Famous Tiktok Star and BJP Leader Sonali Phogat Death : प्रसिद्ध टिकटॉक स्टार आणि भाजपा नेत्या सोनाली फोगट यांचे निधन झाले आहे. त्या ४१ वर्षांच्या होत्या. आज (२३ ऑगस्ट) सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाच्या बातमीने अनेकांना धक्का बसला. यामुळे लाखो चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली फोगाट या काही कामानिमित्त गोव्याला गेल्या होत्या. त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर काल रात्री याचे काही व्हिडीओ आणि फोटोदेखील शेअर केले आहेत. पण आता सोनाली यांची बहिण रेमन फोगाट यांनी सोनाली यांच्याबरोबर नेमकं काय घडलं? त्यांनी निधनापूर्वी कोणाला फोन केला होता का? याबाबत सांगितलं आहे.
पाहा व्हिडीओ
रेमन फोगाट म्हणाल्या, “नवनीत यांनी आईला रात्री फोन केला होता. जेवल्यानंतर मला अगदी कसंतरीच होत आहे. तसेच माझ्या शरीरामध्येही काहीतरी बदल होत असल्याचं मला जाणवत आहे असं नवनीत यांनी आईला सांगितलं. यावर आईने त्यांना डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला दिला. हो मी डॉक्टरकडे जाईन असंही त्या म्हणाल्या. पण सकाळी आठ वाजता त्यांचं निधन झाल्याचं आम्हाला कळालं.”
सोनाली या चित्रीकरणासाठी गोव्यामध्ये गेल्या होत्या. दरम्यान भारतीय जनता पक्षाने सोनाली फोगट यांची प्रसिद्धी पाहून हरियाणातील हिस्सार जिल्ह्यातील आदमपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर भाजपने हरियाणातील महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती केली होती. सोनाली यांचे पती संजय फोगट यांचेही २०१६ मध्ये निधन झाले होतं.