एका महिला ज्योतिष एन्फ्ल्युएन्सरने सूर्यग्रहणाच्या दिवशी आपल्या पती व मुलांना संपवलं आहे. ८ एप्रिलला सूर्यग्रहण होतं, त्यामुळे चिंतेत असलेल्या या महिलेने आधी दोन खून करून मग आत्महत्या केली. ही घटना अमेरिकेत घडली असून डॅनियल जॉन्सन असं महिलेचं नाव आहे. डॅनियल अयोका नावाची तिची स्वतःची वेबसाईट असून ती याच नावाने ओळखली जायची.

डॅनियल सूर्यग्रहणाबद्दल खूप संशोधन करत होती, ज्यामुळे तिला भीती वाटू लागली होती. म्हणून तिने पायलट असलेल्या तिच्या २९ वर्षीय पतीच्या छातीत चाकूने वार केले, यात त्याचा मृत्यू झाला. मग ती तिच्या नऊ वर्षांच्या आणि आठ महिन्यांच्या मुलांना घेऊन कारने निघाली आणि धावत्या कारमधून त्यांना बाहेर फेकलं. या घटनेत आठ महिन्यांच्या मुलाचा मृत्यू झाला असून मोठा मुलगा जखमी आहे, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. यानंतर कारने ही महिला पुढे गेली आणि तिची कार झाडाला आदळली. यामुळे कार चेंदामेंदा झाली आणि यातच तिचा मृत्यू झाला.

“रोडीजमुळे माझा घटस्फोट झाला,” प्रसिद्ध अभिनेत्याचं विधान; म्हणाला, “माझ्या वैयक्तिक आयुष्यात…”

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या अर्ध्या तासानंतर त्यांना पॅसिफिक कोस्ट हायवेवर अपघात झाल्याची माहिती मिळाली. तिथे एक आलिशान कार झाडावर आदळली होती. तपासासाठी पोलीस जेव्हा महिलेच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांना रक्ताने माखलेले पायाचे ठसे आणि महिलेचा पती जेलेन ॲलन चॅनीचा मृतदेह आढळला. महिलेने सूर्यग्रहणाचे परिणाम खूप मनावर घेतले होते, त्याचा तिच्यावर इतका प्रभाव होता की तिचं मानसिक संतुलन बिघडलं, असं तिच्या वेबसाइटवर व सोशल मीडिया अकाउंटवर केलेल्या पोस्टवरून दिसून येतंय. तपास सुरू असून लवकरच सत्य समोर येईल, असं पोलिसांनी म्हटलं आहे.

२०२४ मधील पहिलं सूर्यग्रहण ८ एप्रिल रोजी झालं. हे सूर्यग्रहण मेक्सिको, टेक्सास, नायगारा फॉल्स, न्यू इंग्लंड, कॅनडा व अमेरिकेसह इतर काही ठिकाणी दिसलं होतं.

Story img Loader