राहुल देशपांडे
प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांची मुख्य भूमिका असलेला ‘अमलताश’ हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. संगीत या विषयाभोवती गुंफण्यात आलेल्या या चित्रपटाच्या संकल्पनेपासून ते प्रदर्शनापर्यंतचा प्रवास राहुल देशपांडे यांच्याच शब्दांत..
आयुष्यात मला अनेकदा असे अकल्पित पण अविस्मरणीय अनुभव आले, जे मी ठरवूनही मिळवू शकलो नसतो. आता हेच बघा! मी खरं तर सी. ए. व्हायच्या मार्गावर होतो, आणि योग्य वेळी भाई काकांनी, म्हणजेच पु.ल. देशपांडे यांनी, मला माझ्या योग्य मार्गाची जाणीव करून दिली. आणि मी आज जो आहे तो तुमच्यासमोर आहे! माझे बहुतांश निर्णय मी अंतर्मनाचा आवाज ऐकूनच घेतले आहेत. ‘अमलताश’ हा चित्रपट करण्याचा निर्णयही तसाच काहीसा!
या चित्रपटाचा गाभा हा आहे की, आयुष्य हे मुळातच इतकं चंचल, अप्रत्याशित (unpredictable) असतं की येणाऱ्या साऱ्या अनुभवांचा खुल्या मनाने मनमुराद आनंद घ्यावा. काही प्रमाणात चौकट, शिस्त ही जेवढी आवश्यक, तसेच आपल्या आतून येणाऱ्या आवाजाला दाद देणेही तितकेच महत्त्वाचे. ‘अमलताश’ हा चित्रपट बनणं ही अशाच सुंदर, अकल्पित योगायोगाची श्रुंखला आहे.
हेही वाचा >>>Video: ‘मिस वर्ल्ड २०२४’च्या महाअंतिम सोहळ्यासाठी पोहोचल्या अमृता फडणवीस; क्रिती सेनॉन, पूजा हेडगेसह करणार परीक्षण
माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर प्रयोगांपैकी एक म्हणजे माझे ऑडिओ ब्लॉग. या उपक्रमामध्ये मला सर्व प्रकारच्या संगीतावरील माझे प्रेम व्यक्त करण्याचा एक अतिशय अनौपचारिक, वैयक्तिक मार्ग सापडला. जसे माझे आजोबा वसंतराव म्हणायचे, ‘‘गाणं हे गाणं असतं’’. मग ते गाणं लता मंगेशकर यांचं, आशा भोसले यांचं, जगजीत सिंग यांचं, जॉन डेन्व्हर किंवा ब्रायन अॅडम्सचं असो, मला चांगले संगीत नेहमीच आवडते. माझी ही बाजू माझा मित्र सुहास जाणून होता, आणि त्यांनी मला ऑडिओ ब्लॉग करण्यास खूप प्रोत्साहन दिले व त्याचे दिग्दर्शनही केले. ती सगळीच प्रक्रिया हा एक अविश्वसनीय, समृद्ध करणारा अनुभव होता. काही काळानंतर सुहास आणि मी या कल्पनेचा विस्तार कसा करायचा याचा विचार करत होतो, आणि आम्ही एक वेब सीरिज बनवायचं ठरवलं जिचा केंद्रिबदू ‘संगीत’ असेल. आणि इथे ‘अमलताश’चे बीज पेरले गेले.
सुहासने कथा लिहायला सुरुवात केली आणि तो काही महिन्यांत संपूर्ण पटकथा (स्क्रिप्ट) घेऊनच भेटायला आला. जेव्हा मी कथा वाचली तेव्हा मी इतका प्रभावित झालो, मला अजूनही आठवते की शेवटी माझ्या डोळय़ात पाणी तरळलं होतं. तसेच पात्रांचा प्रामाणिकपणा आणि सापेक्षता इतकी भावणारी होती की मला त्यांच्या जीवनाशी त्वरित एकरूप वाटले. हळूहळू लक्षात आलं की यावर तर चित्रपट बनायला हवा!
