रॅपर किलर माइकने ग्रॅमी अवॉर्ड्समध्ये तीन अवॉर्ड्स जिंकले आणि त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली आहे. ‘हॉलीवूड रिपोर्टर’ या वेबसाइटने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये रविवारी ग्रॅमीजच्या प्रीमियर समारंभात अवॉर्ड जिंकल्यानंतर काही वेळात पोलिसांनी त्याला अटक केली. सलग तीन ग्रॅमी जिंकल्यानंतर रॅपर किलर माइकला लॉस एंजेलिस पोलिसांनी क्रिप्टो डॉट कॉम एरिना इथून नेलं. व्हायरल व्हिडीओत त्याचे हात मागे बांधलेले दिसत आहेत.
पोलिसांचे प्रवक्ते अधिकारी माइक लोपेझ यांनी सांगितलं की माइकला पहाटे चार वाजता अटक झाली. ग्रॅमी पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर झालेल्या बाचाबाचीमुळे किलर माइकला अटक करण्यात आली. माइकच्या अटकेबाबत त्याच्या टीमने याबाबतच्या ईमेल किंवा मेसेजला कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.
४८ वर्षीय किलर माइकला सर्वोत्कृष्ट रॅप परफॉर्मन्स, रॅप गाणं आणि रॅप अल्बमसाठी तीन ग्रॅमी पुरस्कार देण्यात आले. त्याचा पहिला पुरस्कार ‘सायंटिस्ट्स अँड इंजिनीअर्स’ या बेस्ट रॅप परफॉर्मन्ससाठी होता, याच गाण्याला बेस्ट रॅप साँगचा अवॉर्डही मिळाला. ‘मायकल’ हा त्याचा बेस्ट रॅप अल्बम होता. किलर माइकला शेवटचा ग्रॅमी पुरस्कार २००३ मध्ये ‘द होल वर्ल्ड’साठी मिळाला होता. “तुमच्या वयावर मर्यादा घालणारी एकमेव गोष्ट म्हणजे तुमच्या वयाबद्दल किंवा तुम्ही काय करत आहात याबद्दल खरं न बोलणं,” असं अवॉर्ड जिंकल्यावर माइक म्हणाला.
“२० वर्षांचा असताना मला ड्रग डीलर बनणं चांगलं वाटलं होतं. ४० व्या वर्षी मी केलेल्या गोष्टी आणि त्याच्या पश्चातापासह मी जगू लागलो. ४५ व्या वर्षी मी याबद्दल रॅप करण्यास सुरुवात केली. ४८ व्या वर्षी मी केलेल्या गोष्टींबद्दल सहानुभूतीने भरलेला माणूस म्हणून मी इथं उभा आहे,” असं माइक म्हणाला.