अनेक बॉलीवूड अभिनेत्री, हिंदी टीव्ही मालिकेतील अभिनेत्री व दाक्षिणात्य अभिनेत्री त्यांच्या व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत राहिल्या. अशीच एक अभिनेत्री आहे जिने तिच्या करिअरची सुरुवात अवघ्या १४ व्या वर्षी केली होती. तिचे चित्रपट सुपरहिट राहिले. तिच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं आणि तिला एकामागे एक चित्रपट मिळू लागले. पण याच दरम्यान ती प्रेमात पडली आणि चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्याची खूप चर्चा झाली.
या अभिनेत्रीने एक नाही तर दोनदा लग्न केले. तिच्या दोन्ही लग्नाला तिच्या कुटुंबियांचा विरोध होता. तिने पहिलं लग्न बिझनेसमनशी केलं, तर दुसरं एका राजकीय नेत्याशी. मुख्य म्हणजे या नेत्यापेक्षा ती तब्बल २७ वर्षांनी लहान होती. चित्रपटाच्या कथेला साजेसं या अभिनेत्रीचं वैयक्तिक आयुष्य आहे.
ही अभिनेत्री म्हणजे कन्नड चित्रपटसृष्टीतील कुट्टी राधिका उर्फ राधिका कुमारस्वामी आहे. राधिकाने नववीत असताना १४ व्या वर्षी ‘नीनागागी’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. तिला २००२ मध्ये आलेल्या ‘नीला मेघा शामा’ सिनेमातून लोकप्रियता मिळाली. तिने २००३ मध्ये ‘इयारकाई’ मध्ये काम केलं होतं.
राधिका कमी वयातच बिझनेसमन रतन कुमारच्या प्रेमात पडली होती. कुटुंब लग्नासाठी तयार नसल्याने दोघांनी पळून जाऊन मंदिरात लग्न केलं, पण हे नातं फार काळ टिकलं नाही. रतन कुमारने राधिकाच्या वडिलांविरोधात तक्रार दिली होती. त्यांनी मुलीच्या करिअरवर परिणाम होऊ नये म्हणून तिचं अपहरण केल्याचं रतन कुमारने म्हटलं होतं. वाद प्रचंड वाढल्यानंतर राधिकाच्या आईने जावयावर मुलीला पळवून नेऊन लग्न केल्याचा आरोप केला होता. याचदरम्यान, रतन कुमारचे २००२ मध्ये हार्ट अटॅकने निधन झाले.
२७ वर्षांनी मोठ्या नेत्यावर जडला जीव, लग्नाची बातमी लपवली
राधिका तिच्यापेक्षा २७ वर्षांनी मोठ्या नेत्याच्या प्रेमात पडली आणि लग्न केलं. तिने २०१० मध्ये मोठा खुलासा केला की तिने २००६ मध्ये एचडी कुमारस्वामींशी लग्न केलंय. दोघांनी गुपचूप लग्न केलं आणि ते ४ वर्षे लपवलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लग्न झालं तेव्हा एचडी कुमारस्वामी ४७ वर्षांचे होते व राधिका त्यांच्यापेक्षा २७ वर्षांनी लहान होती. कुमारस्वामींचं हे दुसरं लग्न होतं. त्यांचं पहिलं लग्न १९८६ साली झालं होतं.
राधिकाच्या वडिलांना तिचं कुमारस्वामी यांच्याबरोबरचं नातं मंजूर नव्हतं, त्यांनी या लग्नाला विरोध केला होता. पण तिने कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न केलं आणि ४ वर्षे लग्न लपवलं. तिच्या वडिलांना लग्नाबद्दल समजल्यावर मोठा धक्का बसला होता.
राधिका कुमारस्वामींची संपत्ती किती?
३८ वर्षीय राधिका कुमारस्वामींची संपत्ती १२४ कोटी आहे, असं म्हटलं जातं. तर, कुमारस्वामी यांची संपत्ती १८१ कोटी आहे. या जोडप्याला एक मुलगी आहे. कुमारस्वामी २०१८-१९ या काळात कर्नाटकचे मुख्यमंत्री होते.