आयुष्याच्या प्रत्येक वळणावर काही व्यक्ती येतात आणि काही जातात. अशा या चक्रात एक टप्पा असाही येतो जेव्हा कोणीतरी खऱ्या अर्थाने आयुष्याचा एक अविभाज्य भाग होऊ पाहात असतं. अर्थात ही नाती जसजशी उलगडत जातात तसतशी त्यांची ओळखही बदलत जाते आणि अखेर टप्पा येतो तो म्हणजे लग्नाचा. सहजीवनाच्या शपथा घेऊन एकमेकांच्या सुखदु:खात साथ देण्याचं वचन दिलं जातं आणि नव्या प्रवासाची नांदी होते. सध्या मल्याळम अभिनेता नीरज माधवच्या आयुष्यात अशाच सुखद क्षणांची उधळण झाली आहे. कारण, सोमवारपासूनच सोशल मीडियावर त्याच्या लग्नाच्या फोटोंनी अनेकांचच लक्ष वेधलं आहे.
कोझिकोडे येथील श्रीकंदपूरममध्ये पारंपरिक केरळी पद्धतीने प्रेयसी दीप्ती हिच्यासोबत नीरजचा विवाहसोहळा पार पडला. खुद्द नीरजनेच त्याच्या आयुष्यातील खास क्षणांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. ज्यानंतर त्याच्यावर अनेकांनीच शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली. अतिशय साध्या पद्धतीने पार पडलेल्या या विवाहसोहळ्यात मोजक्याच पाहुण्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. यावेळी दीप्ती आणि नीरज या दोघांनीही पारंपरिक पद्धतीचा पोषाख घातला होता. पांढऱ्या रंगाच्या सोनेरी जर असणाऱ्या साडीमध्ये नववधूच्या रुपात दीप्ती अगदी शोभून दिसत होती. काही दिवसांपूर्वीच नीरजने दीप्तीसोबतच्या नात्याविषयीची अधिकृत माहिती सर्वांना दिली होती.
ब्रिटनच्या राजकुमाराची शाही लग्नपत्रिका पाहिलीत का?
२०१३ मध्ये ‘बडी’ या चित्रपटातून त्याने अभिनय विश्वात पदार्पण केलं. बऱ्याच मल्याळम चित्रपटांमध्ये त्याने सहायक अभिनेत्याची भूमिकाही साकारली आहे. मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांच्या ‘दृश्यम’ चित्रपटातूनही तो झळकला होता. त्याशिवाय ‘१९८३’, ‘ओरु वडक्कन सेल्फी’, ‘चार्ली’ आणि ‘ओरू मेक्सिकन अपारथा’ या चित्रपटातूनही तो झळकला होता. नीरज त्याच्या नृत्यकौशल्यासाठीही ओळखला जातो. एका डान्स रिअॅलिटी शोमुळे तो प्रकाशझोतात आला होता. अभिनयासोबतच नृत्यदिग्दर्शक म्हणूनही त्याने कलाविश्वात आपलं योगदान दिलं आहे.