लोकप्रिय कन्नड अभिनेता दर्शन थुगुदीपाने रेणुकास्वामी खून प्रकरणात जामिनावर सुटल्यानंतर त्याचा पहिला व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडीओत त्याने चाहत्यांचे प्रेम आणि पाठिंब्यासाठी आभार मानले. व्हिडीओमध्ये त्याने चाहत्यांना १६ फेब्रुवारीला त्याच्या वाढदिवसानिमित्त घराबाहेर जमू नये असं आवाहनही केलं आहे.
४७ वर्षीय दर्शनला त्याची मैत्रीण अभिनेत्री पवित्रा गौडा हिला आक्षेपार्ह मेसेज पाठवणाऱ्या रेणुकास्वामी याचा खून केल्याप्रकरणी ११ जूनला अटक करण्यात आली होती. या प्रकरणात आरोपी दर्शन, पवित्रा आणि इतरांना १३ डिसेंबर २०२४ रोजी उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता, तर काहींना आधीच जामीन मिळाला होता.
दर्शनची तुरुंगातून सुटका झाली असून नुकताच त्याने एक्सवर त्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. “प्रेम व पाठिंब्यासाठी मी माझ्या सर्व चाहत्यांचे आणि सेलिब्रिटींचे आभार मानू इच्छितो. तुम्ही सर्वांनी माझ्याबद्दल इतके प्रेम दाखवले की त्याची परतफेड कशी करावी, ते मला कळत नाही,” असं दर्शन म्हणाला.
आजारी आहे दर्शन
दर्शनने त्याच्या वाढदिवशी चाहत्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली, परंतु त्याची प्रकृती चांगली नसल्याने ते शक्य होणार नसल्याचं तो म्हणाला. “मी जास्त वेळ उभा राहू शकत नाही. पण मी सर्वांचे आभार मानतो. मी इंजेक्शन घेतल्यानंतर १५-२० दिवस मला बरं वाटतं; पण त्याचा प्रभाव कमी होताच त्रास पुन्हा सुरू होतो. माझे ऑपरेशन करावे लागेल,” असं दर्शनने सांगितलं. तसेच प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर चाहत्यांना लवकरच भेटणार, असे आश्वासन त्याने दिले. “मी पुढे काय करायचं याबद्दल मला माझ्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल, मला मणक्याचा त्रास आहे,” असं दर्शनने नमूद केलं.
दर्शनने परत केले निर्मात्याचे पैसे
दर्शनने चित्रपट साईन केल्यावर निर्मात्याने दिलेले पैसे परत केले आहेत. “मी सर्व निर्मात्यांचे आभार मानतो ज्यांनी माझी वाट पाहिली. मी त्यांच्यावर अन्याय करायला नको, कारण त्यांचे इतरही प्रकल्प असतील,” असं दर्शन म्हणाला. दर्शनने सांगितलं की त्याने एका चित्रपटासाठी निर्माते सोरप्पा बाबू यांनी दिलेली अॅडव्हान्स रक्कम परत केली आहे. या खून प्रकरणात अडकण्यापूर्वी दर्शन ‘डेव्हिल: द हीरो’ सिनेमाचं काम करत होता. तो शेवटचा २०२३ च्या कन्नड सुपरहिट ‘कटेरा’ या चित्रपटात दिसला होता. २०२४ मध्ये तो रेणुकास्वामीच्या खून प्रकरणात अडकला आणि त्याला तुरुंगात जावं लागलं, नंतर जवळपास ६ महिन्यांनी त्याला जामीन मिळाला.