मागील काही महिन्यांत अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकले. मराठी, बॉलीवूड ते अनेक दाक्षिणात्य कलाकारांनी लग्न करत आयुष्यातील नवीन इनिंग सुरू केली. आता आणखी एका अभिनेत्रीने लग्नगाठ बांधली आहे. तिने काही वर्षे डेट केल्यानंतर बिझनेसमन बॉयफ्रेंडशी लग्न केलं. दोघांच्या लग्नाचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत दोघेही खूपच सुंदर दिसत आहेत.
‘GOAT’ या तमिळ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री पार्वती वेणुगोपाल नायर हिने थाटामाटात लग्न केलं आहे. पार्वती १० फेब्रुवारी रोजी तिरुवनमीयूर येथे पारंपारिक दक्षिणात्य पद्धतीने आश्रित अशोकबरोबर लग्नबंधनात अडकली. अभिनेत्रीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ पाहायला मिळत आहेत. अभिनेत्रीने या खास दिवसासाठी सोनेरी रंगाची सुंदर साडी नेसली होती. तर आश्रितने त्याच रंगाचा कुर्ता आणि धोतर असा पारंपरिक लूक केला होता.
पार्वती व आश्रित यांची भेट एका क्लबमध्ये झाली होती. पुढे त्यांची मैत्री झाली आणि ते प्रेमात पडले. एकमेकांना काही वर्षे डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करायचं ठरवलं. त्यांनी ३ फेब्रुवारी रोजी इंगेजमेंट केली. त्यानंतर एका आठवड्याने म्हणजेच १० फेब्रुवारीला ते लग्नबंधनात अडकले. पार्वती व आश्रित यांच्या लग्नाच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
पाहा व्हिडीओ-
कोण आहे आश्रित अशोक?
पार्वती नायरचा पती आश्रित अशोक हा बिझनेसमन आहे. तो चेन्नईचा आहे. लग्नाआधी दोघांनी काही वर्षे एकमेकांना डेट केले. काही दिवसांपूर्वी इंगेजमेंट केल्यानंतर आता त्यांनी लग्नगाठ बांधली आहे. दोघांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. दोघांनाही या नवीन प्रवासासाठी चाहते शुभेच्छा देत आहेत.
पार्वती नायरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिने वयाच्या १५ व्या वर्षी मॉडेलिंगला सुरुवात केली होती. त्यानंतर ती चित्रपटांकडे वळली. तिने ‘उत्तमा व्हिलन’, ‘निमीर’, ‘इंगा किट्टा मोथाथे’, ‘येन्नई अरिंधाल’ आणि ‘आलंबना’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पार्वती शेवटची विजयच्या तमिळ अॅक्शन चित्रपट ‘द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम’ (GOAT) मध्ये झळकली होती.