीलम कोठारी, सीमा खान, महीप कपूर आणि भावना पांडे
इंडियन प्रीडेटर – द डायरी ऑफ अ सीरियल किलर
गुन्हेगारीविषयक वेबमालिकांना ओटीटीवर दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद मिळतो आहे. नेटफ्लिक्सवर ‘दिल्ली क्राइम’चे दुसरे पर्व दाखल झाले असतानाच आणखी एका गुन्हेगारी विषय वेबमालिकेचाही दुसरा सीझन प्रेक्षकांसमोर येणार आहे. ‘इंडियन प्रीडेटर’ या वेबमालिकेने पहिल्याच सीझनमध्ये लोकांची मनं जिंकून घेतली होती. आता ‘इंडियन प्रीडेटर – द डायरी ऑफ अ सीरियल किलर’ चा दुसरा सीझनही तितकाच रंजक असणार असा दावा केला जातो आहे. हत्यासत्राच्या सूत्रधाराची कथा या सीझनमधून उलगडणार आहे. अलाहाबादमध्ये एका लोकप्रिय पत्रकाराची हत्या होते. ही हत्या कोणी केली असेल? याचा शोध घेण्यासाठी काही मंडळी एकत्र येतात. एका स्थानिक राजकारणी महिलेचा पती या हत्येमागचा संशयित असावा, असे त्यांना वाटू लागते. पोलिसांनाही आता आरोपी हाती लागेल आणि प्रकरण संपेल, असं वाटत असतानाच एक डायरी त्यांच्या हाती लागते. राजाची डायरी या नावाने असलेल्या डायरीत १३ जणांच्या नावाचा समावेश असतो. ज्यात त्या मृत पत्रकाराचे नावही असते. हे प्रकरण पुन्हा नव्याने सुरू होते, अशी या सीझनची कथा आहे. सुदीप निगम यांनी या वेबमालिकेचे कथालेखन केले असून दिग्दर्शन धीरज जिंदाल यांचे आहे.
कधी – ७ सप्टेंबर
कुठे – नेटफ्लिक्स
क्रिमिनल जस्टिस : अधुरा सच – सीझन २
पंकज त्रिपाठी यांनी लोकप्रिय केलेले माधव मिश्रा हे वकिली पात्र तिसऱ्यांदा नवीन कथा घेऊन परतले आहे. ‘क्रिमिनल जस्टिस’ या वेबमालिकेचे तिसरे पर्व प्रेक्षकांसमोर आले आहे. यावेळी आणखी एक किचकट प्रकरण माधव मिश्रांकडे आले आहे. झारा अहुजा ही लोकप्रिय बाल कलाकार, तिची व्यवस्थापक म्हणून काम करणारी तिची सावत्र आई आणि आर्थिक व्यवहार सांभाळणारे तिचे बाबा या तिघांच्या संदर्भाने ही कथा सुरू होते. मात्र या कथेचा चौथा धागाही आहे. तो आहे झाराच्या सावत्र आईचा मुलगा मुकुल. १७ वर्षांच्या मुकुलला आपण एकटे पडलो आहोत असं वाटतं. सतत बहिणीचा राग राग करणारा मुकुल नशेच्या आहारी जातो. एका रात्री मुकुल आणि झारा दोघेही पार्टीत असतात. दोघेही वेगवेगळय़ा लोकांमुळे पार्टीत येतात. मुकुल झाराला नशेत पाहतो आणि तिला घरी येण्याची विनंतीही करतो. मात्र प्रत्यक्षात तसं होत नाही. दुसऱ्या दिवशी झाराचे प्रेत समुद्रात एका कोळय़ाच्या जाळय़ात सापडते आणि तिच्या खुनाचा ठपका मुकुलवर येतो. आता मुकुलला या खोटय़ा आरोपातून वाचवण्याची जबाबदारी माधव मिश्रा यांच्यावर आली आहे, अशी या मालिकेची सर्वसाधारण कथा आहे. माधव मिश्रा हाही खटला यशस्वीपणे लढतील का आणि लोक पुन्हा तिसऱ्या सीझनमध्येही त्यांना त्याच प्रेमाने स्वीकारतील का?, या प्रश्नांची उत्तरं या नव्या सीझनमध्ये मिळणार आहेत.
कधी – प्रदर्शित
कुठे- डिस्ने प्लस हॉटस्टार
कलाकार – पंकज त्रिपाठी, श्वेता बासू प्रसाद, पूरब कोहली, स्वस्तिका मुखर्जी, गौरव गेरा आणि आदित्य गुप्ता.