एकीकडे सिनेविश्वात अनेक कलाकार लग्नबंधनात अडकत असताना प्रसिद्ध अभिनेत्रीचा संसार मोडला आहे. तिने स्वतः तिच्या घटस्फोटाबद्दल सोशल मीडियावर चाहत्यांना माहिती दिली. आसिफ अली आणि इंद्रजित सुकुमारन यांच्या ‘कोहिनूर’ या मल्याळम चित्रपटात आणि थलपथी विजयच्या ‘भैरवा’मध्ये झळकलेली लोकप्रिय अभिनेत्री अपर्णा विनोद (Aparna Vinod Divorce) हिने पती रिनिलराज पीकेपासून वेगळे होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तिने लग्न व पतीबरोबरचे सर्व फोटो डिलीट केले आहेत.

अपर्णाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर शेअर केलेल्या निवेदनात लग्न हा आयुष्यातील कठीण टप्पा होता, असं म्हटलंय. “प्रिय मित्रांनो आणि माझ्या चाहत्यांनो, मला तुम्हाला सांगायचंय की अलीकडेच माझ्या आयुष्यात एक मोठा व महत्त्वपूर्ण बदल झाला आहे. खूप विचार केल्यानंतर मी माझे लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. लग्न मोडणं हे अजिबात सोपं नव्हतं, पण मला वाटतंय की माझ्यासाठी हा निर्णय योग्य आहे,” असं अपर्णा म्हणाली.

२८ वर्षीय अपर्णा पुढे म्हणाली, “माझे लग्न हा माझ्या आयुष्यातील भावनिक आणि कठीण टप्पा होता, त्यामुळे मी आयुष्यात पुढे जाण्यासाठी ते चॅप्टर बंद केले आहे. या कठीण काळात मला मिळालेल्या प्रेम आणि समर्थनाबद्दल मी कृतज्ञ आहे. आशा आणि सकारात्मकतेने आयुष्यात पुढे जाण्यासाठी मी उत्सुक आहे.”

Aparna Vinod divorce
अभिनेत्री अपर्णा विनोद (फोटो – इन्स्टाग्राम)

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी केलं होतं लग्न

अपर्णा आणि रिनील राज यांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये साखरपुडा केला होता. त्यानंतर काही महिन्यांनी फेब्रुवारी २०२३ मध्ये लग्न केलं होतं. त्यांनी खासगी सोहळ्यात लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नात दोघांचे कुटुंबीय व जवळचे मित्र उपस्थित होते. १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी त्यांनी लग्नगाठ बांधली.

अपर्णा विनोदचे करिअर

अपर्णाने विनोदने दिग्दर्शक प्रियानंदन यांच्या २०१५ मध्ये आलेल्या न्यान निन्नोडू कूदेयुंडू या चित्रपटातून पदार्पण केले होते. तिने ‘कोहिनूर’ आणि ‘भैरवा’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. भैरवामध्ये कीर्ती सुरेश आणि थलपती विजयदेखील होते. ती शेवटची दिग्दर्शक शरण कुमारच्या ॲक्शन थ्रिलर ‘नादुवन’मध्ये दिसली होती. यात तिच्याबरोबर अभिनेता भरत आणि गोकुल आनंद यांच्यादेखील भूमिका होत्या.

Story img Loader