इन्स्टाग्राम, ट्विटर, फेसबुक अशा माध्यमातून बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमार त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात असतो. नुकताच त्याने मुलगी निताराच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्याने पोस्ट केलेल्या या व्हिडिओला अनेक ‘व्ह्यूज’, ‘रिट्विट’ आणि ‘लाइक्स’ही मिळाले. नितारावर शुभेच्छांचा वर्षावही झाला. त्यासोबतच त्याच्या काही सजग चाहत्यांनी आणखी एक गोष्ट हेरली. हा व्हिडिओ सुरु असताना वाहत्या पाण्याचा आवाज स्पष्टपणे येत होता. त्यावर चाहत्यांनी नळ बंद करा #SaveWater असा सल्ला देणारे ट्विट आणि कमेंट केल्या. अक्षय नेहमीच सामाजिक उपक्रमांमध्ये स्वत:हून सहभागी होतो. त्यामुळे त्याच्याकडून अनावधानाने चूक होत असल्याचे लक्षात आणून देण्यासाठी चाहत्यांनी या कमेंटस केल्या होत्या.

वाचा : ‘बिग बॉस’वरील अश्लिलतेचा खटला रद्द

आपल्या चित्रपटांमध्ये सामाजिक भान राखणाऱ्या अभिनेत्याने लगेच त्या प्रतिक्रियांना उत्तर देणारे ट्विट केले. त्याने लिहिलंय की, ‘आम्ही पाणी वाया घालवत नव्हतो. व्हिडिओ शूट करत असताना त्यावेळी कोणीतरी शॉवर वापरत होते. हा फक्त वेळेच्या व्यवस्थापनाचा भाग आहे.’

वाचा : सलमानप्रमाणेच हा मराठमोळा अभिनेताही लग्नापासून काढतोय पळ

अक्षयने शेअर केलेल्या व्हिडिओत नितारा त्याचा चेहऱ्यावर शेव्हिंग क्रिम लावताना दिसत होती. तिला वेगळ्याच पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देत अक्षयने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेलं ‘तुला फक्त एकच विनंती आहे, तू मोठी नको होऊस’. तसेच आपल्या मुलीसोबतचे सुरेख क्षण कायम स्मरणात राहतील, अशी भावनाही त्याने व्यक्त केली.