१९५० ते १९७५ हा भारतीय चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ होता. त्यानंतरच्या काळात चित्रपटातील गीत, संगीत यांचा दर्जा घसरत गेला. त्याला कारणीभूत कोणी एक व्यक्ती नाही तर आपण सगळे आहोत. आपल्या जगण्यातून आपली भाषाच आपण बाद केली. भाषा विकसित होण्यासाठी आपल्या साहित्याचे वाचन, मनन, चिंतन झाले पाहिजे. मात्र आपण भाषेशीच नाळ तोडून टाकल्याने त्याचे प्रतिबिंब चित्रपटातून उमटणे क्रमप्राप्त होते, असे प्रतिपादन गीतकार जावेद अख्तर यांनी केले.
संगीताच्या त्या सुवर्णकाळात नेमकं असं काय दडलं होतं, त्यावेळचे गीतकार, संगीतकार, गायक-गायिका यांच्याकडे अशी काय ताकद होती ज्यांनी आपल्याला अवीट गोडीची अविस्मरणीय गाणी दिली. हे पाहणं, अभ्यासणं आणि लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे, या विचाराने गीतकार जावेद अख्तर ‘झी क्लासिक’ वाहिनीवर ‘गोल्डन एरा’ या कार्यक्रमाचे तिसरे पर्व घेऊन येणार आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलताना जावेद अख्तर यांनी भाषा, साहित्य, चित्रपट आणि समाज यांचे नाते कसे अतूट आहे, याविषयी सविस्तर मांडणी केली. गीतकार साहिर, संगीतकार शंकर जयकिशन ते आर. डी. बर्मन असा प्रवास पाहात असताना त्यावेळी चित्रपट संगीतात माधुर्यच होते असे नाही. त्यावेळी नायक-नायिका यांच्यातील संवादही गाण्याच्या रूपात यायचा. हा काळ म्हणजे भारतीय संगीताची अभिजातता, विचारातील आधुनिकपणा आणि गायन-संगीतातील वेगवेगळे प्रयोग यांचा मिलाफ होता, असे जावेद अख्तर यांनी सांगितले.
भाषा ही तुमच्या साहित्याच्या जोपासनेतून होत असते. मात्र त्यावेळच्या समाजाने आपली भाषाच सोडून दिली. इंग्रजी ही व्यवहाराची भाषा आहे. ती आली नाही तर माणूस अडखळतो, त्याच्यात न्यूनगंडाची भावना वाढत जाते ही खरी गोष्ट आहे. त्यामुळे इंग्रजी भाषा आत्मसात केलीच पाहिजे. मात्र, दुसरी भाषा आत्मसात करत असताना आपल्या भाषेतील कथा-कविता वाचनाची गोडी आपण लावायला हवी होती, हेच आपण विसरलो, असे त्यांनी सांगितले. गीतकार म्हणून आपली सुरुवातही ऐंशीनंतर झाल्याने रूढार्थाने आपणही संगीताच्या सुवर्णकाळाचे साक्षीदार होऊ शकलो नाही, असे सांगताना गीतकार म्हणून सुरुवातीच्या काळात स्वीकारलेल्या चित्रपटांपेक्षा नाकारलेल्या चित्रपटांचीच संख्या जास्त होती, असे ते म्हणाले. हा गीतकार नको, तो आपल्या गाण्यांमधून कविता रचतो, अशा शब्दांत कित्येक दिग्दर्शकांनी आपले काम नाकारले होते, अशी आठवण त्यांनी सांगितली. आजही वयाची पन्नाशी गाठलेला माणूस आणि विशीचा तरुण यांची तुलना केली तर भाषेच्या, शब्दांच्या बाबतीत जुनी माणसे जास्त समृद्ध आहेत हे तुमच्या लक्षात येईल. म्हणी, वाक्प्रचार या गोष्टी आजच्या पिढीला माहिती तरी आहेत का?, असा सवाल त्यांनी केला.
ज्या घरात आई-वडील दोघेही वाचन करतात तिथे विचारांचे, भाषेचे वळण मुलांना आपोआपच लागते हे सांगताना आपली दोन्ही मुले फरहान आणि झोया यांनाही भाषा शिकवावी लागली नाही, असं ते म्हणाले. उलट, ते हिंदी, उर्दू आणि इंग्रजीसह अन्यही वाचत असल्याने त्यांचे ज्ञान आपल्यापेक्षा चौफेर आहे, असे सांगणाऱ्या जावेद अख्तर यांनी एकूणच वैचारिकतेचा सुवर्णकाळ परत आणायचा असेल तर भाषेची जोपासना महत्त्वाचे असल्याचे सांगितले. जुन्या पिढीतील संगीतकारांबरोबरच गीतकार म्हणून आर. डी. बर्मन यांच्याकडे काम करायला आपल्याला आवडले असते, असेही त्यांनी यावेळी सांगितले. सध्या नव्याने पटकथा लेखनात रमलेले जावेद साब लवकरच त्यांच्या चित्रपटाची सुरुवात करणार असल्याचे समजते.
ऐंशीनंतरच्या चित्रपट संगीतात बीभत्सपणा, अश्लील शब्दांनी ठाण मांडले. ‘सरकायले खटिया’सारखी गाणी या काळात लोकप्रिय झाली त्याचे कारणच आपली हरवत गेलेली भाषा होती. मध्यमवर्गीय-उच्च मध्यमवर्गीयांनी मुलांना इंग्रजी भाषेतून शिक्षण देण्यावर भर दिला. तर दुसरीकडे जे गरीब आहेत, आर्थिकदृष्टय़ा मागास आहेत ते प्रादेशिक भाषेतून शिक्षण घेत होते. परिणामी हिंदी आणि अन्य प्रादेशिक भाषांमध्ये या समाजाचा कडवटपणा उतरला. मात्र, जे आचार-विचार आणि आर्थिक स्थैर्याच्या बाबतीत सक्षम होते त्यांनी आपली भाषाच महत्त्वाची मानली नाही. अपवाद सगळ्या परिस्थितीत असतात. मात्र भाषेची, साहित्याची जोपासना ही नेहमी मध्यमवर्गाकडूनच होत असते. आणि या समाजानेच भाषेचे बोट सोडून दिल्याने शब्द, विचारांच्या बाबतीत असलेली श्रीमंती आपण घालवून बसलो. त्याचेच प्रतिबिंब तेव्हाच्या चित्रपटांमधून, गाण्यांमधून उमटले. म्हणूनच चित्रपटांच्या दृष्टीनेही हा काळ वाईटच होता. तद्दन करमणूक करणारे चित्रपटच या काळात जन्माला आले.
जावेद अख्तर