Actor Mizuki Itagaki Found Dead : सिनेविश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ३ महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या प्रसिद्ध अभिनेत्याचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा जपानी अभिनेता अवघ्या २५ वर्षांचा होता.
जपानी अभिनेता मिझुकी इटागाकी २५ व्या वर्षी मृतावस्थेत आढळला आहे. ‘बॉय बँड’चा M!LK चा माजी सदस्य, अभिनेता व मॉडेल मिझुकी जानेवारीच्या अखेरपासून बेपत्ता होता. त्याचा मृतदेह टोकियोमध्ये सापडला आहे. मिझुकीच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियाद्वारे या वृत्ताला दुजोरा दिला आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.
मिझुकीच्या कुटुंबियांचे निवेदन
मिझुकीच्या मृत्यूसंदर्भात त्याच्या कुटुंबियांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. “अभिनेता इटागाकी मिझुकी याचे एका दुर्दैवी घटनेत निधन झालं आहे, हे सांगताना आम्हाला खूप दुःख होत आहे. ज्या चाहत्यांनी त्याला खूप प्रेम दिलं, पाठिंबा दिला आणि ज्यांनी त्याच्याबरोबर काम केलं होतं, त्या सर्वांचे आम्ही मनापासून आभारी आहोत,” असं मिझुकीच्या कुटुंबियांनी निवेदनात म्हटलं आहे.
मिझुकी मागच्या वर्षापासून मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांनी ग्रस्त होता, त्याचदरम्यान तो बेपत्ता झाला होता असं कुटुंबियांनी सांगितलं. मागील तीन महिन्यांपासून मिझुकीचा शोध सुरू होता. अखेर शहरात त्याचा मृतदेह सापडला, अशी माहिती टोकियो पोलिसांनी दिली.
हेही वाचा
कोण आहे मिझुकी?
अभिनेता, गायक आणि मॉडेल मिझुकीचा जन्म २००० मध्ये टोकियो येथे झाला होता. त्याने अगदी लहान वयातच मनोरंजन क्षेत्रात प्रवेश केला होता. आईबरोबर खरेदी करून घरी परतत असताना १० वर्षांच्या मिझुकीला स्टारडस्ट प्रमोशनने साइन केलं होतं. त्याने फुजीफॅब्रिक म्युझिक व्हिडिओतून पदार्पण केलं. २०१४ मध्ये, त्याने डार्क गोल्ड उशिमा-कुन भाग 2 मधून अभिनयात पदार्पण केलं. त्याच वर्षी, तो J-pop आयडल ग्रुप M!LK मध्ये सामील झाला. मिझुकीने त्याच्या करिअरमध्ये उत्तम कलाकृतींमध्ये काम केलं. ब्लॅक सिंड्रेला, इन-हाऊस मॅरेज हनी, फेक मोशन – जस्ट वन विश, ओल्ड रुकी, हिरू सीझन 3, सुपर रिच या सुपरहिट शोमध्ये त्याने काम केलं होतं.