चित्रपटसृष्टीतील गळेकापू स्पर्धेत असं काही घडू शकेल, यावर कोणाचा विश्वास बसणार नाही, मात्र अवधूत गुप्ते या अवलियाने हे साध्य केलंय. परवाच प्रदर्शित झालेल्या ‘जय महाराष्ट्र ढाबा बठिंडा’ या चित्रपटासाठी अवधूतने हमखास हिट आणि गोड संगीत देणाऱ्या नीलेश मोहरीरला संधी दिली, चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील या प्रकारची ही पहिलीच घटना ठरावी. (‘दूर गगन की छाँव में’ या चित्रपटाचे शीर्षक गीत निर्माता-दिग्दर्शक-संगीतकार किशोरकुमारने हेमंतकुमार यांच्याकडून गाऊन घेतले होते, तर ‘खामोशी’चे निर्माते व संगीतकार असणाऱ्या हेमंतकुमार यांनी या चित्रपटातील ‘वो शाम कूछ अजीब थी’ या गाण्यासाठी किशोरला आमंत्रित केलं होतं, हे यानिमित्ताने आठवलं!)
‘कळत नकळत’, ‘उंच माझा झोका’, ‘राधा ही बावरी’ यांसारख्या अनेक दैनंदिन मालिकांना गोड शीर्षकगीते देणारा संगीतकार नीलेश मोहरीरच्या खात्यातील चित्रपटांची संख्याही वाढत आहे. अवधूतकडून या चित्रपटाची ऑफर कशी मिळाली आणि यातील गाणी जन्माला कशी आली, याची रंजक कहाणी जाणून घेण्यासाठी नीलेशलाच बोलतं केलं. हा प्रवास उलगडताना त्याने सांगितलं, ‘नोव्हेंबर २०११ मध्ये अवधूतचा मला फोन आला, मित्रा, माझा चित्रपट करशील, अशी थेट आणि अनौपचारिक ऑफर त्याने मला दिली. आपल्या महत्त्वाकांक्षी चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी त्याने माझ्यावर सोपविणे हे माझं भाग्य, त्याचा मोठेपणा. या चित्रपटाचा आवाका मोठा असल्याने अवधूतवर दिग्दर्शक म्हणून मोठी जबाबदारी होती, कोणत्याही प्रेमकथेचा आत्मा हे त्याचं संगीत असतो. माझी आजवरची गाणी पाहून मी चांगलं संगीत देऊ शकेन, असं त्याला कुठेतरी वाटलं असेल, माझ्यासाठी ही मोठी दाद होती.’
स्वत: संगीतकार असल्याने अवधूतने काही सूचना केल्या का किंवा तुझ्या चालींमध्ये फेरफार केले का, हे विचारता, नीलेश म्हणाला, ‘‘बिलकूल नाही, त्याने मला कथा ऐकवली, गाण्यांच्या जागा सांगितल्या, प्रमुख पात्रांची वैशिष्टय़े सांगितली, महाराष्ट्र आणि पंजाब अशा दोन संस्कृती यात दिसणार आहेत, आता तू तुझी कल्पनाशक्ती पणाला लावून संगीत कर, तू नक्कीच उत्तम रचना करशील, एवढंच तो म्हणाला. त्याने मला पूर्ण स्वातंत्र्य दिलं, अर्थात यामुळे माझ्यावरील जबाबदारी अधिक वाढली. मी जोमाने कामाला लागलो. या चित्रपटाच्या निमित्ताने माझी आणि गुरू ठाकूरची जोडी प्रथमच जुळून आली. यात पंजाबची पाश्र्वभूमी असल्याने तसं संगीत देणं आवश्यक होतं. मी यापूर्वी ‘कालाशा काला, लाल दुपट्टा’ वगैरे पंजाबी लोकगीते ऐकली होती, या गाण्यांसाठी आपण बुंदेशांचा कलाम वापरू शकतो, असं जाणवलं, त्यांची वेबसाइट पाहिली आणि आश्चर्य म्हणजे, त्यांचे काही कलाम आमच्या गाण्यांसाठी अनुरूप असल्याचं लक्षात आलं. तीन ते चार गाण्यांमध्ये मी ते वापरलं.
ती कलाम माझ्याकडे जणू चालत आली. गाण्यांच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळीही मला मोकळीक होती. या सहा गाण्यांसाठी स्वत: अवधूत, स्वप्निल बांदोडकर, राहुल वैद्य, जान्हवी प्रभू-अरोरा, वैशाली सामंत या मराठी गायकांशिवाय कृष्णा बेऊरा, रोंकिणी गुप्ता, कल्पना खान, जावर दिलदार असे खास पंजाबी मातीतील आवाजही आम्ही घेतले. यामुळे या गाण्यांना वेगळाच ढंग लाभला आणि ती चित्रपटात चपखल बसली. ही गाणी ऐकल्यानंतर अवधूतची प्रतिक्रिया काय होती, यावर नीलेश म्हणाला, ‘‘स्वत:चं समाधान होईपर्यंत या चाली अवधूतला ऐकवायच्या नाहीत असं मी ठरवलं होतं, गुरू आणि मी ही प्रक्रिया खूप एन्जॉय केली, आमची तयारी इतकी की त्याने एकही गाणं नाकारलं नाही, यातच सारं आलं. अल्पावधीतच ही गाणी लोकप्रिय झाल्याने अवधूतचा विश्वास सार्थ ठरवला, याचं मला समाधान आहे!’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा