१९९४ मध्ये सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांचा ‘हम आपके है कौन’ हा सुपरहिट चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन केले होते. नव्वदच्या दशकामधल्या आयकॉनिक चित्रपटांमध्ये ‘हम आपके है कौन’चा समावेश केला जातो. हा चित्रपट राजश्री प्रॉडक्शन्स निर्मित ‘नदीया के पार’ या जुन्या चित्रपटाचा रिमेक आहे. सलमान, माधुरीसह रिमा लागू, अनुपम खेर, मोहनीश बहल, रेणूका शहाणे अशी तगडी स्टार कास्ट या चित्रपटाला लाभली होती.
मराठमोळे संगीत दिग्दर्शक ‘राम लक्ष्मण’ ऊर्फ विजय पाटील यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे. ‘लो चली मैं’, ‘हम आपके है कौन’, ‘दिदी तेरा देवर दिवाना’ अशी या चित्रपटामधील सगळ्याच गाण्यांची आजही क्रेझ पाहायला मिळते. एक-दोन गाणी सोडल्यास चित्रपटातील सर्वच गाण्यांसाठी लता मंगेशकर यांनी पार्श्वगायन केले होते. त्यांना एस.पी. बालसुब्रमण्यम, कुमार सानू आणि उदित नारायण यांची साथ लाभली होती.
सध्या कॅनेडियन रॅपर ड्रेकच्या रॉक कॉन्सर्टमधला एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने ‘हम आपके है कौन’ चित्रपटातील ‘दिदी तेरा देवर दिवाना’ या गाण्याचं रिमिक्स व्हर्जन वाजवलं. तेव्हाचा व्हिडीओ त्याच्या चाहत्याने सोशल मीडियावर पोस्ट केला. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत लोकांनी या व्हिडीओबाबत प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. लता दिदींच्या एका चाहत्याने “तू माझ्यासाठी ‘दिदी तेरा देवर दिवाना’ गाणं खराब केलं आहेस..”, अशी कमेंट करत नाराजी व्यक्त केली आहे. तर दुसऱ्या चाहत्याने ‘लाईक्ससाठी काहीही करु नका’, असे म्हटले आहे.
आणखी वाचा – “…आणि मजासुद्धा केली”; लग्न न करताच लेकीला जन्म दिल्याबद्दल नीना गुप्तांनी केलं वक्तव्य
काहींनी ‘या रिमिक्स गाण्याद्वारे ड्रेकने लता मंगेशकर यांना आदरांजली वाहिली आहे’, असे म्हटले आहे. तर ‘हा संपूर्ण व्हिडीओ खोटा असून त्या कार्यक्रमामध्ये असं काही घडलंच नव्हतं’ अशा काही कमेंट्स तेथे पाहायला मिळत आहेत. काही यूजर्सनी सारेगामा कंपनीच्या अधिकाऱ्यांना हा व्हिडीओ तपासण्याचे आवाहन देखील केले आहे.