संगीत हा या चित्रपटाचा आत्मा असावा ही प्रबळ भावना आमच्या संकल्पनेचा मुख्य घटक होता. मी जे काही करतो त्यात संगीत केंद्रस्थानी असते – तो माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. म्हणूनच जेव्हा मी नाटकाच्या दुनियेत पाऊल ठेवले, तेव्हाही मी संगीत नाटक केले (तोही निर्णय असाच! मनाचे ऐकून घेतलेला). संगीत नाटक हा असा प्रकार आहे जिथे संगीत कथेपासून अविभाज्य असते; किंबहुना गाण्यांमधून पात्र संवाद साधतात. ‘अमलताश’मधील प्रत्येक गाणे एकतर कथा पुढे नेते किंवा पात्रांबद्दल काहीतरी सुंदर सांगून जाते.
हे लक्षात घेऊन आम्ही ठरवले की कलाकारांची निवड करताना वास्तविक जीवनात संगीतकार असलेल्या लोकांना निवडू. संपूर्ण कलाकार असेच निवडले गेले! चित्रपटातील पडद्यावर दिसणारे प्रत्येक गाणे थेट सेटवर सिंक साउंडमध्ये ध्वनिमुद्रित केले गेले आहे. प्रत्येक संवादही तसाच, फक्त दोन ओळी वगळता.
जर तुम्ही माझ्या मुलाखती ऐकल्या असतील, तर तुम्हाला आतापर्यंत माहिती असेल की माझ्यासह ‘अमलताश’मधील जवळजवळ प्रत्येकासाठी हा पहिला चित्रपट आहे. अर्थात, चित्रपटातील प्रत्येक जण माझा जुना मित्र किंवा मैत्रीण आहे. त्यांची सौंदर्यदृष्टी मला पूर्ण अवगत आहे – ते व्यवसायाने कलाकार नसले तरी मनाने नक्कीच कलाकार आहेत. कलाप्रेमी आहेत. सुहास आणि त्याच्या मित्रांनी दरवर्षी आयोजित केलेल्या अनेक छायाचित्र प्रदर्शनांना मी हजेरी लावली आहे. त्यामुळे आम्ही जे काही बनवत आहोत त्याच्या सौंदर्यात्मक मूल्याबद्दल मला सुरुवातीपासूनच खात्री होती. जरी आताच्या घडीला प्रेक्षकांसाठी मी एकमेव ओळखीचा चेहरा असलो, तरी मला खात्री आहे हा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्ही माझ्या टीमच्या कामाच्या ही प्रेमात पडाल!
जेव्हा मला काही आव्हानात्मक करण्याची संधी मिळते, तेव्हा माझ्यात नवी ऊर्जा संचारते. याच ऊर्जेने मला संगीत नाटक करण्यास प्रवृत्त केले. त्याच ऊर्जेने आणि थोडय़ाफार अनुभवाच्या पाठबळावर मला ‘अमलताश’ करायचा आत्मविश्वास लाभला. जर मी एखादी गोष्ट करायची ठरवली तर मग मात्र मी स्वत:ला संपूर्ण झोकून देऊन काम करतो. ‘अमलताश’ हे असेच एक आव्हान होते जे स्वीकारल्यामुळे मी माणूस म्हणून आणि कलाकार म्हणून खूप समृद्ध झालो. या प्रक्रियेत कीबोर्ड वाजवायला ही स्वत:च शिकलो!
मी ‘अमलताश’ का आणि कसा निवडला याची ही थोडक्यात कथा आहे. माझ्या टीमच्या वतीने मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आम्हाला पािठबा द्यावा आणि चित्रपटगृहांमध्ये जाऊन ‘अमलताश’ पाहावा. हा चित्रपट ८ मार्च २०२४ पासून महाराष्ट्र भरात प्रदर्शित झाला आहे. आम्ही तुमच्या अभिप्रायाची आतुरतेने वाट पाहात आहोत!