लोकप्रिय के-पॉप गायिका व गीतकार किम नही हिचे निधन झाले आहे. तिच्या आकस्मिक मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. निधन दोन दिवसांपूर्वी ८ नोव्हेंबर रोजी झालं. स्थानिक अधिकारी सध्या तिच्या मृत्यूच्या कारणाचा तपास करत आहेत.
विविध कोरियन न्यूज पोर्टल्सनी दिलेल्या वृत्तानुसार नही हिचे अंत्यसंस्कार आज १० नोव्हेंबर रोजी केले जाईल. प्योंगटेक ग्योन्गी-डो येथील सेंट्रल फ्युनरल हॉलमध्ये तिला अखेरचा निरोप दिला जाईल. तिच्या मृत्यूची बातमी इंटरनेटवर व्हायरल झाल्यामुळे चाहते शोक व्यक्त करत आहेत. तिचा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून चाहते श्रद्धांजली वाहत आहेत. ‘वियॉन न्यूज’ने याबद्दल वृत्त दिलंय.
नही हिच्या निधनाची बातमी समोर आल्यावर तिची शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत आली आहे. विशेष म्हणजे ती पोस्ट तिच्या मृत्यूच्या काही तास आधी म्हणजे ७ नोव्हेंबरला शेअर करण्यात आली होती. तिने विंटर कोट घालून तिने थेट कॅमेऱ्यात पाहतानाचा एक छान सेल्फी शेअर केला होता. त्याशिवाय तिने तिच्या लाडक्या श्वानाचे क्युट फोटो व व्हिडीओ शेअर केले होते.
नही हिने २०१९ मध्ये वयाच्या २० व्या वर्षी सिंगल, ब्लू सिटीसह इंडी गायिका व गीतकार म्हणून तिच्या करिअरला सुरुवात केली. तिने ब्लू नाईट आणि ग्लूमी डेज सारखे सुपरहिट ट्रॅक दिले. तिचं शेवटचं गाणं हे तिच्या चाहत्यांसाठी होतं, ते चार महिन्यांपूर्वी रिलीज झालं होतं. दरम्यान, नहीच्या निधनाबद्दल अधिकारी किंवा कुटुंबाने अद्याप माहिती दिलेली नाही, तसेच निधनाचं कारणही समोर आलेलं नाही.