साऊथ फिल्म इंडस्ट्रीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध मल्याळम अभिनेते कुंद्रा जॉनी यांचे निधन झालं आहे. वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झाल्याचं सांगण्यात येत आहे. छातीत दुखत असल्याने त्यांना एका खासगी रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
आज बुधवारी १८ ऑक्टोबरला सकाळी १० वाजल्यापासून कोल्लम कडापक्कडा स्पोर्ट्स क्लबमध्ये अंत्यदर्शनासाठी कुंद्रा जॉनी यांचं पार्थिव ठेवण्यात आलं आहे. दुपारी ३.३० वाजता त्यांचं पार्थिव त्यांच्या राहत्या घरी नेण्यात येणार असून उद्या १९ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता कांजीराकोड येथील सेंट एंथोनी चर्च परिसरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. कुंद्रा जॉनी यांची पत्नी स्टेला कोल्लममधील एका महाविद्यालयात प्रोफेसर आहेत.
कुंद्रा जॉनी यांनी आपल्या चार दशकांच्या कारकिर्दीत जवळपास ५०० चित्रपटांमध्ये काम केले. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. कुंद्रा जॉनी यांनी वयाच्या २३ व्या वर्षी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी १९७९ च्या मल्याळम चित्रपट ‘नित्या वसंतम’मध्ये ५५ वर्षांच्या व्यक्तीची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्यांनी गॉडफादर (१९९१), इन्स्पेक्टर बलराम (१९९१), अवनाझी (१९८६), राजविंते माकन (१९८६), ओरू सीबीआय डायरी कुरिप्पू (१९८८), किरीडोम (१९८९), ओरू वदक्कन वीरगाथा (१९८९), समोहम (१९८९) या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी मल्याळमसोबत तमिळ चित्रपटांमध्येही काम केले.
हेही वाचा- “गडकरी कमी अन् फडणवीस जास्त…”, ‘गडकरी’ चित्रपटाच्या ट्रेलरवर चाहते नाराज, म्हणाले “त्यांच्या नावाला…”
गेल्या काही महिन्यांमध्ये साऊथ फिल्म इंडस्ट्रीतून अनेक कलाकारांचे दुर्दैवी निधन झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच तमिळ चित्रपट आणि टीव्ही अभिनेता पवन सिंह याचे वयाच्या २५ व्या वर्षी हार्ट अटॅकने निधन झालं. त्याअगोदर ३१ जुलै रोजी तमिळ अभिनेते मोहन रस्त्यावर मृतावस्थेत आढळून आले होते. तसेच कन्नड अभिनेते विजय राघवेंद्र यांच्या पत्नीचे हार्ट अटॅकने निधन झाल्याची बातमी समोर आली होती.