कॅनेडियन पॉप स्टार, रॅपर, अभिनेता आणि गायक ख्रिस वू याला बीजिंग न्यायालयाने १३ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. ख्रिसला न्यायालयाने तीन महिलांवर बलात्कार आणि सामूहिक लैंगिक दुष्कृत्यासाठी लोकांची गर्दी जमवल्याप्रकरणी दोषी ठरवून त्याला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. सध्या सोशल मीडियावर त्याच्या या गुन्ह्याची चर्चा आहे.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या एका न्यायालयाने स्पष्ट केले की, ख्रिस वूला १३ वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर हद्दपार करण्यात येईल. ख्रिस वूला गेल्या वर्षी २०२१ मध्ये जुलै महिन्यात पहिल्यांदा ताब्यात घेण्यात आले होते. जूनमध्ये १९ वर्षीय विद्यार्थिनीने त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. विद्यार्थिनीने सांगितले की, ख्रिस वूने केवळ १७ वर्षांची असताना तिला डेटवर घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार केला होता. मात्र त्यावेळी ख्रिसने त्याच्यावर लावलेले हे गंभीर आरोप फेटाळून लावले होते.
चीनमध्ये बलात्काराच्या गुन्ह्यासाठी तीन ते दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे. मात्र, विशेष प्रकरणांमध्ये जन्मठेप किंवा मृत्यूदंडाची शिक्षाही होऊ शकते. चीनमध्ये जन्मलेला ख्रिस वू हा कॅनडाचा नागरिक असला तरी त्याच्यावर चीनमध्ये खटला चालवण्यात आला असून शिक्षाही ठोठावण्यात आली आहे. ‘ख्रिस वू’ला ‘वू यिफन’ म्हणून ओळखले जाते.
गेल्या वर्षी बलात्काराच्या आरोपानंतर अनेक मोठ्या ब्रँड्सनी ख्रिस वूबरोबरची भागीदारी संपवली. यात पोर्श आणि लुई व्हिटॉनसह अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँडच्या नावांचा समावेश आहे. या सर्वांनी ख्रिस वूसोबत जाहिराती आणि इतर करार संपवले आहेत. शिवाय सोशल मीडियावर तिथले प्रेक्षक ख्रिसच्या या कृत्याची जाहीरपणे निंदा करत आहेत.