Marathi Art Director Nitin Desai Commits Suicide: सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. त्यांच्या कर्जत येथेली एन. डी. स्टुडिओमध्ये त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. नितीन देसाई यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक हिंदी, मराठी चित्रपटांमध्ये, इतिहासकालीन मालिकांमध्ये कला दिग्दर्शनाचं काम केलं. त्यांच्या आत्महत्येमुळे चित्रपटसृष्टीतून शोक व्यक्त करण्यात येत आहे. ते ५८ वर्षांचे होते.
नितीन देसाई यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं होतं. १९८७ सालापासून त्यांनी चित्रपटांसाठी कला दिग्दर्शनाचं काम सुरू केलं. २००५ साली त्यांनी कर्जतमध्ये त्यांचा एन. डी. स्टुडिओ उभा केला. याच स्टुडिओमध्ये त्यांनी आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
नितीन देसाई यांची कारकिर्द
नितीन देसाई यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक मराठी, हिंदी चित्रपटांसाठी कला दिग्दर्शनाचं काम केलं. यामध्ये जोधा अकबर, हम दिल दे चुके सनम, माचिस, देवदास, लगान, प्रेम रतन धन पायो अशा अनेक हिट चित्रपटांचा समावेश आहे. यासारख्या अनेक चित्रपटांसाठी नितीन देसाईंनी ‘लार्जर दॅन लाईफ’ असं चित्र उभं करण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. अनेक ऐतिहासिक मालिका व महानाट्यांसाठीही नितीन देसाई यांनी उभारलेले सेट प्रचंड चर्चेचा विषय ठरले होते. दरम्यान, नितीन देसाई यांना त्यांच्या उत्तुंग कारकिर्दीमध्ये चार वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्याशिवाय, त्यांना फिल्म फेअर पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं आहे.
हिंदी आणि मराठीतील ऐतिहासिक चित्रपट आणि मालिका म्हणजे नितीन देसाई यांचे कला दिग्दर्शन आणि भव्य सेट्स हे समीकरणच बनले होते. पुढे हेच ऐतिहासिक सेट्स आणि कलात्मक वस्तू एकत्र करत त्यांनी २००५ साली कर्जत येथे भव्यदिव्य एन. डी. स्टुडिओ उभारला. चित्रपटातील भव्य दिव्य सेट्सची ही अद्भुत दुनिया एन. डी. स्टुडिओच्या माध्यमातून त्यांनी सर्व सामान्यांनाही खुली करून दिली होती. चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते ठरलेल्या नितीन देसाई यांनी संजय लीला भन्साळी, आशुतोष गोवारीकर, राजकुमार हिरानी यांसारख्या मातब्बर दिग्दर्शकांबरोबर काम केले होते. ‘राजा शिवछत्रपती’ या ऐतिहासिक मालिकेबरोबरच ‘बालगंधर्व’ या चित्रपटाची निर्मितीही त्यांनी केली होती.
आर्थिक विवंचनेचा सामना
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नितीन देसाई यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं समोर आलं होतं. त्यांनी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलण्यामागे हेच कारण असल्याचं ही सांगितलं जात आहे. नितीन देसाई यांच्या एन. डी. स्टुडिओवर तब्बल २४९ कोटींचं कर्ज असल्याची बाब आता समोर आली आहे. त्यांच्या स्टुडिओवर जप्तीची कारवाईही प्रलंबित होती. यासंदर्भाच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निर्णय येणं अपेक्षित होतं.
दोन वर्षांपूर्वी लागली होती स्टुडिओला आग
नितीन देसाई यांच्या कर्जतमधील एन. डी. स्टुडिओला दोन वर्षांपूर्वी ७ मे रोजी मोठी आग लागली होती. एन. डी. स्टुडिओच्या आवारात फिल्मी दुनिया हे चित्रपट थीमवर आधारित पार्क उभारण्यात आलं आहे. त्याच्या बाजूला एका मालिकेच्या चित्रीकरणासाठी उभारण्यात आलेल्या सेटवर ही आग लागली होती. या आधीच सेटचं मोठं नुकसान झाल्याचंही समोर आलं होतं.
अमोल कोल्हे यांची भावनिक प्रतिक्रिया
“ही बातमी धक्कादायक आहे. माझं वेगळं नातं दादांबरोबर होतं. राजा शिवछत्रपती मालिकेच्या कलादिग्दर्शनाचं शिवधनुष्य पेलणं हे एक अफाट काम होतं. ते फक्त नितीन देसाई यांच्या मेहनतीमुळेच शक्य होऊ शकलं होतं. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येची बातमी ऐकल्यानंतर अजूनही विश्वास बसत नाहीये की इतका कलासक्त माणूस आत्महत्येसारखं पाऊल उचलू शकतो”, अशी भावनिक प्रतिक्रिया अभिनेते अमोल कोल्हे यानी दिली आहे.