तमिळ सुपरस्टार थलपथी विजय त्याच्या आगामी ‘लिओ’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर लोकप्रिय अभिनेत्री त्रिशा कृष्णन दिसणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरची चाहते अत्यंत आतुरतेने वाट बघत होते. अखेर ५ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी निर्मात्यांनी या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित केला. हा चित्रपट तामिळ, तेलगू, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
ट्रेलरला तर प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या ट्रेलरला लोकांनी डोक्यावर घेतलं. चित्रपटाच्या ट्रेलरमधील एका शब्दामुळे चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होताच आता मात्र या चित्रपटाच्या खोट्या टिकीटांमुळे पुन्हा ‘लिओ’ चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर ‘लिओ’ चित्रपटाच्या तिकिटाचा एक फोटो व्हायरल होत आहे. या तिकिटावर १८ ऑक्टोबर सायंकाळी ६ वाजताचा लिओचा शो मदुरईमधील ‘सिनेप्रिया’ चित्रपटगृहात लिओच्या शो असल्याचे डिटेल्स पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : “जिंदगी ऊनकी, इतिहास हमारा”; विकी कौशलच्या बहुचर्चित ‘सॅम बहादुर’चा फर्स्ट लूक प्रदर्शित
भारतात अद्याप ‘लिओ’चं एडवांस बुकिंग सुरूदेखील झालेलं नसताना सोशल मीडियावरील या फोटोने सध्या चांगलीच खळबळ उडवली आहे. याची दखल घेत सिनेप्रिया चित्रपटगृहाने ट्वीट करत लिहिलं, “गेल्या काही दिवसांपासून या नकली तिकीटांचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहे, आम्ही विनंती करतो कुणीही या नकली तिकीटांच्या बळी पडू नये कारण चित्रपटगृहांची मॅनेजमेंट यासाठी जबाबदार नसेल.”
‘लिओ’च्या प्रदर्शित व्हायला अजून नऊ दिवस बाकी आहेत. येत्या शनिवारी म्हणजेच १४ ऑक्टोबरला भारतात एडवांस बुकिंग सुरू होणार असल्याची बातमी समोर आली आहे. अमेरिकेत आधीच एडवांस बुकिंग सुरू झाले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, चित्रपटाने अमेरिकेत पहिल्या दिवसाची अंदाजे ५.८ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचीसुद्धा महत्त्वाची भूमिका आहे. ‘लिओ’ १९ ऑक्टोबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.