करोना महामारीच्या वाढत्या प्रभावामुळे सरकारने देशभरात टाळेबंदी करण्याचा निर्णय घेतला होता. या काळात मुंबई, पुणे सारख्या महानगरात कामानिमित्त आलेल्या अनेक कामगारांचे खूप हाल झाले. घराबाहेर पडायला परवानगी नसल्यामुळे या कामगारांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला होता. अशा परिस्थितीमध्ये अभिनेता सोनू सूद या गरजू कामगारांच्या मदतीला धावून गेला. त्याने लाखो कामगारांना त्यांच्या गावी जाण्याची व्यवस्था करुन दिली. बऱ्याचजणांना आर्थिक मदत देखील केली.
अभिनेता सोनू सूद बॉलिवूडमधल्या टॉपच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने हिंदीसह तमिळ, तेलुगू अशा काही दाक्षिणात्य भाषांमधल्या चित्रपटांमध्येही काम केले आहे. सोनूने बऱ्याचदा ग्रे शेड असलेल्या भूमिका केल्या आहेत. करोना काळात सोनूने काही लोकांना मदत केली होती. त्याने काही कामगारांना त्यांच्या गावी जाण्याची सोय करुन दिली होती. तेव्हापासून सोनू सूदला फोन, सोशल मीडिया अशा वेगवेगळ्या माध्यमातून लोक संपर्क करु लागले होते. संपर्क करणाऱ्या बहुतांश लोकांना मदत करण्याचा प्रयत्न त्याने केला. सोनूने स्वखर्चाने लाखो कामगारांना सुखरुप त्यांच्या घरी पोहचवले. त्याच्या या समाजकार्याचे सर्वत्र कौतुक झाले.
निस्वार्थ भावनेने केलेल्या मदतीमुळे सोनूला खूप आशीर्वाद मिळाले. अनेकांनी त्याला देवाचा अवतार मानले. तेलंगणा येथे एका गावामध्ये त्याचे मंदिर देखील बांधलेले आहे. अशातच एका चाहत्यामुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे. प्रतापगडच्या ‘माधु गुर्जर’ या कलाकाराने स्वत:च्या रक्ताचा वापर करुन सोनूच्या चेहऱ्याचे चित्र काढले आहे. या संदर्भातला एक व्हिडीओ खुद्द सोनू सूदने ट्वीटरवर रिशेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने “मी आज माधु गुर्जर यांना भेटलो. ते उत्तम चित्रकार आहेत. त्यांनी माझे चित्र तयार केले आहे. पण त्यांनी यात एक चूक केली आहे. त्यांनी चित्र तयार करताना स्वत:च्या रक्ताचा वापर केला आहे जे चुकीचे आहे. माधुजी चित्र रंगवताना रंगाचा वापर करा स्वत:च्या रक्ताचा नाही” असे म्हटले आहे. त्यावर त्या चाहत्याने प्रतिक्रिया देताना ‘सर तुमच्यासाठी रक्तच काय मी माझा जीव सुद्धा देऊ शकतो. तुम्ही कितीतरी गोरगरीबांची मदत केली आहे. तुम्ही स्वत:पेक्षा जास्त इतरांचा विचार करता’ असे म्हटले आहे. “माझ्या मित्रा, रक्तदान कर. अशा प्रकारे रक्त वाया घालवू नकोस. धन्यवाद” असे कॅप्शन सोनूने त्या व्हिडीओला दिले आहे.
आणखी वाचा – “पहिल्या भेटीतच तो मला मूर्ख…” हुमा कुरेशीने सांगितला अनुराग कश्यपचा किस्सा
सोनू सूद अभिनयासोबत अन्य व्यवसाय देखील करतो. मुंबईमधील काही हॉटेल्सचा तो मालक आहे. करोना काळात त्याने याच हॉटेल्सच्या माध्यमातून लोकांना मदत करायची सुरुवात केली होती. तो सध्या सूद फाऊंडेशन या त्याच्या संस्ठेच्या माध्यमातून गरजूंची मदत करत असतो.